आताच वक्तव्य सोडा पण गोखले अनेक वर्षे सीमेवरच्या जवानांसाठी खूप मदत करतायत

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही वादात अडकले आहेत. कारण काय तर कंगनाला दिलेला सपोर्ट. काही दिवसांपूर्वी कंगना म्हंटली होती,

1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती.

त्यावर गोखले म्हंटले,

कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले.

आता असं म्हंटल्यावर ट्रोलर्सच्या हाती आयत कोलीत मिळालं म्हणायच. पण गोखलेंनी कंगनाला जसा सपोर्ट केला आहे, अगदी तसेच मोदींवर ताशेरे ओढले होते. पुलवामा अटॅक वरून होणाऱ्या राजकारणावर ते म्हंटले होते,

माझी बांधिलकी कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही, तर शेतकरी, सैनिक आणि सर्वसामान्यांच्या दु:खाशी आहे. राजकीय नेत्यांकडून पुलवामावरून मते मागणे चुकीचे असून, सैन्याचा राजकीय वापर करू नये.

आता गोखले नुसतेच बोलत नाहीत तर त्यांनी सैन्यासाठी नेहमीच आर्थिक मदत देऊ केली आहे. ते बोलतात तसे वागतात ही. आता हे बाळकडू त्यांना त्यांच्या घरूनच मिळालंय म्हणायच. त्यांची आजी कमलाबाई, वडील चंद्रकांतराव व स्वत: विक्रमराव अशा गाेखलेंच्या तीन पिढ्यांनी अापला समाजकार्याचा वसा सुरू ठेवला आहे.

विक्रम गोखले यांच्या आई कमलाबाई. कमलबाईंची आई दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या नायिका मानल्या जातात. रघुनाथराव व कमलाबाई या दांपत्याचे चंद्रकांत हे पूत्र. तर चंद्रकांत यांचे पुत्र म्हणजे विक्रम गोखले. कमलाबाई चार वर्षांच्या असताना त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासुर या चित्रपटात काम केले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या संगीत उ:शाप या नाटकात कमलाबाईंची भूमिका होती. तेव्हापासून गोखले घराण्याच्या तिन्ही पिढ्या या सावरकरांच्या विचारांच्या अनुयायी आहेत. कमलाबाई यांना २५ व्या वर्षी वैधव्य आले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात अबला, त्याचप्रमाणे लष्करातील सैनिक यांना आपल्या परीने जेवढी मदत किंवा सहकार्य करता येईल तेवढे केले होते.

कमलाबाई यांच्याकडून हा वसा पुत्र चंद्रकांत यांनी घेतला. चंद्रकांत हे दरवर्षी एक लाख रुपये युद्धात परावलंबी झालेल्या सैनिकांना देत असत. त्यासाठी त्यांनी बँकेत काही रक्कम ठेवली होती. पण बँकेचा व्याजदर कमी झाल्यानंतर वर्षाला लाखभर रुपये मिळेनासे झाले.

अशावेळी चंद्रकांत यांनी आवश्यक तेवढीच वीज, पाणी वापरलं. अंघोळीसाठी पाणी तापवणं बंद केलं, साधे कपडे घातले. असे करून जमतील तेवढे पैसे वाचवले. जमेल तेवढ्या पैशांची बचत केली. पण सैनिकांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचा संकल्प मोडला नाही.  संस्थांनाही देणग्या दिल्या.

चंद्रकांत यांचे पुत्र विक्रम गोखले यांनी २५ वर्षांपूर्वी आपली आजी कमलाबाई यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला. या माध्यमातून ते आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्याचप्रमाणे अपंग मुलांच्या पुनर्वसनासाठीदेखील काही मदत दिली जाते. कैद्यांसाठीही त्यांनी सेवाकार्य केले आहे.

परदेशात गेलं तरी विक्रम गोखल्यांना आपल्या देशाविषयी आत्मीयता वाटते. जशी जमेल तशी बचत ते ही करतात याबाबत नाना पाटेकर एका ठिकाणी म्हंटले होते,

चंद्रकांत गोखले आणि आम्ही एका नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात गेलो होतो. तिथे दररोज आम्हाला जेवणासाठी पैसे मिळत असत. परंतु गोखले दिवसातून फक्त एकदाच जेवत असत. एका वेळच्या जेवणाचे पैसे त्यांनी साठवून ठेवले होते. जेव्हा परदेशातून भारतात परत आले तेव्हा त्यांनी आपल्याकडचे साठवलेले सुमारे हजार आठ डॉलर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे दिले. वाढदिवसाच्या विशिष्ट रक्कम सैनिक कल्याण निधीलाही देत असत.

अशाप्रकारे गोखले सैन्याला आपल्या परीने होईल तशी मदत करताना दिसतात. पण एका मुक्ताफळ उधळणाऱ्या मुलीला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात त्यांच्या आजवरच्या सगळ्या गोष्टींवर पाणी फेरल म्हणायच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.