हजरजबाबी विलासराव पुजाऱ्याला म्हणाले, “यंदा पांडुरंगाकडे एकच साकडं घाला….”

भूलोकीचे वैकुंठ समजले जाणारे पंढरपूर. दरवर्षी आषाडी एकादशीला इथल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीने शेकडो मैलांचं अंतर पायी तुडवत येतात. या दिंडीच्या परंपरेला आठशे वर्षांचा इतिहास आहे.

जाईन ग माये तया पंढरपूरा
भेटेन माहेरा आपुलिया।।

या अभंगातून संतांनी पंढरीत दाखल होणे म्हणजे माहेरी येणे असे संबोधले आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाला महाराष्ट्राचा आराध्य दैवत समजलं जातं. म्हणूनच राज्याचा प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीवेळी विठुरायाच्या महापूजेचा मान दिला जातो.

राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्यापासून ते सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. मुख्यमंत्री सहकुटूंब या महापूजेला येतात तेव्हा त्यांच्या सोबत एका वारकरी कुटूंबाला देखील हि संधी दिली जाते. आजपर्यंत सर्वाधिक वेळा हि शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना.

विलासराव देशमुख तब्बल आठ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या पैकी जवळपास सहा वेळा त्यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला येऊन शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली. 

अशाच एका महापुजे वेळचा किस्सा.

साधारण २००५ सालची गोष्ट असावी. आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख पंढरपुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांचे जवळचे सहकारी हर्षवर्धन पाटील देखील या महापूजेसाठी त्यांच्या सोबत पंढरपूरला आले होते. पवार घराण्याचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना काँग्रेस मध्ये आणण्यापासून मोठी मंत्रीपदे देऊन बळ देण्याचे श्रेय विलासराव देशमुखांनाच जात होते.

एक अभ्यासू नेता व काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री असं हर्षवर्धन पाटलांना त्याकाळी ओळखलं जाई.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे रहिवासी असलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या घरात वारकरी परंपरा चालत असल्यामुळे दरवर्षी आषाढी एकादशी वेळी ते विलासरावांच्या सोबत पंढरपूरला जात. काही वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंग देखील या दोघांसोबत महापूजेला आलेलं सांगितलं जातं.

दरवेळी प्रमाणे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा साग्रसंगीत पार पाडण्यात आली. विलासराव देशमुखांची आपल्या पत्नीसह व एका वारकरी कुटुंबासह विधिवत विठूरायाची पूजा अर्चना केली. पूजा सुरु असताना तिथले पुजारी म्हणाले,

“मुख्यमंत्रीसाहेब महाराष्ट्रासाठी पांडुरंगाकडे काय साकडं घालायचं?”

त्याकाळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. पावसाविना गरीब शेतकऱ्यांचे हाल चालले होते. लोक आभाळाकडे डोळे लावून बसले होते. विलासरावांनी त्या पुजाऱ्याला सांगितलं,

“महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस पडू दे. एवढंच साकडं घाला आणि पूजा करा”

हर्षवर्धन पाटील आपली आठवण सांगताना म्हणतात, पूजा झाली, आम्ही सगळे बाहेर आलो आणि पाहतो तर काय बाहेर भला मोठा पाऊस आला होता. योगायोगाने त्या वर्षी इतका पाऊस पडला तो काही थांबलाच नाही. अर्धा महाराष्ट्र महापुराने जलमय झाला.

पुढच्या वर्षी पुन्हा आषाढी एकादशी आली. विलासराव देशमुखच मुख्यमंत्री होते. ते पुन्हा सहपत्नीक शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला आले. त्यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील होतेच. वारकरी कुटूंबासोबत त्यांनी पूजा पार पाडली. यावेळी देखील पुजाऱ्याने विलासरावांना विचारलं कि यावेळी काय साकडं घालू ?

विलासराव देशमुख प्रचंड हजरजबाबी होते. ते तत्काळ उद्गारले,

“पुजाऱ्यांना सांगा यंदा जेमतेम पाऊस आणि गरजे एवढा पाऊस पडू दे एवढंच साकडं घाला.”

हर्षवर्धन पाटील सांगतात हि समयसूचकता आणि जनतेबद्दलच प्रेम विलासराव देशमुखांकडे होतं, म्हणून आजही त्यांच्याबद्दल सबंध राज्यात आपुलकी आणि आदर असलेलं दिसून येत.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.