गावी फोन केला की पावसापाण्याआधी ‘गावात वारा कसा आहे’ हे विचारणारा लोकप्रतिनिधी.

शरद पवार हे मुख्यमंत्री होते तेव्हाचा किस्सा. ते कधीही सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले की मुक्कामाला त्यांचे सहकारी विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे उतरत. पाटणकर म्हणजे तेथील मोठे प्रस्थ. कोयना परिसरातील त्यांचं गाव मोठं रमणीय आहे.

डोंगर फोडून तिथे विणलेल्या रस्त्यांमुळे त्यांना तालुक्यात घाटांचा राजा म्हणून ओळखले जायचे. 

एकदा अशाच एका मुक्कामी पवार विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी गप्पा मारत बसले होते. तेव्हात्यांची नजर खिडकीतून दिसणाऱ्या डोंगरावर गेली. त्यांनी पाटणकर यांना विचारलं,

“त्या डोंगरावर काय आहे?”

पाटणकर म्हणाले,

“काही नाही. तो डोंगर मात्र आमच्या मालकीचा आहे. आम्ही तिथे येणारी फळ, लाकूडफाटा डोंगरात राहणाऱ्यांना घेण्याची मुभा दिली आहे.”

तेव्हा शरद पवारांनी त्यांना तिथल्या शिखरावर जायचं आहे अस सांगितल. पाटणकर ठीक आहे अस म्हणाले. पवारांनी आपल्या हेलिकॉप्टरच्या चालकाला सांगितलं,

आपल्याला उद्या त्या डोंगरावर जायचे आहे. सकाळी लवकर उठून तिथे उतरण्याची व्यवस्था होते का ते चक्कर मारून पाहून या

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पाटणकर व शरद पवार हेलिकॉप्टरने त्या डोंगरावर गेले.

प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यांचं हेलिकॉप्टर देखील हेलकावे खात होते.  कसबस हेलिकॉप्टर तिथे उतरलं. उतरल्यावर ही वाऱ्याचा वेग जबरदस्त आहे हे जाणवत होतं.

मुख्यमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना म्हणाले,

“इथल्या व्हेलॉसिटीचा अभ्यास केला पाहिजे. इथे पवनचक्की उभारता येईल. तुम्हीच का नाही यासाठी पुढाकार घेत?”

विक्रमसिंह पाटणकर तयार झाले. जर्मनीमध्ये वाऱ्याची व्हेलॉसिटी चेक करणाऱ्या संस्था आहेत. या संस्थांनी अभ्यास करून ही जागा पवनचक्की उभा करण्यासाठी अगदी योग्य आहे असा निर्वाळा दिला.

पुढे विक्रमसिंह पाटणकर यांनी २ कोटी रुपयात ४ पवनचक्क्या उभारल्या. त्यातून एक मेगावॅट वीज मिळू लागली. त्याकाळी तेवढ्या वीजनिर्मितीचा खर्च ४ कोटी इतका येत होता. वीजनिर्मितीच्या खर्चात निम्म्याने कपात करून क्लिन एनर्जी निर्माण होऊ शकते हे यातून लक्षात आले.

महाराष्ट्रात पवनचक्क्या उभारण्याची ही सुरवात होती.

एक छोटासा प्रसंग पण यातून आपली वाटचाल पर्यावरण पूरक सस्टेनेबल एनर्जीकडे जाण्यासाठी पुढे पडले गेले.

पुढे या परिसरात सुझलॉन, बजाज सारख्या कंपन्यानी गुंतवणूक केली.

तेव्हाचा पवनचक्कीचा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे कवठेमहांकाळ, पारनेर, पाथर्डी, शेवगाव अशा अनेक दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी पवनचक्कीसाठी दोन-तीन एकर जमिनी दिल्या. वर्षभरात पाचशेचं ही उत्पन्न नसलेल्या जमिनीत वर्षाला लाखो रुपये मिळू लागले.

सुरवातीला काही काळ पवनचक्क्यांच्या पंख्यामुळे ढग विखुरले जाऊन पाऊस निघून जातो असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला. यामुळे वाद झाले. पण पुढच्या दहा वर्षात इथला पाऊस एक इंचही कमी झाला नाही. राजकीय वादाचे ढग विखरून गेले.

आज या भागातील पवनचक्क्या महाराष्ट्राच्या उर्जा क्षेत्रातील एक माईलस्टोन म्हणून ओळखल्या जातात.

शरद पवार आपल्या लोक माझा सांगाती या आत्मचरित्रात गंमतीने म्हणतात,

“मुंबईमध्ये इतर लोकप्रतिनिधी जेव्हा आपापसात पावसापाण्याची चर्चा करतात तेव्हा विक्रमसिंह पाटणकर आपल्या गावी फोन करून आज वारा कसा आहे याची चौकशी करतात.”

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.