कागलच्या विक्रमसिंह घाटगे यांनी साखर उद्योगात राज्याला ‘शाहू पॅटर्न’ शिकवला..

कोल्हापूर संस्थानचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवल्यास सर्वप्रथम जर कोणत्या व्यक्तीचं नाव सर्वांच्या नजरेसमोर येत असेल तर ते म्हणजे ‘राजर्षी शाहू महाराज’ यांचचं. त्यांनी केलेल्या अविरत कार्यांना कोल्हापूरचं नाव भारताच्या नकाशावरच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अजरामर केले होते. त्यांच्या याच विकासकार्याला पुढे न्यायचं काम कोल्हापूरमध्ये आधुनिक काळात कोणी केलं असेल तर ते म्हणजे

राजे विक्रमसिंह घाटगे यांनी.

राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे कागलचे घाटगे हे जनक घराणे. त्यामुळे विक्रमसिंह घाटगे हे नात्याने राजर्षि शाहू महाराज यांचे नातू. विक्रमसिंह घाटगे यांचे आजोबा पिराजीराव घाटगे यांचे लहान भाऊ असलेले शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले.

याच राजघराण्याच्या पार्श्वभूमीमुळे सामाजिक आणि आर्थिक विकास करणं हि आपली नैतिक जबाबदारी असल्याचं मानत विक्रमसिंह घाटगे यांनी कागल आणि तालुक्याच्या विकासकामांना सुरुवात केली. 

७० च्या दशकात कागलची ओळख म्हणजे पेन्शनरांच गाव अशी होती. हा परिसर देखील ८० टक्के ग्रामीण होता. इथले अनेक जण बैलगाडी करून दुसऱ्या तालुक्यात बैलगाडी करून ऊसतोडणी कामगार म्हणून जात असायचे. मात्र याच तालुक्यात विक्रमसिंह राजेंनी कारखाना निर्मितीच स्वप्न बघितलं. त्यासाठी मळ्यावरचा आपला राहता बंगला कारखाना ऑफिससाठी देऊन टाकला.

तब्बल ६ वर्ष पायाला भिंगरी बांधून तालुका पिंजून काढला. शेतकऱ्यांना एकत्र केलं, सभासद केलं. आणि यातूनच सहकारी तत्वावरच्या छत्रपती शाहू साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. मात्र जो पर्यंत नवीन कारखान्यातून साखर बाहेर पडत नाही तो पर्यंत माझा साखरपुडा करणारा नाही अशी शपथ देखील त्यांनी घेतली होती.

त्यानंतर ३० नोव्हेंबर १९८० रोजी छत्रपती शाहू  साखर कारखान्यासाठी सोनेरी दिवस उगवला. त्यादिवशी पहिला गळीत हंगाम पार पडला. त्यानंतर २४ मे १९८१ रोजी विक्रमसिंह घाटगे यांचा साखरपुडा पार पडला. पुढे याच कारखान्याने राज्याच्या साखर उद्योगात ‘शाहू पॅटर्न’आकाराला आणला होता. 

साखरेला राज्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून या कारखान्याला ओळखलं जातं. सोबतच आजपर्यंत या कारखान्याने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरची शेकडो बक्षीस मिळवली आहेत. २०१५ पर्यंत ५० कोटींचा स्वनिधी आणि मार्च २०१२ अखेर ७० कोटींचं नेटवर्क या कारखान्यानं केले होते.

एकाबाजूला इतर साखर कारखान्यांचा आर्थिक डोलारा ढासळत असताना सन २००३-०४ आणि २००५-०६ या वर्षांत शासकीय लेखापरीक्षणामध्ये अ+ असा दर्जा मिळविणारा एकमेव सहकारी साखर कारखाना हाच होता. त्यामुळे विरोधक देखील शाहू साखर कारखान्याला योग्य दर देणं शक्य आहे मग इतर कारखाने का देत नाहीत, असा सवाल विचारायचे. 

घाटगे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पद देखील भूषवलं होते.

विक्रमसिंह घाटगे यांनी कुस्तीला देखील नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. यातूनच भागातील बंद पडलेल्या तालमी पुन्हा सुरू केल्या पाहिजेत ही गोष्ट त्यांनी हेरली होती. त्यासाठी जिल्ह्यातील बंद पडलेल्या तालमींना पुन्हा सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले. बंद पडल्या तालमीला आर्थिक पाठबळ देण्याबरोबर कुस्ती मैदान साठी देखील कारखान्याच्या मार्फत आर्थिक तरतूद करून ठेवली.

ग्रामीण भागातील कुस्ती व इतर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शाहू कारखान्या मार्फत तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात येतात. गेल्या ४ दशकातील हिशोब केला तर तब्बल ८ ते १० कोटी रुपये पेक्षाही जास्त खर्च खेळावरती करणारा देशातील एकमेव कारखाना म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

यातून आजपर्यंत भारत पाटील सुनील पाटील, विक्रम कुराडे, तानाजी नरके, चंद्रहार पाटील, अस्लम काझी यांसारखे अनेक पैलवान उभे राहिले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाचा दबदबा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. १९७८ साली त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघात यश मिळविले ते अपक्ष आमदार म्हणून. तर १९८० साली ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते.

राज्यात युतीचे शासन असताना घाटगे यांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी राजकारणापेक्षा सहकारवर लक्ष केंद्रीत केलं. मात्र या जवळपास २५ वर्षांच्या काळात सदाशिवराव मंडलिक यांच्याशी कागलच्या राजकारणात त्यांचा सुमारे २५ वर्षे टोकाचा संघर्ष झाला.

९० च्या विधानसभा निवडणुकीत मंडलिकांनी घाटगेंना पराभूत केलं होतं. यानंतर मंडलिक मंत्री देखील झाले होते. 

मात्र आपल्या १० वर्षाच्या आमदारकीच्या काळात विक्रमसिंग घाटगे यांनी तालुक्यातील पाणी प्रश्नाला हात घातला. सिंचनाची व्यवस्था उभारून गावोगावी लिफ्ट इरिगेशनच्या संस्था निर्माण केल्या. आज ४ दशकानंतर देखील या संस्था सुरळीत सुरु आहेत. आणि केवळ सुरूच नाही तर यातील १७ पैकी १५ संस्था कर्जमुक्त देखील आहेत.

सोबतच शेतकऱ्यांना स्वस्त दरात खत, अवजारे, बी-बियाणं स्वस्तात मिळावे यासाठी अनेक विकास सोसायट्या आणि छत्रपती शाहू कृषी खरेदी विक्री संघाची स्थापना देखील त्यांनीच केली. त्याचबरोबर  ‘शाहू मिल्क अँड ऍग्रो प्रोड्यूस कंपनी’ची स्थापना करून त्यांनी दूध व्यवसायातही धवल क्रांती केली होती. 

आपल्या सभासदांच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी शिक्षण संकुलाची देखील उभारणी केली. 

अशा नेत्याचे आणि सहकारातून खऱ्या अर्थानं समृद्धी साकार करणाऱ्या नेत्याचं एप्रिल २०१५ मध्ये निधन झालं होतं. विशेष म्हणजे त्याच्या महिनाभर आधीच विक्रमसिहांचे कट्टर विरोधक असलेले सदाशिवराव मंडलिक यांचं निधन झालं होतं. तेव्हा ते ‘आता आमचा नंबर कधी..?’ असं म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या महिन्यातचं घाटगेंच निधन झालं होतं.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.