देशातील पहिलं आणि एकमेव स्वातंत्रसैनिकांच अधिवेशन भरवणारे नेते म्हणजे विलासकाका

यशवंतराव चव्हाण तेव्हा केंद्रात मंत्री होती. याचवेळी सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसचा पाया रचण्यात त्यांचा अग्रकम होता. सातारा जिल्ह्यातून कॉंग्रेसी नेत्यांना ताकद देणे, त्यांच्यापाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचं काम यशवंतराव चव्हाण करत होते.

यापैकींच एक नाव होतं ते दादासाहेब पाटील उंडाळकर यांच. वास्तविक दादासाहेब पाटील उंडाळकर यांच्याकडे जिल्ह्यातले स्वातंत्रसैनिक आपल्या मागण्या घेवून येत असतं. दादासाहेब देखील स्वातंत्रसैनिकांच काही अडलनडल तर थेट यशवंतरावांच्या कानावर घालत असत.

मात्र १९७२ साली दादासाहेब उंडाळकर यांच निधन झाल्याने या कामाला कुठेतरी खिळ बसली.

दादासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र विलासकाका उंडाळकर या ३०-३५ च्या तरुणाकडे स्वातंत्रसैनिक आपल्या मागण्या घेवून जावू लागले. वडिल गेले होते पण वडिलांनी जपलेला हा वारसा भक्कमपणे चालवण्याची जबाबदारी विलासकाका उंडाळकर यांच्याकडे आली होती.

विलासकाका उंडाळकर देखील आत्ता स्वांतत्र्य सैनिकांच म्हणणं यशवंतराव चव्हाणांपर्यन्त पोहचवण्याचं काम करू लागले.

साधारण १९७४ च्या आसपासची गोष्ट असावी,

यशवंतराव चव्हाण तेव्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात यशवंतराव म्हणाले, 

 

विलासराव,

दादासाहेबांनंतर तुम्ही पुढाकार घेवून मागण्या मांडताय. पण या मागण्यांसोबत या स्वातंत्र्य सैनिकांची एकजूट पण गरजेची आहे. तेव्हा त्यांच्या आठवणीत तुम्ही एखादा उपक्रम चालु करा. ज्यामुळे सगळे एकत्र येत राहतील. आणि सोबतच येणाऱ्या पिढीला देखील स्वातंत्र्य लढ्यातुन प्रेरणा मिळेल.

त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९७५ पासून स्वातंत्र्य सैनिकांचे छोटेखानी अधिवेशन घेण्याच ठरले. त्यासाठी बॅ. पी. जी. पाटील, आमदार पी. बी. पाटील या मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं. आणि सुरु झाले,

देशातील पहिले आणि एकमेव स्वातंत्र्य सैनिकांचे अधिवेशन.

सुरुवातील तालुका आणि जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं. त्यांचा आदरार्थी सत्कार करण्यात आला. त्यांच्या मागण्या, प्रश्न काय आहेत हे ऐकुण घेण्यात आले.

त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९७६ ला परराष्ट्रमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी या अधिवेशनाला हजेरी लावली. सोबत होते देशभक्त आबासाहेब आरवाडकर आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार. त्यानंतर १९७७ साली देखील मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सोबत यशवंतराव चव्हाण उपस्थित होते.

या दोन्ही अधिवेशनांना जिल्ह्याच्या बाहेरुन देखील स्वातंत्र्य सैनिकांनी हजेरी लावली होती. यात देखील मुख्यमंत्र्यांच्या समोर प्रश्न मांडल्याने स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न तातडीने सुटायचे.

त्यावेळी ३०० रुपये अशी पेन्शन मिळत होती. ती वाढवून मिळावी, ओळखपत्र मिळावं अशा मागण्या करण्यात येत होत्या. असे दै. पुढारीचे स्थानिक पत्रकार राजेंद्र यादव यांनी सांगितले.

थोड्या थोड्या अंतराने या मागण्या मान्य होत गेल्या.

१९८० पासून म्हणजे ज्या वर्षी विलासकाका पहिल्यांदा आमदार झाले त्यावर्षीपासून या अधिवेशनाची व्याप्ती वाढवण्यात आली. अगदी विदर्भ, मराठवाड्यातुन स्वातंत्र्य सैनिकांना बोलवण्यात आलं.

१९९२ पासून या अधिवेशनात ‘दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार’ देण्यात येवू लागला.

अधिवेशनाच वाढलेलं स्वरुप जर समजून घ्यायचं असलं तर २००९ साली या अधिवेशनाच निमंत्रण तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना देण्यात आलं होतं. आणि त्यांनी ते स्विकारलं देखील होतं.

त्यावर्षी देशभरातुन जवळपास ५ हजार स्वातंत्र्य सैनिक उपस्थित राहिले होते. त्यात जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ”दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.

एका अधिवेशनाच निमंत्रण तर थेट नेल्सन मंडेला यांनी देखील स्विकारलं होतं. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच येणं रद्द झालं होतं.

विलासकाका उंडाळकर जरी कॉंग्रेसचे सात वेळचे आमदार आणि नेते असले तरी या अधिवेशनाला त्यांनी अखेरपर्यंत पक्षीय व्यासपीठ होवू दिलं नाही.

म्हणूनच ना. ग. गोरे यांच्यासारखा समाजवादी नेता, माजी पंतप्रधान चंद्रशेखर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. पी. बी. सावंत, जेष्ठ कृषी तज्ञ पी. साईनाथ यांच्यासारखे कॉंग्रेसी नसलेले आणि राजकारणाचा संबंध नसलेले मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांचे म्हणणे ऐकुन घेतले.

१९७५ पासून सुरु झालेलं स्वातंत्र्य सैनिकांचे हे अधिवेशन आजतागयत भरवलं जात. अलिकडेच योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये हे अधिवेशन पार पडले होते.

राजकारणात वडिलांचा वारसा पुढे चालवणारे शेकडो राजकारणी देशाने बघितले. पण स्वातंत्र्य लढ्यातील वडिलांच्या वारस्याला या अधिवेशनाच्या माध्यमातुन जपणारा राजकारणी म्हणून विलासकाका पाटील उंडाळकर यांची ओळख राहिलं.

आज ४ जानेवारी रोजी पहाटे त्यांच निधन झालं.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Sam says

    4 march nai 4 janevari

Leave A Reply

Your email address will not be published.