साधारण १० वर्षांपूर्वीची घटना आहे..नांदेडमध्ये स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चालू होता. याच समारंभासाठी विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण हे एकत्र एकाच स्टेज वर जमले होते.
म्हणजे एकाच पक्षाचे दोन मोठे नेते एकत्र येण्यात वावगे काय असे तुम्हाला वाटेल मात्र तेंव्हा या दोन्ही नेत्यांचं एकत्र येणं चर्चेचा विषय होता कारण तेंव्हा या दोघांमधील शीतयुद्ध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं.
याच कार्यक्रमात ‘आदर्श’ घोटाळाप्रकरणी चर्चेत आलेले तत्कालीन केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यात दिलजमाई झाली होती. २००८ पासून असलेली कटूता संपूष्टात आली असून आमच्यात आता कोणताही वाद नाही असं या दोन्ही नेत्यांनी भर कार्यक्रमात जाहीर केलेलं.
याच दीक्षांत समारंभात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले होते कि, आदर्श’ घोटाळाप्रकरणात अडकलेल्या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हातून विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येऊन नये म्हणून या विध्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी परिषदेच्या विद्यार्थ्यांना त्याआधीच ताब्यात घेतले.
असो या दोन्ही नेत्यांचा वादाचा विषय काय होतं ते पाहुया…
याच दरम्यान २००८ च्या वर्षांत जो मुंबई हल्ला झालेला. या हल्ल्यानंतर विलासराव यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आणि मुख्यमंत्रीपदा जागी अशोकराव चव्हाणांची वर्णी लागली. विलासरावांचे मुख्यमंत्रीपद गेलं अन तेच पद अशोक चव्हाणांना मिळालं आणि त्यानंतर या दोघांमधील वादाची ठिणगी पडली.
त्याचं निमित्त म्हणजे, मुख्यमंत्री झाल्यानंतर चव्हाणांनी नांदेड येथे विभागीय आयुक्तालय नेण्याचा निर्णय घेतला.
देशमुख गेल्यामुळे मराठवाड्यातूनच मुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्याने चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली. तर विषय असा होता कि, जेंव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना हेच आयुक्तालय लातूरला घेण्याचे निश्चित झाले होते. आणि त्यात चव्हाण यांनी परस्पर हे आयुक्तालय नांदेडला नेण्याचा निर्णय घेतला होता आणि मग वाद चालू झाला. दोघांमधून विस्तवही जात नव्हता.
इतका कि, पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्यात हे दोन्ही माजी मुख्यमंत्री एकत्र आलेले पण दोघांनीही एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं.
पण जेंव्हा हा आदर्श’ घोटाळा प्रकरण चालू झालं आणि दोघेही अडचणीत आले आणि एकमेकांच्या बचावासाठी एकत्र आले होते अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण तेंव्हा देखील अशी परिस्थिती होती कि, अशोकराव चव्हाण यांच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात ठेवणे कठीण जात होती. आणि ताब्यात ठेवायची असेल तर त्यासाठी विलासरावांचे समर्थक असलेल्या प्रताप पाटील यांचा पाठिंबा आवश्यक होता.
आणि हाच पाठींबा विलासरावांचे पूत्र अमित देशमुख यांच्याच मध्यस्थीने मिळाला असल्यामुळेच अशोकरावांना जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या ताब्यात ठेवता आले होते.
दोघांमधील मतभेद संपण्यासाठी हे तर कारण होतंच तसंच वर बोलल्याप्रमाणे आदर्श घोटाळ्याचं देखील कारण होतं.
याच दिलजमाईचा एक किस्सा देखील महत्वाचा आहे, त्याचदरम्यान विलासरावांनी अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तेंव्हा त्यांनी त्यांच्या काही सहकार्यांना सांगितले कि, मी जे काही केले ते योग्यच आहे असं मला वाटतं कारण, “कितीही झालं तरी अशोक चव्हाण माझ्या लहान भावा प्रमाणेच आहे, शंकरराव चव्हाण यांनी माझ्यावर मुलाप्रमाणेच प्रेम केले हे मी विसरू शकत नाही”.
अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलं आहे. तसेच काँग्रेसला वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शंकरराव चव्हाणांमुळे काँग्रेस मराठवाड्यात मजबूत झाली. सत्ताविरोधी लाट असतानाही केवळ चव्हाणांच्या खंबीर नेतृत्वामुळेच काँग्रेसला मराठवाड्यातून कुणी हटवू शकले नव्हते. आणि कॉंग्रेसला मजबूत करणाऱ्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली विलासराव राजकारणात सक्रीय झाले होते.
विलासराव देशमुख शंकरराव चव्हाणांचे कार्यकर्ते होते.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्थापनेवरून देशमुख व चव्हाण यांच्यात मतभेद निर्माण होऊन मतभेद इतक्या टोकाला गेले होते की एकमेकांच्या कार्यक्रमालाही बोलावणे बंद झाले होते. पण दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मात्र परिस्थिती बदलली. देशमुख आणि चव्हाण कुटुंबिय पुन्हा जवळ आले होते.
२०१९ मध्ये आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्व राज्यात वाढण्यासाठी मोठा भाऊ म्हणून अशोक चव्हाण यांनी बळ दिलं होतं.
हे हि वाच भिडू :
- बिचाऱ्या अशोक चव्हाणांना दाऊद समजून अमिताभ बच्चनला ट्रोल करण्यात आलेलं..
- PVR मल्टिप्लेक्स कंपनी रितेश देशमुख यांच्या मालकीची आहे?
- विलासराव देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचा नाही.