डोंगर फोडून पाटण तालुक्याचं भविष्य घडवणारा घाटाचा राजा

सत्तर ऐंशीच्या दशकात पाटण तालुक्याबद्द्ल राजकारणी म्हणायचे,

“डोंगरावरच्या लोकांना डोंगरावरच राहुद्या, ते जर खाली आले तर आपले राजकारण बिघडेल.”

सातारा जिल्ह्यातला पाटण तालुका. कोकणाला देशाशी जोडणारा पाटण हा कोयना नदीच्या खोऱ्यातला डोंगराळ भाग . या भागाबद्दल राजकारण्यांच्या मनात अनास्थाच असायची.

त्या काळात पाटणमध्ये फक्त कराड ते चिपळूण एकमेव पक्का रस्ता होता. तालुक्यातल्या अनेक गावात रस्तेच नव्हते एसटी पोहचणे लांबच राहिलं. एकाद्या गावात जायचे म्हटलं तर एक दिवस पुर्ण लागत असे.

परिस्थिती इतकी बिकट होती की डोंगराळ भागातल्या लोकांना आठवडा बाजारासाठी पाटणला यायचे म्हटले तरी आदल्या दिवशीच भाकरी बांधून प्रवासाला निघायला लागे. बाजारादिवशी बाजार करुन मुक्कामी राहून हे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला पायी चालत निघत.

पाटण तालुक्यात त्या काळात दवाखानेसुद्धा  खुप कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच गावात होते. गावातील कोणी व्यक्ती जर आजारी पडली तर उपचारासाठी दुसऱ्या गावात घेऊन जायचे म्हटले तर रस्ते नाहीत, वाहने नाहीत.

मग अशा वेळी त्या आजारी व्यक्तीला डोलीत किंवा डालग्यात घालून इतर काही लोक धावत-धावत उपचारासाठी दवाखाना असलेल्या गावी येत. येवढे जिवाच्या अंकाताने पळुनही बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती उपचारापुर्वीच दगावली जायची,असे हे जनावरांचे जीवन पाटण तालुक्यातील जनता जगत होती.

अशात १९८३ साली विक्रमसिंह पाटणकर यांची पाटणच्या आमदारपदी पहिल्यांदा निवड झाली. त्यांना ठाऊक होते तालुक्याच्या परिवर्तनाचा प्रवास रस्त्यांचे जाळे विणल्याशिवाय होणार नाही. आपल्या आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून याच ध्यासान त्यांना पछाडल.

याचाच परिणाम होता की, १९८३ ते १९८७ या ५ वर्षांच्या कालखंडात पाटण तालुक्यात एकूण ९७ रस्ते व त्यावरील शेकडो मोऱ्या, ११ ठिकाणी फरशी पुल, चाफेर धक्क्यावर बांधलेला कोयना नदीवरील पुल एवढी प्रचंड कामे हाती घेऊन पुर्ण करण्यात आली.

कोयनेच्या या खोऱ्यात पाऊसाचा जोर देखील जास्त. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहायच्या. पूर आल्यावर तालुक्यातल्या बऱ्याच गावांचा चार महिन्यासाठी संपर्क तुटायचा. विक्रमसिंह पाटणकरांनी अनेक नद्यांवर पूल उभा केले.

कितीही खर्च असला तरी रस्ते आणि पूल उभारणीला निधी कमी पडू दिला नाही. रस्त्यांचे जाळे विणत असताना त्यांनी अजुन एक जनतेच्या हिताची गोष्ट केली. ती म्हणजे हे सर्व रस्ते सरकारच्या ‘रोजगार-हमी’ योजनेतून बांधले त्यामुळे पाटण तालुक्यातील अनेक बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध झाला.

ही सगळी विकासकामे चालू असताना हा आमदार स्वतः तिथे उभा राहून काही गैरप्रकार होणार नाही ना याची काळजी घ्यायचा.

या डोंगराळ भागात कराड-साताऱ्यासारखे उद्योग उभारता येणार नाहीत हे त्यांनी वेळीच ओळखले होते म्हणून त्यांनी शेतीपुरक व्यवसायांच्या निर्मितीवर भर दिला.

त्यातूनच पुढे पाटण तालुका दुध संघ, सकस दुध डेअरी, कोयना अँग्रो यांची निर्मिती झाली. याच दूरदृष्टीने त्यांनी पवनउर्जा प्रकल्प उभा केला. अनेक तरुण तरुणीच्या हाताला काम दिल. शाळा कॉलेज काढून उच्चशिक्षणासाठी लांब कुठे जावे लागणार नाही याची काळजी घेतली.

डोंगर फोडले, घाट बांधले रस्त्यांचे जाळे उभारले पण यामुळ एक झालं लोकं एकमेकांच्या जवळ आली. विकास खऱ्या अर्थाने सुरु झाला. पाटण तालुका माणसात आला. आजही तालुक्यातल्या कोणत्यापण गावात जाऊन विचारलं की रस्ता कोणी बांधला तर उत्तर मिळत पाटणकर दादांनी बांधला.

ह्याच बांधलेल्या रस्त्यांनी आणि जोडलेल्या माणसांनी विक्रमसिंह पाटणकराना घाटाचा राजा ही ओळख मिळाली.

याच त्यांच्या कार्यामुळे वयाची पंचाहत्तरी उलटली तरी लोकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. आमदारकी मंत्रीपद या पदव्या त्यांच्या कार्याचं बायप्रोडक्ट म्हणून मिळाल्या पण या पेक्षाही घाटाचा राजा ही लोकांनी दिलेली पदवी ते अभिमानाने मिरवतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.