हिंदी असो वा मराठी सगळ्या सिनेमांच्या मेकअपचा बादशाह विक्रम गायकवाड आहे

परवा Netflix वर ’83’ पाहिला. आईशप्पथ सांगते, बाकी कशासाठी नाय पण स्क्रीनवरच्या खेळाडूंना मन आणि डोळे भरून पाहायला तरी, आपण थिएटरला जाऊन हा पिक्चर बघायला पाहिजे होता असं वाटून गेलं. सगळ्यांनीच लय भारी काम केलं, सगळ्यांचं कौतुक पण झालं, पण स्क्रीनवरच्या खेळाडूंना पाहून असं वाटलं की ह्यांची ऍक्टिंग ऊन्नीस बीस झाली असती तरी काय विषय नाय, कारण इतका तगडा ह्यांचा मेकअप झालाय.

आता बाप माणसांची बाप कामं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आमची कामं… लगेचच 83 ची कास्ट अँड क्रू लिस्ट बघितली आणि त्यात नाव दिसलं, “मेकअप आर्टिस्ट: विक्रम गायकवाड”. त्यांच्याविषयी अजून जरा हुडकलं तर त्यांचा भन्नाट इतिहासच घावला ना भिडू…

परेश रावल यांनी साकारलेले सरदार वल्लभभाई पटेल असो, किंवा साऊथ सुपरस्टार मामुटीने साकारलेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर; सुबोध भावेने साकारलेले बालगंधर्व असो, लारा दत्ताने साकारलेल्या इंदिरा गांधी असो, किंवा आत्ताचा, रणवीरने गाजवलेला कपिल देव… 

सगळीकडचे रोल्स वेगळे, जॉनर्स वेगळे, भाषा वेगळी, अॅक्टर्स वेगळे… पण कॉमन बादशाह एकच ‘मेकअप आर्टिस्ट: विक्रम गायकवाड’. 

विक्रम गायकवाड यांनी आपल्या करियरची सुरवात केली ती, अगदी वयाच्या नवव्या- दहाव्या वर्षांपासून. खेडोपाडी जाऊन क्लबच्या नाटकांत, स्पर्धांमध्ये, संमेलनातल्या ग्रुप डांससाठी त्यांनी हजारो चेहऱ्यांवर मेकअप केलाय.

शिवाय बॅक स्टेजला चालणारी सगळी कामंही ते अगदी हौशीने करत असत. ज्येष्ठ मेकअपमन बबनराव शिंदे म्हणजे विक्रम गायकवाड यांचे गुरु. 

त्यांच्या हाताखालीच जादूगार विक्रम यांचे हात तयार झाले, आणि त्यांना मेकअप आर्टविषयी गोडी लागली. एकदिवशी बबनरावांच्या अनुपस्थितीत त्यांना ‘आग्र्याहून सुटका’ ह्या नाटकासाठी मेकअप करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या करियरची खऱ्या अर्थाने सुरवात झाली.

नंतर विक्रम गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ साठी काम केलं. इथे मोठं चॅलेंजचं काम होतं ते म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रूपं, वेगवेगळ्या चेहऱ्यांवर साकारायची.

मावळे, मोगल आणि इतर महत्वाची व्यक्तिमत्व साकारयची आणि ऐन तारुण्यातल्या मावळ्याला २० सेकंदात सत्तरीचा म्हातारा करायचं, असले खेळ रोज करायला लागायचे. पण यामुळे एक झालं, की या प्रोसेसमध्ये विक्रम यांचा कॉन्फिडंस वाढला आणि याचा फायदा त्यांना इंटरनॅशनल लेव्हलवर मोठी कामं करताना झाला.

पुढे श्याम बेनेगल यांनी विक्रम यांना मुंबईला यायला सांगितलं. १९९४ साली आलेल्या ‘सरदार’ या पिक्चरमध्ये परेश रावल काम करणार होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचं डिट्टो व्यक्तिमत्व साकारायला आघाडीच्या २० मेकअप आर्टिस्टना बोलावण्यात आलं होतं. आता ह्या सगळ्यांमध्ये विक्रम पडले जुनीयर. ते दरवाजातच घोटाळत राहिले.

पानाची पिचकारी मारण्यासाठी म्हणून परेश रावल दारापाशी आले तेव्हा त्यांनी विक्रमना पाहिलं आणि विचारलं, “आप कौन? अंदर क्यू नही आते? विक्रमनी आपली ओळख सांगितली आणि परेश रावल त्यांना आत घेऊन आले.

आता चॅलेंज होतं ते अर्ध्या तासात परेश रावल यांना सरदार वल्लभभाई पटेल बनवायचं. आणि हे चॅलेंज त्यांनी पूर्ण करूनही दाखवलं. इतर गाजलेल्या मेकअप आर्टिस्टना जे जमलं नाही ते बुजलेल्या विक्रमनी करून दाखवलं. त्यांच्या खिशात एक मेणाची गोळी होती पण गरम पाणी नव्हतं आणि सबबी सांगायला वेळही नव्हता. त्यांनी चहात स्टिक बुडवून काम सुरू केलं आणि १० मिंटात वल्लभभाई साकारले.

सरदार वल्लभभाई यांच्या रूपातल्या परेश रावलना जेव्हा वल्लभभाईंच्या ९२ वर्षांच्या ड्रायव्हरने पाहिलं, तेव्हा त्यांना खरंच सरदार परत आलेत असं वाटून त्यांनी परेश रावल यांच्याच पायावर डोकं ठेवलं होतं.

मग २००० साली आला साऊथच्या मामुटीचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा सिनेमा. मामुटीला आंबेडकरांच्या रूपात बदलण्याचं काम विक्रम गायकवाड यांच्याकडेच होतं. त्यावेळी मामुटीचा मेकअप बघून रीग बेकर हा ऑस्करविनरही  “आय डोन्ट बिलिव्ह” असं म्हणाला होता. एवढंच काय तर मामूटीचा चेहरा स्वतः मामुटीच्या बायकोलाही ओळखता आला नव्हता. 

विक्रमचं काम बघून जब्बार पटेलांनी सुद्धा त्यांचं त्यावेळी खूप कौतुक केलेलं. इनफॅक्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारायची संधीच मुळात विक्रमना जब्बार पटेल यांनी दिली. 

त्यानंतर लगेचच म्हणजे २०११ साली आला होता सुबोध भावे यांचा बालगंधर्व. आता पुन्हा विक्रम यांच्या कलेचा कस लागणार होता. एका पुरुषाला बाईसारखं सजवायचं, शिवाय ते इतिहासातलं एक महत्वाचं आणि खरखुरं व्यक्तिमत्वही दिसायला हवं ही खरी अवघड गोष्ट होती पण इथेही विक्रम गायकवाड यांनी हे शिवधनुष्य पेललं आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

विक्रम यांचं अजून एक गाजलेलं काम म्हणजे बेल बॉटम या चित्रपटात लारा दत्ताने साकारलेल्या इंदिरा गांधी. ह्या मेकअप साठी विक्रमनी प्रचंड मेहनत घेतली होती. इंदिरा गांधी यांचे फोटोज, भाषणाचे व्हिडिओज पाहिले होते शिवाय स्क्रीपट्स, सीन्स आणि कास्टिंगचा झाडून अभ्यासही केला होता. लारा दत्ता आणि इंदिरा गांधी यांच्या चेहऱ्यात काहीच साम्य नसतानाही त्यांनी याहीवेळी आपल्या कामाने लोकांना चाट पाडलं होतं. 

आणि आता आलेला हा 83. ह्या सगळ्या आणि अशा अनेक सिनेमांत किंवा विक्रम गायकवाड यांच्या कुठल्याही कामात एक कॉमन फॅक्टर जर असेल तर तो म्हणजे विक्रम गायकवाड यांचं कामाप्रती असणारं प्रेम, त्यांचं डेडिकेशन, प्रत्येक कॅरक्टरविषयीचा गाढा अभ्यास आणि त्यांच्या हातात असलेली जादू.

ह्या सगळ्यामुळेच ते कायम प्रेक्षकांना चकवतात आणि भुरळ पाडतात.

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.