नागपुरात पोलिसांच्या काठ्या खाणाऱ्या तरुणाला बोलवून इंदिरा गांधींनी आमदारकीचं तिकीट दिलं

आणीबाणीच्या नंतरचा काळ. इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे इंदिरा आणि संजयचे सर्व भ्रष्ट कारभार बाहेर काढणार अशी भीष्म प्रतिज्ञा करून आले होते. त्यांच्यावर निरनिराळ्या केसेस चालू होत्या. कधीही या दोघांना अटक होईल याची शक्यता व्यक्त केली जात होती.

स्वातंत्र्यापासून सत्तेच्या छायेत वावरलेल्या इंदिरा गांधी कधी नव्हे ते नामोहरम झाल्या सारख्या वाटत होत्या. अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात होते. मीडियामधून सतत आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचाराची बातमी तिखट मीठ लावून प्रसारित केली जात होती. गर्दीने भरलेला त्यांच घर आता निर्मनुष्य झालं होतं.

एकूणच इंदिरा गांधी संपल्या अशीच सगळ्यांची धारणा झाली होती. सत्तेच्या राजकारणात कोणलाही त्यांची सावली सुद्धा नको होती.

हताश झालेल्या इंदिरा गांधी यांच्या मनात निवृत्तीचे विचार डोकावू लागले होते. अखेरचा सल्ला घेण्यासाठी म्हणून त्यांनी सर्वोदयी गांधीवादी नेते आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार आश्रम येथे जायचं ठरवलं. दिल्लीहून नागपूर विमानतळावर त्या आल्या. एकेकाळी पंतप्रधानांच्या थाटात येणाऱ्या इंदिराजींच्या भोवती कसलंही वलय नव्हतं.

सामान्य प्रवाशाप्रमाणे त्या विमानतळावर उतरल्या. पण पाहतात तर काय तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

इंदिरा गांधी कि जय च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. या लोकांना आवरण्याचा पोलीस आटोकाट प्रयत्न करत होते. वरून आदेश आले असल्यामुळे त्यांनी तिथे आधीच संचारबंदी लागू केली होती. पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता.

अखेर पोलिसांची आणि या तरुण कार्यकर्त्यांची झटापट सुरु झाली. पोलिसांनी त्यांना दडपण्यासाठी लाठीचार्ज सुरु केला. विमानतळावर गोंधळ झाला. या झटापटीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी निर्घृण लाठीमारात एकाचं तर डोकं फुटलं होतं.

इंदिरा गांधींना पोलिसांनी थेट पवनार येथे रवाना व्हायला लावलं. इकडे अनेक काँग्रेस कार्यकर्ते शासकीय रुग्णालयात भरती केले गेले होते. इंदिराजींनी विनोबांची भेट घेतली. त्यांनी चालत रहा असा संदेश घेतला. यातून योग्य अर्थ घेत इंदिरा गांधी पुन्हा दिल्लीला परतल्या.

जाताना त्यांनी नागपूर मध्ये रुग्णालयात जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली. डोके फुटलेल्या त्या तरुणाचं आक्रमक बोलणं त्या लक्षपूर्वक ऐकत होत्या.

नागपूरच्या त्या तरुण कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं इंदिरा गांधी या नावामागचा करिष्मा अजूनही कमी झालेला नाही. दिल्लीला परत जाताना त्या नवा उत्साह  नवा आत्मविश्वास घेऊन गेल्या.

यानंतर चित्र पालटत गेलं. त्यांची ती बिहारच्या बेलची येथे त्यांची हत्तीवरून भेट, कर्नाटकच्या चिकमंगळूर लोकसभा निवडणुकीत थाटात केलेलं पुनरागमन या त्यांच्या बाजूने गोष्टी घडत गेल्या. सगळे नेते सोडून गेले असतानाही इंदिरा गांधींनी १९८०च्या निवडणूका सहज जिंकल्या आणि अविश्वसनीय वाटेल अशा पद्धतीने त्या पुन्हा पंतप्रधान पदी बसल्या.

यानंतर लगेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक आल्या. इंदिरा गांधींच्या विजयानंतर पक्ष सोडून गेलेले नेते पुन्हा परतु लागले होते. काँग्रेसला पुन्हा झळाळी आली होती.

तिकिटांसाठी मारामारी सुरु झाली होती. तिकीट वाटपावेळी थेट पंतप्रधान कार्यालयातून एक सूचना आली.

दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या विमानतळावर लाठीमारात डोकं फुटलेल्या कार्यकर्त्याला तिकीट द्या.

ते होते विलास भाऊराव मुत्तेमवार.

कोणतीही सत्ताकारणाची पार्श्वभूमी नाही, घराणेशाहीचा वारसा नाही, पैशाचे पाठबळ नाही. चंद्रपूरच्या साध्या शेतकरी कुटुंबातला हा मुलगा. रोजगारासाठी नागपूरला आले. मजुरी करत शाळा शिकला. एका वर्तमानपत्रात नोकरीला लागला.

महाविद्यालयीन विद्यार्थी आंदोलनापासून ते राजकीय पटलावर चमकू लागले होते. नगरसेवक पदाची अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक हरले देखील होते. मोठमोठ्या दिग्गज नेत्यांना डावलून या तरुण जिद्दी कार्यकर्त्याला चिमूर मतदारसंघातून इंदिरा गांधींनी आमदारकीचं तिकीट दिले.

आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विलास मुत्तेमवार निवडून देखील आले. तिथून त्यांनी परत मागे वळून पाहिलं नाही. युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं, सलग चार वेळा खासदार बनले, केंद्रात मंत्रीपद भूषवलं.

इंदिरा गांधी यांनी कार्यकर्त्यांची नस बरोबर पकडली होती. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची त्यांना जाण होती. म्हणूनच कितीही संकटे आली तरी त्यावर पाय देऊन त्या पुनरागमन करू शकल्या. जनतेच्या संहासनावरून त्यांना हटवणे कोणाला जमले नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.