कुस्तीच्या मैदानात मोहिते पाटील विरुद्ध पवार असा तुफान सामना रंगला होता.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या रिंगणात अनेक मातब्बर घराणी आहेत. यातलीच दोन घराणी म्हणजे बारामतीचे पवार आणि अकलूजचे मोहिते पाटील. सध्या मोहिते पाटील घराणे भाजपमध्ये गेलं असलं तरी अनेक वर्षे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्री देखील बनवण्यात आलं होतं.

पण या दोन्ही घराण्यातील सुप्त संघर्ष आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. पण इतिहास पाहिला तर सहकारी चळवळीवर अधिराज्य गाजवणाऱ्या पवार आणि मोहिते पाटील या दोन्ही कुटूंबांचे संबंध खूप जुने आहेत.

याची सुरवात होते अप्पासाहेब पवार यांच्यापासून.

दिनकर गोविंद पवार उर्फ अप्पासाहेब हे पवार कुटूंबातले सगळ्यात थोरले. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात त्यांनी बीएस्सीची पदवी संपादन केली होती. ते हुशार होते, मेहनती होते. याचं काळात अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे विखे पाटील महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना उभारत होते. अप्पासाहेब पवारांनी तिथे नोकरी केली. प्रवरेचा साखर कारखाना उभारण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा राहिला आहे.

एक साखरतज्ज्ञ, कुशल प्रशासक म्हणून त्यांना देशभरात ओळख मिळाली. पुढे त्यांचे वडील गोविंद पवार व इतर त्यांचे सहकारी बारामती-इंदापूर भागात साखर कारखाना उभारण्याच्या प्रयत्नाला लागले. त्यांना मदत म्हणून अप्पासाहेब पवार यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व बारामतीला परत आले.

इंदापूर तालुक्यातील सणसर या गावी नवा सहकारी साखर कारखाना उभारायचं काम युद्धपातळीवर चालू झालं. अप्पासाहेब पवार यांनी या कार्याला अक्षरशः वाहून घेतलं, अवघ्या दहा महिन्यात हा कारखाना उभा राहिला.

 सणसर भागात बैल पोळ्याला कुस्तीचे सामने भरवले जात. स्वतः अप्पासाहेब पवारांना कुस्तीची आवड होती. त्यांनी आपल्या शाळा कॉलेज जीवनात कुस्तीचे धडे गिरवले होते. आपल्या भावंडानी देखील कुस्ती खेळावी असा त्यांचा आग्रह असायचा. काटेवाडीला असलेल्या घरात त्यांनी तालीम बनवली होती आणि तिथे त्यांचे सर्व भाऊ कुस्तीची तयारी करायचे.

एकदा बैल पोळ्याच्या दिवशी सणसर येथे अकलूजचे लोकनेते शंकरराव मोहिते पाटील यांचं आगमन झालं.

उंचापुरा बांधा, राकट वर्ण, पहिलवानी शरीर, डोक्यावर ऐटबाज गांधी टोपी. शंकरराव मोहिते पाटील यांना पाहिलं तरी त्यांचा दरारा जाणवून येई. ते म्हणजे एकेकाळी प्रतिसरकारच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले क्रांतिकारक. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची वाट धरली. निवडणुका जिंकल्या. अकलूज माळशिरस या आपल्या दुष्काळी भागात सहकार रुजावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.

सणसर गावात शंकरराव मोहिते पाटलांची एक बहीण दिली होती. तिच्या घरी त्यांचं येणं जाणं असायचं. सोबत त्यांची मुलं देखील असायची. अशाच एका बैल पोळ्याला सणसरमध्ये कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं.

शंकररावांना कुस्तीची भारी हौस. लहानपणात व पुढे तारुण्यातही अनेक कुर्ती मैदानांमध्ये ते कुस्त्या खेळले होते. पुढे पुढे आपल्या गावातील पैलवानांना घेऊन ते गावोगावच्या कुस्त्यांच्या फडावर जायचे. एकदा बैलपोळ्याच्या सुमारास सणसरला त्यांच्या बहिणीच्या गावीच कुस्त्या होत्या. शंकरराव आपले थोरले चिरंजीव विजयसिंह व इतर मुलांना घेऊन सणसरला गेले. 

विजयसिंह अगदीच लहान होते. ते गोरेपान, नाजूक व दिसायला सुंदर. गळ्यात सोन्याचा गोफ व कमरेला काळा करदोडा. शंकररावांच्या आदेशावरून लहानगे विजयसिंह मोहिते पाटील यात्रेच्या आखाड्यात उतरले. त्यांच्याविरोधात जोड देण्यात आली बारामतीच्या अप्पासाहेब पवारांचे सर्वात धाकटे भाऊ प्रताप पवार यांची.

प्रताप पवार यांची कुस्तीची तयारी स्वतः आप्पासाहेबांनी करून घेतली होती. विजयसिंह मोहिते पाटील व प्रतापराव पवारांची कुस्ती लावली गेली. त्यावेळी तयारीने मैदानात उतरलेल्या प्रतापरावांनी विजयसिंह मोहितेंना लगेच आस्मान दाखवले.

शंकरराव मोहिते पाटलांना हा अपमान वाटला. 

पुढच्या वर्षी त्याच मैदानात पुन्हा कुस्तीचं मैदान भरलं. शंकरराव मोहिते पुन्हा आपल्या पठ्ठयानां घेऊन  सणसरला आले. गेल्या वर्षभरात विजयसिंह मोहिते पाटलांनी प्रचंड मेहनत घेऊन कसून तयारी केली होती. 

पुन्हा एकदा या छोट्या पहिलवानांची कुस्ती लावण्यात आली. विजयसिंह मोहिते पाटलांनी चांगली तयारी केली असल्यामुळे त्यांनी प्रतापराव पवारांवर लगेच डाव केला आणि कुस्ती मारली.

शंकरराव मोहिते पाटलांच उर अभिमानाने भरून आलं. त्यांच्या पोराने नाव राखलं होतं. पुढे माळेगाव साखर कारखान्याच्या निर्मितीत मोहिते पाटलांनी अप्पासाहेब पवारांची मदत घेतली. तेव्हापासून त्यांचे ऋणानुबंध आणखी दृढ झाले. 

शंकरराव मोहिते पाटील पुढे महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झाले. अनेक वर्षे त्यांनी राज्यातल्या कुस्तीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. 

तरुणपणी विजयसिंह मोहिते पाटील राजकारणात आले आणि वडिलांचा वारसा पुढे नेला तर प्रतापराव पवार यांनी बिट्स पिलानी या नामंकित संस्थेतून आपले इंजिनियरिंग केलं आणि उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं. 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.