तेव्हा वाटलेलं ८ पक्षांची आघाडी असलेलं २ रिमोट वालं आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही..
गेली अनेक दिवस चर्चा सुरु आहे की महाविकास आघाडीचे सरकार पडणार राष्ट्रपती राजवट येणार. भारतीय जनता पक्षाचे नेते तर यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. आधीच कोरोनाचं संकट त्यात सरकारमधल्या तीन पक्षांच्या तीन तऱ्हा. चंद्रकांत दादा पाटील तर म्हणतात
महाभकास आघाडी प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. परंतु छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस ने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करत रसातळाला नेण्याचं काम केलं आहे.
असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांना अनेक लूज बॉल दिलेत आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लूज बॉलवर षटकार ठोकत सुटलेत.
त्यांच्या आरोपांच्या धडाक्यामुळे राज्याचे वनमंत्री, गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला. आणखीन काही मंत्र्यांवर टांगती तलवार आहे. विरोधकच काय तर खुद्द महा आघाडीच्या कार्यकर्त्यांना देखील आता सरकार पडणार असं वाटतंय.
असंच काहीस वीस वर्षांपूर्वी देखील घडलेलं.
१९९९ सालच्या विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेना भाजप युती विरुद्ध कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही तिरंगी लढत होती.
बाळासाहेब ठाकरे फॉर्मात होते. त्यांच्या आणि वाजपेयींच्या प्रचारसभांनी अख्खा महाराष्ट्र दणाणून गेला होता. पवारांनी देखील सभांचा धडाका लावला होता. त्यामानाने मोठे नेते सोडून गेलेल्या कॉंग्रेसचा प्रचार सोनियांनी अडखळत वाचून दाखवलेल्या हिंदी भाषणावर अवलंबून होता. त्याची चांगलीच टर्र सत्ताधारी नेते उडवत होते.
निकाल जेव्हा हाती आले तेव्हा सगळ्यांची गणिते चुकली. केंद्रात अपेक्षेप्रमाणे वाजपेयींनी विजय मिळवला मात्र महाराष्ट्रात युतीला म्हणावे तसे मतदान झाले नाही. जनतेने कोणालाच स्पष्ट कौल दिला नव्हता.
महाराष्ट्र विधानसभा निकाल पाहिला तर शिवसेनेला ६९ जागा, भाजपला ५६, कॉंग्रेसला ७५, नव्या राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे ४ तर भाजपचे तब्बल ९ आमदार घटले होते.
मुख्यमंत्री स्थापन करण्याएवढ बहुमत कोणाकडेच नव्हतं.
मग काय चर्चेची गुऱ्हाळ सुरु झाली. नव्या युतीचे गणित मांडले जाऊ लागले.
एकमेकांचे आमदार फोडता येतात का याची चाचपणी सुरु होती. सगळ्यांचे लक्ष पवारांच्या राष्ट्रवादीकडे होते. ते कोणाला हात देतात यावर मुख्यमंत्री ठरणार होता.
खरे तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र. एकच पुरोगामी विचारसरणी. पण शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीमुद्द्यावर कॉंग्रेस सोडलेल्याला जास्त दिवस झाले नव्हते. मग परत कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी कशी करणार ही त्यांच्यापुढे अडचण होती.
काँग्रेसने पवारांवर आणि पवारांनी काँग्रेसवर निवडणुकीत जोरदार टीका केली होती.
पवारांचा इतिहास त्यांच्या बाजूने नव्हता. १९७८ साली ते कॉंग्रेस फोडून पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी बसले होते तेव्हा त्यांनी विचारसरणी खुंटीला टांगून सत्तेसाठी तडजोडी केल्या होत्या. जनता दलापासून शेकाप, कम्युनिस्ट पार्टी ते भाजपचा पुर्वावतार जनसंघापर्यंत सगळ्यांची मोट बांधली होती. यावेळी सुद्धा ते तसाच चमत्कार करतात का अशी शक्यता बोलून दाखवली जात होती.
काहीही झालं तरी नुकताच भांडून वेगळे झालेले हे कॉंग्रेसचे भाऊ एकत्र येत नाहीत याची सगळ्यांना खात्री होती.
म्हणूनच नारायण राणेंना अपक्षांच्या साथीने युतीचा मुख्यमंत्री होता येईल असा आत्मविश्वास होता.
भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु होते. यात बरेच दिवस गेले. तेव्हाचे राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांनी युतीला सत्ता स्थापनेसाठी तीन वेळा बोलावले पण ते गेले नाहीत. राष्ट्रपती राजवट लागणार अशी शक्यता होती.
आणि अचानक शरद पवारांनी अनपेक्षित चकवा दिला. त्यांनी काँग्रेस बरोबर आघाडी केली. विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपद दिले.
तेव्हा देखील टीका सुरु झाली कि हि काँग्रेस राष्ट्रवादीची अभद्र आघाडी आहे. त्यांनी छोट्या छोट्या सात आठ पक्षांना एकत्र आणून बनवलेलं सरकार टिकू शकणार नाही. त्यावर्षीच्या दसरा मेळाव्यात तर बाळासाहेबांनी जाहीर केलं,
“येत्या काही दिवसात विधानभवनावर आपला भगवा झेंडा फडकणार आहे. तयारी करा.”
काँग्रेस राष्ट्रवादीमधले नेते स्थानिक राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जायचे. एकवेळ शत्रूला मदत करतील पण एकमेकांना नाही अशी त्यांची जन्मजात दुष्मनी. त्यात विलासरावांना मुख्यमंत्री केल्यावर काँग्रेस मधले इतर नेते आणि छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केल्यामुळे राष्ट्रवादी मधील इतर नेते नाराज होते.
पूर्वाश्रमीच्या भुजबळांना उपमुख्यमंत्री करण्याच्या पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीमधल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांमध्ये असंतुष्टता होती. विशेषतः विजय सिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीमधून १६ आमदार घेऊन बाहेर पडणार अशी चर्चा जोरात होती. शिवसेना वाले तर भुजबळांनी पक्ष फोडल्यापासून पवारांवर टपूनच बसले होते.
शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं,
“भुजबळांना आपल्या औषधाची चव चाखावी लागणार आहे. जास्तीजास्त नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत हे सरकार पाडून टाकू.”
मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना आपली पहिलीच प्रेस कॉन्फरन्स दिल्लीला पक्ष श्रेष्ठींनी भेटायला बोलावल्यामुळे रद्द करावी लागली. पाठोपाठ छगन भुजबळाना देखील पवारांच्या भेटीसाठी जावे लागले. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले,
” गेल्या सरकारवेळी माझ्या वर टीका केली जात होती कि मी रिमोट कंट्रोल सरकार चालवतो. पण आता तर सरकारवर दोन किंवा चार रिमोट कंट्रोल काम करत आहेत. आणि हे सगळे रिमोट प्रत्येक पक्षाला एकमेकांपासून दूर खेचत आहेत. हे आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही.”
काँग्रेसचे नेते म्हणाले,
“युतीचे नेते स्वप्न बघत आहेत. स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांना आम्ही काही म्हणणार नाही.”
हे सगळं चाललं होतं आणि राष्ट्रवादीचे काही नेते भाजप सोबत युती करणे सध्याच्या घडीला कसे अत्यावश्यक आहे हे सांगत होते. पदमसिंह पाटील यांनी तर पक्षापुढे प्रेझेन्टेशन सादर केले होते कि,
“शरद पवार यांना देशाचे नेते बनवायचा असेल तर त्यांना राज्यात अडकून न पडता इतर राज्यात देखील दौरे केले पाहिजे. यासाठी केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील एखाद पद घेऊन महाराष्ट्रात देखील युती बरोबर आघाडी केली जावी.”
पदमसिंह पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे नेते समजले जायचे. त्यांनीच हि मागणी केल्यावर काँग्रेसचे धाबे दणाणले. मात्र पवारांनी भाजप बरोबर जायचं टाळलं.
पुढे कित्येकदा विलासराव देशमुखांचं सरकार पडायची वेळ आली. नारायण राणे यांनी तर एकदा आघाडीचे आमदार पळवून नेले होते. कित्येकदा अविश्वास ठराव आणला. अगदी एखाद दुसऱ्या मतांनी त्यांनी विजय मिळवला. काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये अनेकदा बंडखोरी देखील झाली, दोन्ही पक्ष आपापसात प्रचंड भांडले पण शरद पवारांच्या चाणक्यनीती मुळे ही भांडणे थोडक्यात निभावली.
भुजबळांवर तेलगी घोटाळ्याचे आरोप झाले, त्यांना राजीनामा द्यावा लागला. विलासराव देशमुखांना देखील काही क्षुल्लक कारणामुळे मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. वेळोवेळी भाकरी पलटली पण आघाडीने आपला कार्यकाळ पूर्ण केला. फक्त ५ वर्षे नाही तर १५ वर्षे ते सत्तेत राहिले.
मागच्या वर्षी जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने म्हणे फडणवीसांना सल्ला दिला होता,
“शक्य तेवढ्या लवकर सत्ता स्थापन करा, एकदा काँग्रेस राष्ट्रवादी खुर्चीला चिकटले तर ते ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करूनच बाहेर पडतात.”
हे ही वाच भिडू.
- मामू कहाणी सुनाते रहे लडकेने चांद को छू भी लिया.
- लावणी बघण्यात दंग असलेल्या विलासरावांना फोन आला, तुमचे २७ आमदार फुटले आहेत.
- राणेंना हलक्यात घेऊ नका, एकट्या राणेंनी त्या दिवशी विलासरावांच सरकार पाडलच होतं पण..
- एका मताने विलासरावांच सरकार वाचलं अन् राणेंचा पराभव झाला