लातूरच्या गढीचे देशमुख असूनही विलासराव पुण्यात गरवारे कॉलेजच्या लॅबमध्ये नोकरी करायचे.

असे मोजके राजकारणी असतील ज्यांच्या टीकाकारांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांची आठवण काढली तरी लोक हळवे होतात. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या दिलदारपणाचे, भाषणाचे, रुबाबदार दिसण्याचे किस्से सांगितले जातात. आजही कार्यकर्त्यांच्या पुढे त्यांचा आदर्श ठेवला जातो.

काँग्रेसचा शेवटचा लोकनेता

कै. विलासराव दगडोजीराव देशमुख

विलासराव देशमुखांना घरात देशमुखीचा वारसा होता. बाभळगाव मध्ये त्यांची मोठी गढी होती. या गढीत सगळे एकमेकांना अहो जाहो म्हणायचे. सर्वप्रकारची संपन्नता त्यांच्या गढीत होती. विलासरावांचं प्राथमिक शिक्षण बाभुळगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. पुढे कॉलेजसाठी त्यांनी लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं,

पण वडिलांचा आग्रह पुण्यात जा. पुण्यात जा शिक्षण घे, मोठ्ठा हो. विलासरावांना मोठ्या शहरात फक्त कॉलेज नाही तर जगायला शिकायला मिळेल हे वडिलांनी ओळखलं होतं.

पिताजींच्या आदेशावर विलसराव पुण्यात आले आणि त्यांच इथंल्या गरवारे मध्ये कॉलेज सुरू झालं. लातूरचा देशमुखी इथं गळून पडलेली. अहोजावो ची जागा अरेतुरेनं घेतली. देशमुखी जगलेल्या विलासरावांना ते झेपलं नाही. अशातच निमित्त घडलं ते पानशेतचं धरण फुटण्याचं. विलासरावांनी थेट बाभुळगाव गाठलं. गड्या आपला गाव बरा. प्रत्येकजण शहराला भितो. विलासराव देखील भिलेले. अशा वेळी पुन्हा बाप जागा होतो. महिना दोन महिना गावात राहिले आणि परत स्वारी पुण्यात आली.

गावचा देशमुख आत्ता जमिनीवर यायला लागलेला. पुण्यात विलासरावांनी काय कमवलं अस त्यांना कोणीतरी विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते दोस्त. आपण गावखेड्यातली माणसं पुण्या-मुंबईत येतोच ते मुळी दोस्त कमवायला. विलासरावांनी देखील तेच केलं होतं.

विलासराव गरवारेतून बीएस्सी करत होते. तेव्हा विलासरावांच्या सोबत असायची ती “जावा”.

कर्वेनगरच्या एका हॉस्टेलमध्ये ते रहायचे, पुढे  MES हॉस्टेल आणि त्यानंतरच लॉ कॉलेजचं होस्टेल. विलासराव टप्याटप्याने बदलत गेले. १०-१२ वर्षाच्या पुण्याच्या प्रवासात हा माणूस आतून बाहेरून राजहंस झाला.

जयंत बर्वे, वैद्य, नागनाथ फटाले, प्रा. वर्तक अस त्यांच मित्रमंडळ. जावा आणि ते अस समीकरण होतं. जावावरून ते एकदा थेट हैद्राबादला जावून आले. हक्काच ठिकाण होतं कॅफे पॅराडाईज. MES च्या व्हॉलीबॉल टिममधून खेळायचे. डेक्कन जिमखान्यावर असायचे. पूना कॉफी हाऊसला पडिक असायचे आणि बिनाका गीतमाला ऐकायचे. नाटकात काम केलं. बापाच्या पैशावर शिकायला आलेल्या पोरानं जे काही करायला हवं ते सगळं त्यांनी केलं.

बीएस्सी झाल्यानंतर देशमुखीचा जोर ओसरू लागलेला. आत्ता विलासरावांना शहराने ओळख द्यायला सुरवात केली होती.

त्यांना राजकारण खुणावत होतं पण त्या आधी कायद्याचं शिक्षण घ्यायचं असं विलासरावांनी ठरवलं. आयएलएस लॉ कॉलेजला अॅडमीशन मिळालं.

या काळातल्या विलासरावांच्या सर्वात जवळच्या मित्राच्या म्हणजेच सदानंद वर्तक यांच्या पत्नी नीलिमा वर्तक तेव्हाच्या आठवणी सांगताना म्हणतात,

विलासराव देशमुखांनी आयएलएसमध्ये शिकत असताना पार्ट टाइम नोकरी करण्यास सुरवात केली. गरवारे कॉलेजच्या फिजिक्स लॅबमध्ये डेमॉन्स्ट्रेटरची ती नोकरी. विद्यार्थ्यांना वेगवेगळे इक्विमेंट्स, मशीन प्रोडक्टस कसे वापरतात हे दाखवणे त्यांचं मुख्य काम होतं. सदानंद वर्तक देखील याच काळात प्रोफेसर म्हणून लागले होते. दोघांची कॉलेजच्या काळातली मैत्री इथे देखील कायम राहिली.

तस बघायला गेलं तर नोकरी करुन शिकण्याची गरज नव्हती. तरिही माणसाला शहर कळलेलं. रोज तीन तास नोकरी आणि कॉलेज असा दिवस सुरू व्हायचा.

याच काळात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात देखील सहभाग घेण्यास सुरवात केली. त्यांचे सहकारी व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष उल्हास पवार त्याकाळातील आठवण सांगतात.

१९७१ साली पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक होती. मोहन धारिया हे कॉंग्रेसकडून उभे होते. विलासराव लॉच्या शेवटच्या वर्षाला होते. ते जिथे नोकरीला होते त्या गरवारे कॉलेजमध्ये देखील मतदानकेंद्र होतं.

विलासरावांना पुणे काँग्रेस भवनच्या वतीने मतदाना दिवशी गरवारेच्या मतदान केंद्रांवर स्लिप वाटायचं काम दिलं होतं. ते सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्लिपा वाटत होते.

उल्हास पवार शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असल्याने उमेदवार मोहन धारिया यांच्याबरोबर शहरातील सर्व केंद्रांना भेटी देत होते. ते जेव्हा गरवारे महाविद्यालयाच्या केंद्रावर पोचले तेव्हा तेथे विलासराव देशमुख स्लिप वाटत होते.

उल्हास पवारांनी धारिया यांच्याशी विलासरांवाची ओळख करून दिली व लॉ करीत असलेला एक चांगला कार्यकर्ता असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर धारिया यांनी विलासरावांची पाठ थोपटली व वकील झालात तरी राजकारणात नक्की या, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असे सांगितले. 

विलासरावांनी आयएलएसमध्ये  लॉ पुर्ण केलं आणि ते अॅड. शिवाजीराव दुर्वें यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करु लागले. दुर्वे वकिल हे फौजदारी संभाळणारे. देशमुखांना फौजदारीचा भलताच अनुभव. झालं अशिलाला घेवून कधी पौंडच्या कोर्टात तर कधी खडकीला.  तारखा घेणं, आरोपीला सोडवणं, जामिन मंजूर करुन घेणं हि सगळी कामं सुरू झाली.

दोन अडीच वर्ष विलासराव प्रॅक्टिस करत राहिले.

कॉलेज सुटलं, वकिली सुरू झाली. गावकऱ्यांच्या नजरेत देशमुखाच्या पोरांन पुण्यात नाव कमावलेलं. आत्ता वेळ होती कायमचं काहीतरी करायची. गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी विलासराव परत आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.