विरोधक टिका करत होते, पण मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक खुद्द राष्ट्रपतींनी केलं होतं…

२६ जुलै २००५. महाराष्ट्राच्या विधासनभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं होतं. सगळे आमदार आपापल्या गावी परतत होते. रिमझिम पावसाळा सुरु होता. गावाकडे शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला होता.  इकडं मुंबई आपल्या नेहमीच्या वेगाने धावत होती.

साधारण दुपारी एक दीडच्या दरम्यान मुंबईत पाऊस वाढला. हां हां म्हणता म्हणता पावसाने जोर पकडला.खरं तर मुंबईकरांना मोठ्या पावसाची सवय होती. पण त्या दिवशीच्या पावसाचा नूरच वेगळा होता. जनतेला कल्पना नव्हती, हवामान खात्याला अंदाज नव्हता. भीषण अशी ती ढगफुटी होती. 

शंभर वर्षात पडला नाही असा पाऊस त्या दिवशी पडत होता. 

२६ जुलैला मुंबईत ९९४ मिलीमीटर इतक्या पावसाची विक्रमी नोंद झाली. भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण असलेल्या चेरापुंजीमध्ये १९१० साली ८३८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद केली गेली होती. चेरापुंजीचा हा विक्रम त्या दिवशी मुंबईच्या पावसाने मोडला. आभाळ फाटणं म्हणजे काय हे या दिवशी जुलैच्या मुंबईकरांनी अनुभवलं. या प्रचंड पावसामुळे मुंबई बुडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. 

मुंबईत झालेल्या तुफानी पावसामुळे मुंबईतील सखल भागात प्रचंड पाणी साचलं आणि रस्त्यावरील माणसं-मोटारी वाहून जाव्यात, अशी बिकट परिस्थिती तयार झाली. एकीकडे संततधार पडणारा पाऊस, दुसरीकडे पाण्याचा निचरा न होणं आणि तिसरीकडे समुद्राच्या भरतीचं पाणी शहरात घुसणं यामुळे परिस्थिती पाहता पाहता हाताबाहेर गेली.

उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणारे रस्ते बंद झाले. टॅक्सी, बस व खाजगी वाहने यांची ये-जा बंद झाली. पूर्ण शहराचा वीजपुरवठा बंद झाल्याने मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे सेवाही थांबली. टेलिफोन, मोबाईल बंद पडले.

मुंबईचं विमानतळही ठप्प झालं. घरं-इमारती पाण्याखाली बुडल्या. झोपडपट्ट्या पाण्याने वेढल्या गेल्या. कारखाने, कार्यालये व अन्य आस्थापने बंद पडली. लाखो लोक अडकून पडले. चाकरमाने आपापल्या कार्यालयांमध्ये अडकून पडले. शाळांमध्ये गेलेल्याचे हाल झाले.

अनेक लोक पाण्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडले. मोटारींमध्ये बसून राहिलेले लोक गुदमरून अथवा बुडून मेले. अनेक लोक बसेसच्या टपांवर, झाडांवर, इमारतींवर आणि जिथे शक्य असेल त्या उंच ठिकाणावर बसून राहिले. कल्पनेतही येणार नाहीत अशी दृश्यं मुंबईने या आपत्तीत पाहिली.

मुंबईवर ओढवलेल्या या आपत्तीचे खापर विरोधकांनी सरकारवर फोडले. हि घटना घडली तेव्हा राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसाची सुट्टी दिली आणि त्यामुळे लोकांपर्यन्त मदत व्यवस्थित पोहचली नाही असे आरोप झाले. पूर्वपरिस्थितीसाठी सरकार सज्ज नव्हते.

गेली अनेक वर्षे मुंबईतील मिठी नदीवर झालेली अतिक्रमणं, नदी व नाल्यांमध्ये केले गेलेले भराव, मुंबईच्या इंच न् इंच जमिनीवर बांधल्या गेलेल्या इमारती, मैदानांसह मोकळ्या जागांवर झालेली अतिक्रमणं आणि इमारतींभोवतालच्या जमिनीवरही केलं गेलेलं काँक्रीटीकरण या कारणांमुळे मुंबईत महापुराची स्थिती आली होती. 

मुंबईतील पुराची पाहणी करायला स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले. त्यांच्यासोबत पत्रकार मधुकर भावे देखील होते.  तेव्हा, चिखलात उभे राहून त्यांची पाहणी चालू असताना त्यांच्या हातातला मोबाइल वाजला. 

त्यावेळी पत्रकार मधुकर भावे त्यांच्या सोबतच होते. विलासरावांचा मोबाइल त्यांच्याच हातात होता. पलिकडून देशाचे महामहीम राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम बोलत होते. 

भावे यांनी मोबाइल झटकन विलासरावांच्या हातात दिला. डॉ. कलाम साहेब त्यांना सांगत होते,

‘मिस्टर मुख्यमंत्री, बहोत कठीन समयमे आप बहुत दिलसे काम कर रहे है। मै आपको देख रहा हॅूं। अगर मेरी तरफसे कुछ मदत चाहिये, तो मुझको बताईये…’

विलासरावांनी त्यांचे आभार मानले. विरोधकांकडून टीका होत असताना खुद्द राष्ट्रपतींच्या कडून कौतुकाचे शब्द विलासरावांना प्रेरणा देणारे ठरले.

पूर परिस्थितीची पाहणी करून ते थेट मंत्रालयात परतले. आल्या-आल्या त्यांनी तातडीची बैठक घेतली.  या बैठकीत विलासरावांनी एक मोठा निर्णय केला.

पूरग्रस्त भागातील प्रत्येक घरात 10 किलो गहु, 10 किलो तांदूळ आणि एक हजार रुपये रोख याचे वाटप केले जाणार. पुढच्या 48 तासांत त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध रित्या व युद्धपातळीवर हि मदत गरजवंतांपर्यंत पोहचवली. 

मात्र पुढील काही काळात प्रशासन आणि विलासरावांचे संबंध ताणले गेले होते. महापूर ओसरल्यावर ऑक्टोबरमधील दिवाळीत बोनससाठी शासकीय कर्मचार्‍यांनी अटीतटीची लढाई पुकारली. विलासरावांनी संघटनेच्या नेत्यांना बोलविले. त्यांना राज्याची आर्थिक स्थिती सांगितली.

विलासराव म्हणाले,

“तुम्ही या खुर्चीत बसा आणि बोनस देता येता का सांगा…. सध्या अडचण आहे, समजून घ्या. ज्या दिवशी बोनस देण्यासारखी परिस्थिती असेल त्या दिवशी तुम्ही मागणी न करता मी बोनस जाहीर करेन…”

अखेर कर्मचारी नेत्यांनी माघार घेतली. हस्तांदोलन करून मुख्यमंत्र्यांचा निरोप घेतला. पुढच्या दोन वर्षांत आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर विलासरावांनी शासकीय कर्मचार्‍यांना बोनस म्हणजे एक्स-ग्रेशिया जाहीर केला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.