पंचायत समितीचा उपसभापती भर पावसात छत्री घेऊन गावासाठी पाईपलाईन करून घेत होता

विलासराव देशमुख. असे मोजके राजकारणी असतील ज्यांच्या टीकाकारांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांची आठवण काढली तरी लोक हळवे होतात. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या दिलदारपणाचे, भाषणाचे, रुबाबदार दिसण्याचे किस्से सांगितले जातात. आजही कार्यकर्त्यांच्या पुढे त्यांचा आदर्श ठेवला जातो.

काँग्रेसचा शेवटचा लोकनेता

कै. विलासराव दगडोजीराव देशमुख

विलासराव देशमुखांना घरात देशमुखीचा वारसा होता. बाभळगाव मध्ये त्यांची मोठी गढी होती. या गढीत सगळे एकमेकांना अहो जाहो म्हणायचे. सर्वप्रकारची संपन्नता त्यांच्या गढीत होती. विलासरावांचं प्राथमिक शिक्षण बाभुळगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. पुढे कॉलेजसाठी ते पुण्याला आले. सुप्रसिद्ध अशा आयएलएस विद्यालयातून एलएलबीची डिग्री घेतली. पुण्यातच काही काळ वकिलीची प्रॅक्टिस देखील केली.

पण त्यांचा सुरवातीपासूनच पिंड राजकारणाचा होता. पुण्याच्या युवक काँग्रेस संघटनेत ते सक्रिय झालेले होते. विद्यार्थी चळवळीत त्यांचा सहभाग होताच. अखेर राजकारणाच्या ओढीनेच त्यांनी पुणे सोडलं व लातूरला परतले.

 गावकऱ्यांच्या नजरेत देशमुखाच्या पोरांन पुण्यात नाव कमावलेलं. बाभळगावच्या सरपंच पदी त्यांची निवड झाली. 

विलासरावांना फक्त आपल्या गावाच्या परिघापुरतं सीमित राहायचं नव्हतं.त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यावेळच्या कायद्यानुसार जिल्हा परिषदेचा सदस्य पंचायत समितीचा पदसिद्ध सदस्य असायचा. त्यामुळे दोन्हीकडे काम करता यायचं. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक लागल्यानंतर विलासराव देशमुखांनी सभापती होण्यासाठी अर्ज भरला.

शिवराज पाटील चाकूरकर आमदार होते. त्यांच्या घरी बैठक झाली. त्याला शिवाजीराव पाटील निलंगेकर, यशवंतराव नाडे हजर होते. यशवंतरावांना सभापती करण्याचा निर्णय जवळपास झाला होता. विलासराव देशमुखांना उपसभापती होण्याचा आग्रह धरण्यात आला.

विलासराव सांगतात,

मी पुण्यातून शिकून आल्यामुळे मला उपसभापती होण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी नकार दिल्यानंतर शिवाजीराव निलंगेकरांनी माझी समजूत काढली. राजकारणात चालून आलेली कोणत्याही पदाची संधी सोडायची नसते, असं त्यांनी माझ्या मनावर ठसवलं. शेवटी थोड्याशा नाराजीनेच मी उपसभापती झालो. 

त्या वेळी पंचायत समितीला ६० हजारांचं बजेट होतं. ग्रामपंचायतीच्या बजेटला मान्यता देण्याचं काम पंचायत समितीकडे असे. त्या मुरूडच्या ग्रामपंचायतीचं बजेट दीड लाख होतं अन् त्यांचं बजेट मंजूर करायचे अधिकार असलेल्या पंचायत समितीला ६० हजारांचं बजेट. तेव्हा लहानशा इमारतीत आल्यानंतर उपसभापतीसाठीच काय, सभापतीसाठीसुद्धा बसण्याची सोय नव्हती.

तिथल्या एका स्टोअर रूममध्ये विलासराव देशमुखांनी स्वत: दोन खुर्च्या टाकल्या. एकावर सभापती म्हणून यशवंतराव नाडे आणि दुसऱ्यावर उपसभापती म्हणून ते बसायचे. यशवंतराव मुरूडचे रहिवासी असल्यामुळे ते तिकडेच राहायचे. 

विलासराव सांगतात मला काहीच उद्योग नव्हता… उपसभापती झाल्यावर मी अंगातला वकिलाचा काळा कोट घरातल्या खुंटीवर अडकवून ठेवला होता. त्यामुळे मी सकाळी १० वाजताच पंचायत समितीत येऊन बसायचो… दुपारी गावाकडे जायचं किंवा सभापतीच्या क्वार्टरमध्ये आराम करायचा. खेड्यापाड्यातले लोक काहीबाही कामासाठी यायचे. कुणी तहसीलदारांना फोन करायला सांगायचं तर कुणी पोलिस ठाण्यात. कुणाचं कोणतंच काम टाळायचं नाही असं ठरवलं होतं. त्यातून माणसे जोडण्याचा छंद जडला. 

 विलासरावांनी ज्यांची कामे केली ते लोक त्यांच्या गावाकडे या, असे सांगायचे. पण कुठे फिरायचं म्हटलं तर गाडी पाहिजे. बीडीओ आणि सभापती या दोघांत एक जीप असायची. बीडीओच ती जीप वापरायचे. त्याच जीपवर विलासराव ड्रायव्हिंग शिकले. 

त्यांचे मित्र बब्रुवान काळे यांच्याकडे राजदूत होती. त्यांच्या गाडीवर बसून दोघे फिरायचे. काळे आले नाही की मग एसटीने फिरायचे. रस्ते असले होते की गाडीतून उतरल्यावर चेह-यावर सगळी धूळ. असा माखलेला चेहरा धुऊन मग विलासराव लोकांना भेटायचे. तेव्हा तर एसटीही नसायची. 

बोपल्याला एसटी सुरू करा, अशी लोकांची मागणी होती. तेव्हा विलासरावांनी बसने फिरून रूट सर्व्हे देखील केला. 

ते सांगतात,

 बोरी गावात पाइपलाइनचे काम सुरू होते. गावातलेही कुणीच यायचे नाही. मी एकटाच छत्री घेऊन पावसात उभा राहून पाइपलाइन करून घेतली. 

उमरग्याला रस्त्याची मागणी होती. पण गंभीरे नावाच्या व्यक्तीने मध्येच रस्ता आडवला. ते रस्त्यासाठी आपलं शेत देण्यासाठी तयार नव्हते. विलासराव आंदोलकांना जाऊन भेटले. त्यांना घेऊन उमरग्यात गेले. गंभीरे यांची समजूत काढली. त्यांना सांगितलं,

 ‘जाऊ द्या, देऊन टाका शेत… रस्ता होईल…’ 

विलासरावांनी दिलेल्या शब्दामुळे गंभीरे यांनी शेत दिले, रस्ता झाला. त्या वेळी भातांगळी या गावात तर अजून वीजच पोहचली नव्हती. लोक नेहमी मागणी करायचे. विलासराव कंटाळून एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरकडे गेले. तेव्हा इंजिनियर साहेब म्हणाले,

 “चला, थेट गावातच जाऊन बघू…”

त्यांच्याकडे सरकारी जीप होती. विलासरावांकडे वाहनच नव्हते. अखेर त्यांच्याच जीपमध्ये मागच्या सीटवर बसून ते भातांगळीला गेले. इंजिनियर साहेबानी खांब मंजूर केले. ते घेऊन जाण्याची अडचण होती.  विलासरावांनी बैलगाडीतून खांब नेले.  आपल्या डोळ्यासमोर ते उभे करायला लावले. पुढे गावात वीज आली. 

अनेकांना वाटत विलासराव लातूरचे देशमुख होते म्हणून त्यांना राजकारणात संधी मिळत गेली. पण तस नव्हतं तर त्यांनी लातूर भागात धुळीचे रस्ते तुडवून खेडोपाडी जाऊन काम केलं म्हणून ते मोठे झाले. ते  सांगतात,

लोकांची कामं केली तर लोक लक्षात ठेवतात. या सगळ्याचा फायदा ८४ च्या निवडणुकीत झाला. पुढे आमदार झालो. मंत्री-मुख्यमंत्री झालो. म्हणून पंचायत समिती या माझ्या राजकीय जीवनाची मातृसंस्था ठरली.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. समाधान खोचरे says

    विलासराव जी आणि भाड्याचे माजी.आमदार धनाजी साठे पुण्यात वर्ग मित्र. सांगली तील जुन पैलवान मल्लसम्राट विष्णूपंत पाटील सावर्डेकर हे विलासराव रावजींच्या मावसबहिणींचे पती.

Leave A Reply

Your email address will not be published.