लावणी बघण्यात दंग असलेल्या विलासरावांना फोन आला, “तुमचे २७ आमदार फुटले आहेत.”

विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म होती. राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीतील त्यांचं सरकार अपक्षांच्या टेकूवर टिकून होतं. भाजप आणि शिवसेना युतीच्या नेत्यांनी त्यांना अस्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न चालवले होते. सदा हसतमुख असणारे विलासराव देखील विरोधकांचे डाव आपल्या हुशारीने हाणून पाडण्यात तरबेज होते.

अशी अनेक संकटे त्यांनी पचवली मात्र एक संकट मात्र त्यांना देखील अनपेक्षित होतं.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा काळ. तस बघायला गेलं तर हे अधिवेशन आपल्या चर्चा प्रश्न विधानसभेतील गदारोळासाठी जितकं प्रसिद्ध आहे तितकंच ते संध्याकाळी रंगणारे आमदारांच्या  हुरडा पार्टी, लावणी महोत्सव, लोकनाट्य वगैरे साठी डॆहील ओळखलं जातं. दिवस एकमेकांशी भांडणारे सत्ताधारी व विरोधक संध्याकाळच्या बैठकीला मांडीला मांडी लावून ठेका धरताना दिसतात.

असाच एक लावणीचा कार्यक्रम नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख हजर होते. एकेकाळी सांस्कृतिक मंत्रालय सांभाळलेले विलासराव हे सिनेमा, नाटक, संगीत याचे रसिक मानले जायचे. त्यांना स्वतःला तबला वाजवण्याची आवड होती. ग्रामीण लोककलांना खरी दाद देणारं नेतृत्व म्हणून विलासरावांना ओळखलं जायचं.

दिवसभराच्या राजकीय दगदगीतुन विसावा म्हणून ते या लावणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

रात्रीचे साधारण साडे दहा वाजले असतील. जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांना एका विरोधी पक्षातल्या जेष्ठ आमदाराचा फोन आला.

“संपादक, अहो घ्या बातमी.

द्वादशीवार यांनी सावधपणे काय म्हणून विचारलं. ते आमदार म्हणाले,

‘उद्या हे विलासरावांचे लावणी सरकार जाणार. सत्तावीस आमदार मागणी विधेयकाविरुद्ध मतदान करणार. तुम्हाला म्हणून फोन केला. बघा उद्या यांची फजिती.’

द्वादशीवार यांना ते काय पटेना. त्यांची खात्री पटावी म्हणून ते विरोधी आमदार म्हणाले,

‘अहो, मी तिथूनच बोलतोय. सगळे जण खच्चून आमदार निवासाच्या खोलीत एकत्र आहेत. सगळे ठाम.’

द्वादशीवार यांना धक्काच बसला. ते आमदार कोण कोण विलासरावांच्या विरोधात त्या खोलात जमा झाले आहेत याची नावे सांगू लागले. द्वादशीवार यांना खात्री पटली की आघाडी सरकार पाडण्यासाठी मोठा प्लॅन केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी असलेल्या विधेयकाविरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार मतदान करून विलासरावांना खाली खेचण्याची सगळी तयारी झाली होती.

खरं तर द्वादशीवार यांची आणि विलासराव देशमुखांची जुनी व चांगली मैत्री होती. त्यांना प्रश्न पडला की या घटनेची बातमी करायची की आपल्या मित्राला सावध करायच ? अखेर त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीने मैत्रीच्या दिशेने कौल दिला.

त्यांनी लगेच विलासरावांना मोबाईलवर फोन लावला. त्यांच्या एका सहकाऱ्याने तो फोन उचलला. त्याने द्वादशीवार यांना सांगितलं,

‘साहेब लावणी ऐकताहेत’.

सुरेश द्वादशीवार यांनी काकुळतीने त्यांना सांगितलं की लवकर विलासरावांना बाहेर बोलवा. नाहीतर आहेत तेथे त्यांना फोन नेऊन द्या.

जरा वेळाने स्वतः विलासरावांचा बेफिकीर आणि हसरा आवाज आला,

‘काय म्हणताहात?’

मागे ढोलकीचा आणि लावणीचा आवाज येत होता. द्वादशीवार म्हणाले,

‘अहो लावणी काय ऐकताय? तुमचे सरकार वाचवा. सत्तावीस जण बसलेत तुमच्याविरुद्ध. आमदार निवासाच्या खोली क्र…. मध्ये. ते तुमच्या विरोधात मतदानाचं ठरवताहेत उद्या.’

मुख्यमंत्र्याना देखील धक्काच बसला. त्यांना पटेचना असं झालंय. द्वादशीवार यांनी आपल्याला आलेल्या फोनबद्दल सांगितलं. ते नाव ऐकताच विलासराव म्हणाले,

‘मी लागलीच बाहेर येतो.’

त्यांच्या शेजारीच भाजपचे एक जेष्ठ आमदार बसले होते. त्यांनी देखील हा संवाद ऐकला.

विलासराव देशमुखांनी बाहेर येऊन सुरेश द्वादशीवार यांना फोन लावला आणि शरद पवारांना देखील या घटनेबद्दल सांगा असं सांगितलं.ते स्वतः त्या आमदार निवासाच्या खोलीवर निघून गेले. द्वादशीवार यांचा शरद पवार यांना अफोन लागला तो वर त्यांना ही सगळी बातमी पोहचली होती. त्यांनी भराभर सूत्रे हलवली. त्या आमदार निवासाच्या खोलीत सगळी दाणादाण उडाली. विलासरावांनी आपल्या विरुद्ध सुरु झालेलं बंड मोडून काढलं होतं.

सरकार पडण्यापर्यंत आलेलं संकट अगदी थोडक्यात निभावलं. आणि हे सगळं घडलं होतं द्वादशीवार यांच्या एका फोन मुळ. 

ज्यांनी द्वादशीवार यांना आतली खबर दिली होती ते आमदार एकदा त्यांना भेटले. त्यांनी सगळ्यांदेखत  द्वादशीवार यांना ‘त्या रात्री तुम्हीच आमचा डाव घालविला बरं का’ असं सांगितलं.

सुरेश द्वादशीवार म्हणतात पत्रकार म्हणून चुकलो की मित्र म्हणून बरोबर ठरलो, या प्रश्नाचे खरे उत्तर मला अजून मिळाले नाही. मात्र मी केले त्याचा पश्चात्ताप मला कधी झाला नाही

सन्दर्भ- विलासराव, आता भेट कधी. सुरेश द्वादशीवार 

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Rahul says

    Best

Leave A Reply

Your email address will not be published.