विक्रम वेताळ सिरीयल गाजली म्हणून रामायण बनवता आलं

रामायण अख्ख्या भारतावर गारुड घातलेली सिरीयल. कोरोनाच्या महाभयंकर प्रलयामुळे घरात अडकलेल्या नव्या पिढी साठी दूरदर्शनने ती परत आणली.

रामायण हे एक महाकाव्य म्हणून महान तर आहेच पण यासोबतच रामायण सिरीयलने देखील टीव्ही जगतात लीजेंडरी स्टेटस मिळवला आहे.

ही सिरीयल बनण्याच्या वेळच्या अनेक कथा दंतकथा प्रसिद्ध आहेत. अशीच एक कथा रामायण सिरीयलचे निर्माते रामानंद सागर यांच्या मुलाने सांगितली आहे.

रामायण बनवण्यासाठी रामानंद सागर यांच्याकडे पैसे नव्हते.

रामानंद सागर यांचा जन्म लाहोर मध्ये झाला. त्यांचं मूळ नाव चंद्रमौली चोप्रा. सध्याचे प्रसिद्ध निर्माते दिगदर्शक विधु विनोद चोप्रा त्यांचे सावत्र भाऊ. पण आज्जीने दत्तक घेतल्यामुळे त्यांना नाव मिळाल रामानंद सागर.

रामानंद सागर लहानपणापासून हुशार होते, शिक्षणाची त्यांना आवड होती. शिपाई, साबण विकणे, ट्रक धुणे अशी कामे करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

पंजाब विद्यापीठात मध्ये त्यांनी संस्कृत व पर्शियन विषयामध्ये सुवर्णपदक पटकावलं.

तेव्हाच त्यांचा रामायण महाभारत या पौराणिक कथांचा सखोल अभ्यास झाला होता.

शिक्षण पूर्ण झाल्यावर एका वर्तमानपत्रात नोकरी सुरू केली. याशिवाय त्यांनी टोपणनावाने लिहिलेल्या कथा प्रसिद्ध होत होत्या.

त्यांची पुस्तके सुद्धा फेमस झाली, यातूनच नवी कामे मिळाली.

स्ट्रगलच्या काळात लाहोर फिल्म इंडस्ट्रीमध्ये क्लॅप वाजवण्याचं काम करणारा हा मुलगा आता द ग्रेट पृथ्वीराज कपूर यांच्या सोबत काम करू लागला. त्यांची काही नाटके दिगदर्शित केली.

पृथ्वीराज कपूर यांच्याच आग्रहामुळे रामानंद सागर सिनेमात आले. राज कपूरच्या सुपरहिट बरसात सिनेमाचा स्क्रीनप्ले व डायलॉग त्यांनीच लिहिला होता.

स्क्रिप्टरायटर म्हणून बॉलिवूड मध्ये त्यांचं खुप नाव झालं.

फिल्मफेअर सारखे पुरस्कार मिळाले, दिगदर्शनातही त्यांनी नशीब अजमावल, तिथे देखील त्यांना यश मिळालं.

आरझु, आंखे, चरस सारखे रेकॉर्ड ब्रेक व अवॉर्ड विनिंग सिनेमे त्यांनी बनवले. सागर आर्टस् नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली होती. ते निर्माते देखील बनले होते.

सत्तरच्या दशकातला काळ.

रामानंद सागर यांच्या डोक्यात रामायण बनवण्याच खूळ बसल होतं.

खूळचं म्हटलं पाहिजे कारण रामानंद सागर आणि सागर फिल्म्स साठी वाईट काळ होता. अनेक मल्टी स्टारर सिनेमे फ्लॉप गेले होते. पाण्यासारखा पैसा वाया गेला होता. आता रिस्क घेण्यात अर्थ नव्हता.

एका सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने रामानंद सागर परदेशात गेले होते. तिथे त्यांच्या पाहण्यात रंगीत टीव्ही आला. अजून भारतात टीव्ही यायचे होते.

रामानंद सागर यांना या छोट्याशा बॉक्स मध्ये लपलेलं सामर्थ्य जाणवलं.

तेव्हाच त्यांनी ठरवलं की आता आपण टीव्ही साठीच रामायण बनवायचं.

अख्ख रामायण एका सिनेमात बसवणे शक्य नव्हतं. त्यासाठी व्हिडीओ सिरीज काढायच रामानंदजींच्या मनात होत पण टीव्ही मुळे हा नवीन ऑप्शन समोर आला. पण त्यासाठी देखील खूप मोठा खर्च येणार होता.

भारतात पंतप्रधानपदी तरुण राजीव गांधी आले. त्यांनी नवं धोरण जाहीर केलं.

त्यांच्या प्रयत्नामुळे भारतात एशियाड गेम्सच्या वेळी भारतात रंगीत टीव्हीच आगमन झाल होतं. त्यांनी दूरदर्शनच रुपडं पालटायच ठरवलं होतं.

अशातच एकदा केंद्र सरकारच्या कोणत्या तरी अधिकाऱ्याचा रामानंद सागर याना फोन आला की

तुम्ही दूरदर्शन साठी रामायण बनवाल का?

खर तर तेव्हा सरकारमध्ये देखील रामायण महाभारत सारखी पौराणिक सिरीयल बनवावी की नाही हा प्रश्न उभा होता

मात्र विरोध असूनही राजीव गांधींनी ही सिरीयल बनवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.

पण रामानंद सागर यांच्या कडे बजेटच नव्हते. पौराणिक विषयावर एवढे पैसे खर्च करण्यासाठी कोणताही फायनान्सर तयार नव्हता.

रामायण चालेल का याची टेस्ट करण्यासाठी अशाच एका पौराणिक विषयावरील सीरियल रामानंद सागर यांनी बनवली.

विक्रम और वेताळ

वेताळ पच्चीसी वर आधारित पंचवीस कथा त्यांनी दूरदर्शन वर दाखवल्या. हट्टी व पराक्रमी राजा विक्रमादित्य आणि त्याच्या पाठी लागलेला वेताळ यांच्या पुराणातल्या कथेवर ही सिरीयल आधारित होती.

पांढऱ्या केसांचा भयानक दिसणारा वेताळ बच्चे कंपनी मध्ये प्रचंड हिट झाला. त्याचा डायलॉग तर सगळी कडे फेमस होता

‘राजा तू बोला, तो ले मैं जा रहा हूं. मैं तो चला!

ही सिरीयल भरपूर गाजली.

विक्रम वेताळने सागर फिल्म्सच अपयश धुऊन काढलं.

रामायण बनवण्यासाठी भरपूर पैसा कमावला. सगळ्यात महत्वाच म्हणजे त्यानिमित्ताने भारतीय पुराणातल्या कथा नव्या स्वरूपात आणल्या तर प्रेक्षकांना आवडतात हे रामानंद सागर यांच्या लक्षात आले.

आता रामायण बनवायच शिवधनुष्य उचललं तर चालणार होत.

विक्रम वेताळमधलेच बहुतांश कलाकार घेऊनच रामायणच शूटिंग सुरू केलं. राजा विक्रमादित्य झालेल्या अरुण गोविल याना रामाचा रोल दिला होता तर सीता झालेली दीपिका चिखलिया सुद्धा विक्रम वेताळ मधूनच आली होती.

विक्रम वेताळ च्या एका एपीसोड ला 1 लाख खर्च आला होता त्याचवेळी रामायणला त्याच्या 9 पट म्हणजे साधारण 9 लाख खर्च येत होता.

25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 अशी जवळपास सव्वा वर्ष ही सिरीयल चालली. अनेक रेकॉर्ड तुटले. दुरदर्शनने एका एपिसोडमध्ये 40-40 लाख रुपये कमावले.

सिरीयल सुरू असायची तेव्हा भारतभर अघोषित कर्फ्यु असल्याप्रमाणे रस्ते सुनसान पडायचे, राम सीता झालेल्या कलाकारांना रस्त्यात लोक पाया पडू लागले.

रामायण सिरीयलने एक नवा इतिहासच घडवला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.