विलासराव देशमुखांनी आपले शब्द खरे करून दाखवले आणि इंदापूरकरांचं ओझं व्याजासकट फेडून टाकलं…

राजकारणाची गणित कधी बदलतील सांगता येत नाही याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. एकेकाळचे कट्टर काँग्रेस नेते, माजी मंत्री. एवढंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव घेतलं जायचं.

पण मागच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या त्यांच्या भाजप प्रवेशामागे काँग्रेसबरोबर असलेली असंतुष्टता हे कारण नसून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेला वाद हे प्रमुख कारण होतं.

इंदापूर आणि बारामती हे दोन्ही शेजारील मतदारसंघ. मात्र तरीही इथल्या पाटील आणि पवार कुटुंबियांमध्ये छत्तीसचा आकडा.

याची सुरवात १९९१ सालापासून झाली.

हर्षवर्धन पाटलांचे काका म्हणजे जेष्ठ नेते शंकरराव पाटील यांचं बारामती मतदारसंघाच लोकसभेच तिकीट पवारांनी कापले आणि ठिणगी पडली. बारामती मतदारसंघाचे ते खासदार होते, दोन वेळा त्यांनी निवडणूक जिंकली होती तरीही तेव्हा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना तिकीट देण्यात आलं, ते खासदार बनले.

शंकरराव पाटलांनी देखील आपल्या पुतण्याला म्हणजेच हर्षवर्धन यांना राजकारणात आणलं. ते जिल्हापरिषदेची निवडणूक लढणार होते पण त्यावेळीही पवारांनी त्यांचं तिकीट कापण्याची खेळी केली.

हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व जिंकून दाखवलं.

अगदी असच १९९५ सालच्या निवडणुकीतही झालं. इंदापूरचे दोन वेळचे आमदार गणपतराव पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले मात्र हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार दाखल करत त्यांना आव्हान दिले.

इतकंच नाही तर त्यांनी जेष्ठ नेते गणपतराव पाटील यांना पराभूत करण्याचा चमत्कार देखील घडवून आणला.

तो काळ शरद पवार यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कबन्सीचा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला. पवारांनी नाकारलेले अनेक उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले. याचा फायदा शिवसेना भाजप युतीने घेतला.

अनेक अपक्ष आमदारांना मंत्रीपदे देऊन युती मध्ये ओढण्यात आलं.

हर्षवर्धन पाटील यांनी आपले काका शंकरराव पाटील यांच्यासह मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली व  त्यांना मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात कृषिराज्यमंत्री पद देण्यात आलं.

उच्चशिक्षित, तरुण तडफदार हर्षवर्धन पाटलांनी काही दिवसातच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपली छाप पाडली. विशेषतः उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे चांगलेच सूर जुळले.

गोपीनाथ मुंडेंनी या काळात शरद पवारांच्या विरोधात चांगलेच रान उठवले होते. त्यासाठी त्यांना हर्षवर्धन पाटलांची मोठी मदत झाली. १९९९ सालच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा अपक्ष उमेदवार दाखल केली व विजय मिळवला.

हर्षवर्धन पाटील यांचा विजय जरी झाला तरी शिवसेना भाजपचा मोठा पराभव झाला होता.

यावेळची गणिते वेगळी होती. सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा काढून शरद पवार यांनी वेगळा राष्ट्रवादी पक्ष उभारला होता. पवारांचा काँग्रेसमधला गट या नव्या पक्षात सामील झाला. निवडणूक एकमेकांच्या विरुद्ध लढूनही काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं.

खरंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना- भाजप यांच्या संख्याबळात खूप मोठा फरक नव्हता मात्र अपक्ष उमेदवारांनी आघाडीला पाठिंबा दिला.

आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले.

विलासराव देशमुख हे देखील एकेकाळी पवारांचे विरोधक होते. गोपीनाथ मुंडे यांचे खास मित्र. मराठवाड्याच्या या नेत्यांची पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन दोस्ती होती. निवडणुकीतही ते एकमेकाला मदत करतात अशी चर्चा असायची.

विरोधी पक्षात बसल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या गटातील हर्षवर्धन पाटील यांना मित्र विलासराव देशमुख यांच्या हवाली केले. गोपीनाथ मुंडे विलासरावांना म्हणाले,

हा माझा धाकटा भाऊ आहे. अपक्ष म्हणून निवडणून आला आहे. आता आमची सत्ता नाही, आम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल पण याला मंत्रीपदाची संधी द्या.

हर्षवर्धन पाटील सांगतात,

“मुंडे साहेबांनी हाताला धरून विलासरावांकडे नेलं आणि मंत्री केलं’’

भाजपच्या मुंडेंच्या मदतीमुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये आले. त्यांना विलासराव देशमुख यांनी राज्यमंत्री केलं.  

पण गोष्ट इथे संपली नाही. शपथविधीला जवळपास चारच दिवस झाले असतील. पण राष्ट्रवादीच्या आमदारांनी काँग्रेस हायकमांड कडे तक्रार केली. युतीच्या काळात मंत्रीपदी राहिलेले हर्षवर्धन पाटील  सरकारमध्ये मंत्री होतात हि गोष्ट चुकीची आहे असा शरद पवारांच्या समर्थकांचा दावा होता. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला.

प्रकरण इतकं वाढलं कि शपथविधी होऊन आठवडा देखील झाला नाही आणि आघाडी सरकार कोसळतंय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. हर्षवर्धन पाटील सांगतात अखेर मी स्वतः  मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि माझा राजीनामा सोपवला.

” तुम्ही मला राज्यमंत्री केलंय पण माझ्यामुळे जर सरकार पडणार असेल तर मी राजीनामा देतो.”

सुरवातील विलासराव देशमुख हा राजीनामा स्वीकारण्यास तयार नव्हते. पण हर्षवर्धन पाटलांनी आग्रह  धरला. माझ्या राज्यमंत्रिपदापेक्षा तुमचं मुख्यमंत्रीपद महत्वाचं आहे.  मला लाल दिव्याची हौस नाही असं सांगितलं. आघाडी सरकार वाचवण्यासाठी हर्षवर्धन पाटलांचं राज्यमंत्रिपद काढून घेण्यात आलं.

पुढे एकदा इंदापूरला सभा  होती. स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख या कार्यक्रमाला हजर होते. त्यावेळी भाषण करताना ते म्हणाले,

“इंदापूर तालुक्याचं एक ओझं माझ्या खांद्यावर आहे. येत्या काळात हे ओझं व्याजासकट फेडल्याशिवाय मी राहणार नाही. हा विलासराव देशमुखांचा शब्द आहे. “

विलासराव देशमुखांनी ती घोषणा केलीच पण पुढच्या चारच महिन्यात हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं. एवढंच नाही तर हर्षवर्धन पाटलांना त्यांनी राज्यमंत्री पदाच्या ऐवजी कॅबिनेट मंत्री केलं आणि आपला इंदापूरचं ओझं व्याजासकट फेडून टाकण्याचा शब्द खरा करून दाखवला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.