हजारो कोटींचा सम्राट असलेला रेमंडचा मालक पोराने हाकलल्यामुळे रस्त्यावर आला.

आपल्या हिंदी सिनेमामध्ये श्रीमंत माणूस दाखवायचा झाला तर त्याचं आडनाव टिपिकल असतं ठाकूर, मेहरा, मल्होत्रा, राठोड, ओबेरॉय, सक्सेना वगैरे वगैरे.

या सगळ्या आडनावाचा बाप असतो सिंघानिया. बडे बडे फॅक्ट्रीओ का मलिक. मोठी हवेली, नोकर चाकार, मोठमोठ्या दिमतीला. नवरा बायको राजाराणी पोरं फॉरीनला शिकायला.

यातला मोठा पोरगा खमक्या असतो. शिकून परत येतो. धंदा सांभाळतो. बायको वांड निघते. ती आणि तो दोघे मिळून म्हाताऱ्या बापालाच हवेलीतून हाकलून लावतात.

पिक्चर मध्ये बघून बघून चावून चोथा झालेली स्टोरी. पण हे खरोखर घडलय. रेमंड चे मालक विजयपत सिंघानिया यांच्या बाबतीत.

अगदी सुरवातीपासून सुरु करतो.

ही सिंघानिया मंडळी मूळची राजस्थानच्या झुनझुनवाला जिल्ह्यातली. सिंघानिया हे गावच आहे. अठराव्या शतकात विनोदीदास सिंघानिया यांनी गाव सोडलं. वयापारी रक्त होतं. युपीच्या फरुखाबाद शहरात ट्रेडिंगचा बिझनेस सुरु केला. पुढे त्याच्या पोरांनी धंदा वाराणसी, कलकत्ता इथे पर्यंत वाढवला.

याच काळात इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती. त्यांनी व्यापारात जम बसवला. सिंघानिया यांनी त्यांच्याशी चांगला मेळ बसवला. यातूनच सिंघानिया यांना राजासाब हि उपाधी मिळाली.

प्रत्येक पिढ्यागणिक सिंघानियांचा उत्कर्षच होत गेला. या वंशवृक्षाच्या फांद्या देशभर ठिकठिकाणी गब्बर पैसे कमवून सावकारीचा व्यवसाय करत होत्या.

यातच होते लाला कमलापत सिंघानिया. हे आधुनिक विचारांचे होते. त्यांनी सावकारी व ट्रेडिंगच्या परंपरागत धंद्याचा विस्तार तर केलाच शिवाय कानपुरमध्ये मोठं मोठे कारखाने उभारले. यातच होता जे.के. कॉटन मिल. जुग्गीलाल कमलापत कापड गिरणीची स्थापना १९२१ साली करण्यात आली. कापड धंद्यामध्ये हा सिंघानिया यांचा पहिलाच अनुभव होता. याच बरोबर कानपुर मध्ये आईस फॅक्ट्री, तेल गिरणी, ज्यूट फॅक्ट्री, होजिअरी वगैरे अनेक उद्योग सुरु केले. आपल्या मुलांमध्ये वाटून टाकले.

आज आपण पाहतो ते जेके टायर,जेके सिमेंट, जेके शुगर,जेके युनिव्हर्सिटी हे सगळे साम्राज्य म्हणजे लाला कमलापत सिंघानिया यांची कृपा.

या लाला कमलापत यांचा दुसरा मुलगा कैलाशपती हा कापडाच्या धंद्यात पडला. वडिलांनी १९२५ साली ठाण्याला डेव्हिड ससून यांच्या कंपनीची रेमंड मिल विकत घेतली होती. ही वूलन मिल कैलाशपती यांनी चालवायला घेतली. फक्त ब्लँकेट्स बनवणाऱ्या या मिलमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले. महायुद्धात लागणाऱ्या सैनिकांच्या युनिफॉर्म्सची निर्मिती केली.

भारताचा ब्रँड बनलेल्या रेमंड उद्योग समुहाची ही सुरवात.

स्वातंत्र्यानंतर स्वदेशीच वारं जोरात होतं. रेमंडने याचा फायदा उठवला. कैलाशपती यांच्या मदतीला त्यांचा पुतण्या गोपालकृष्ण कानपुरवरून मुंबईला आला. या दोघांनी मिळून भारतात पहिल्यांदा वूल आणि पॉलिस्टर कापड एकत्र करून टेरुल नावाचे कापड बनवले. जे त्याकाळी प्रचंड हिट झाले.

१९५८ साली रेमंडचे पहिले रिटेल शोरूम मुंबईच्या किंग्स कॉर्नर येथे सुरु झाले. पुढच्या दोनच वर्षात आपल्या कारखान्यातील सगळी मशिनरी भंगार मध्ये काढली आणि जगातील अत्याधुनिक माग भारतात आणले. भारतातला हा पहिलाच प्रयोग होता.

क्वालिटी म्हणजे रेमंड हि ओळख बनली.

पुढच्या दहा वर्षात रेमंडची गारमेंट फॅक्ट्री ठाण्याला सुरु झाली. जळगावला देखील त्यांचा कारखाना सुरु झाला. कैलाशपती यांचा हार्वर्ड विद्यापीठात शिकून आलेला मुलगा विजयपत सिंघानिया रेमंड समूहात दाखल झाला.

१९८० साली त्याने कारभार आपल्या हातात घेतला. त्यांच्यामुळेच रेमंडमध्ये जीन्सदेखील बनू लागली. विजयपत सिंघानिया डॅशिंग होते. त्यांनी जग पाहिलेलं होतं. ते स्वतः वैमानिक होते. त्यांनी अनेक विमानाच्या रेस मध्ये भाग घेतला होता, या स्पर्धा जिंकल्या, स्वतःच्या नावावर कित्येक विक्रम बनवले.

धंदा सांभाळताना त्यांनी रेमण्डची क्वालिटीची परंपरा तर जपलीच शिवाय धाडस करून रेमंडच्या कक्षा विस्तारल्या.

पार्क अव्हेन्यू या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डची निर्मिती केली, १९९० साली ओमानला रेमण्डचे पहिले शोरूम उघडून परदेशी भूमीवर पाऊल टाकले.

विजयपत सिंघानिया यांच्या कारकिर्दीत रेमंड आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. रेमंडच कापड वापरणे भारतात स्टेट्स सिम्बॉल बनले होते. मिडल क्लास लोक वर्षभर पैसे साठवून दिवाळीत रेमण्डच कापड विकत घ्यायचे आणि ते मिरवायचे. त्याच्या जाहिराती देखील श्रीमंतीचं स्वप्न दाखवणाऱ्या असायच्या.

the complete man अशी टॅगलाईन असणाऱ्या रेमंडचे जॅकी सारख्या देखण्या मॉडेलचे सूट घालून लावलेले पोस्टर पाहायला मुंबईत गर्दी व्हायची.

१९९१ नंतर आलेले जागतिकीकरण देखील रेमंडने विजयपत सिंघानिया यांच्या कुशल नेतृत्वाखाली सहज हाताळलं. परदेशी मोठे ब्रँड भारतात येऊन रेमण्डच्या झळाळी पुढे फिके पडले होते. विजयपत सिंघानिया यांना मुंबईचा शेरीफ या मानाच्या पदावर निवडण्यात आलं होतं. त्यांना पद्मभूषण सन्मान देखील प्रदान करण्यात आला.

याच काळात विजयपत सिंघानिया यांचा धाकटा मुलगा गौतम सिंघानिया उद्योगात आला.

गौतम हा देखील वडिलांप्रमाणे आधुनिक विचारांचा होता. त्यानेच रेमंड उद्योजगत खळबळ उडवणाऱ्या कामसूत्र कंडोमची निर्मिती केली होती. वडील हौशी पायलट होते तर हा सुपरफास्ट कार्सचा चाहता.

जगातल्या सगळ्या फॅन्सी कार, प्रायव्हेट जेट या त्याच्या ताफ्यात जमा आहेत. तो अनेकदा कार रेसिंग स्पर्धेमध्ये स्वतः भाग घ्यायचा.

विजयपत सिंघानिया यांचा थोरला मुलगा मधुपती आपल्या प्रॉपर्टीची वाटणी घेऊन रेमंड मधून बाहेर पडला आणि सिंगापूरला सेटल झाला. त्याच वर्षी धाकट्या गौतमला रेमंड उद्योगाचा वारस घोषित करून त्याला डायरेक्टर बनवण्यात आले.

गौतमने रेमंड आपल्या हातात घेतल्या पासून कंपनी १००० कोटीवरून वाढून ५००० कोटींची बनली. गौतम सिंघानिया ज्याला हात लावेल त्याचे सोने होत चालले होते. त्याचं लग्न नवाज मोदी हिच्याशी झालं. तिथून पुढे हळूहळू मात्र सिंघानिया पितापुत्रांमध्ये वाद सुरु झाले.

२०१५ साली विजयपत सिंघानिया यांनी आपले कंपनीमधले ३७ % शेअर्स मुलाला देऊन टाकले आणि काही दिवसांनी बातमी आली.

हजारो कोटींचे मालक असणाऱ्या विजय सिंघानिया यांना मुलाने घरातून बाहेर हाकलले.

त्यांची रेमण्डच्या चेअरमनपदावरून उचलबांगडी केली. विजयपत सिंघानिया सांगतात,

मला ऑफिसमधून धक्काबुक्की करून बाहेर काढलं, माझा पदमभूषणचा पुरस्कार देखील गायब झाला. एक दिवस मी रेमण्डचा मालक होतो पण माझ्या मुलामुळे मला राहण्यास घर देखील उरले नाही.

वयाची ऐंशी वर्षे पार केलेले विजयपत सिंघानिया मुंबईत भाड्याच्या घरात राहतात.

त्यांचा मुलगा मलबार हिलला असलेल्या सिंघानिया कुटुंबाच्या परंपरागत ३६ मजली जेके हाऊस या महालात राहतो. पण त्याच्या म्हाताऱ्या वडिलांसाठी या घरात एका खोलीची सोया करता येऊ नये हे अनेकांसाठी धक्कादायक वाटते. एक काळ गाजवलेला रेमंडचा सम्राट रस्त्यावर आला आहे.

या बाप लेकाची कोर्टात केस चालू आहे, गौतम सिंघानिया याची बाजू बघितली तर तो म्हणतो कि,

मी वडिलांना घरातून बाहेर काढलेलं नाही. ते आजही परत येऊन घरी राहू शकतात. पण माझे वैयक्तिक जीवनातील निर्णय आणि रेमंड उद्योगसमूहाचा मालक म्हणून निर्णय वेगवेगळे असणार. यात भावनिकता आणून चालणार नाही.

पण विजय पत सिंघानिया यांच्या  म्हणण्यानुसार गौतमच्या घरात त्यांना रिस्पेकट मिळत नाही.

त्यांना आपल्या नातींना देखील भेटण्याची परवानगी दिली जात नाही. हृदयाचे ऑपरेशन झाल्या वर देखील पोरगा आपल्या बापाच्या भेटीला दवाखान्यात आला नाही यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं ? ते नेहमी आपल्या मुलाखती मध्ये सांगतात,

I would advise parents everywhere not to make the mistake of giving away all your savings to your children during your lifetime.

भारतातील सर्वात मोठ्या ब्रँडची, अरबपती कुटुंबाची ही दुर्दैवी कथा एखाद्या मसाला सिनेमा देखील लाजवेल.

पण गंमत म्हणजे इतकी घरगुती भांडणे होऊनही रेमंडच्या खपावर काहीही परिणाम झाला नाही. कोर्ट केसेस वगैरे चालूच आहेत मात्र दुसरीकडे रेमंडचे विक्रम सुरूच आहेत. शेकडो परदेशी ब्रँड येऊनही रेमण्डचा क्लासिक पणा कमी झालेला नाही.

नुकताच गौतम सिंघानिया यांनी मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या बंगल्यापेक्षाही दहा मजली उंच व आलिशान बंगला बांधण्यास सुरवात केली आहे. बाप बेट्याची हि भांडणे तोडगा मिळून सुटून जावीत व विजयपत सिंघानिया यांना आपल्या हक्काचे छप्पर मिळेल हीच या कम्प्लिट मेनकडून  अपेक्षा.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.