सभापती म्हणाले, ” सामना बरोबरीत निघाला, दोन्ही पैलवान विजयी झाले.”
प्रमोद नवलकर यांची ओळख फक्त शिवसेनेचे दिवंगत नेते एवढीच नाही. एक राजकीय-सामाजिक कार्यकर्ता, चौफेर ‘भ्रमंती’ करून लफडी-कुलंगडी बाहेर काढणारा ‘भटक्या’ पत्रकार आणि एक प्रभावी लोकप्रतिनिधी तसेच शिवशाही सरकारातील ठसा उमटवलेला मंत्री अशी त्यांची जनतेला ओळख होती.
सेनेचे पहिल्या फळीतले नेते. १९७२ सालच्या विधानसभा निवडणुकीत गिरगाव मधुन ते धडाकेबाज मतांनी निवडून आले.
‘इंदिरा लाट’ असूनही नवलकर हे मुंबईतून निवडून आलेले एकमेव बिगर कॉंग्रेसी आमदार होते.
त्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन जनसंघाचे सहा आणि शिवसेनेचे नवलकर अशा सात आमदारांची युती होती. भाजप शिवसेनेच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाय तिथे रचला गेला असं म्हणतात. या विधानसभेत जनसंघाचे आमदार कै. रामभाऊ म्हाळगी यांच्या बरोबरीने नवलकरांनी उत्कृष्ट विधानपटू म्हणून नावलौकिक मिळवला.
पुढे विधानसभेत पराभव झाल्यावर त्यांनी १९८३ मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी दाखल केली.
या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी तब्बल 24 वर्षे केले. विधान परिषदेत नवलकरांचे भाषण हे पत्रकार गॅलरीसाठी खास आकर्षण असायचे. त्यांची भाषणे, त्यांच्या करामती या विधिमंडळात नेहमी गाजायच्या.
सुरुवातीला प्रमोद नवलकर, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे विधान परिषदेतले शिवसेनेचे त्रिकूट प्रसिद्ध होते.
सदस्य जरी तीनच असले तरी प्रत्येक वेळी कोणत्याही विषयावर प्रभावी भाषणे करून सभागृह दणाणून सोडणे आणि सरकारला कोंडीत पकडणे हे काम ते तिघेही जण उत्कृष्टपणे बजावीत असत.
एकदा त्यांना काही तरी प्रश्न विचारायचा होता तर तेव्हा कोणत्या तरी मंत्र्याने त्यांना सांगितले की पाच मिनिटात विधेयक पास होणार आहे.
नवलकर म्हणाले उद्या सकाळपर्यंत हे विधेयक पास होत नाही. सत्ताधारी आमदार यावर हसले. तर त्यावेळी हे आव्हान स्वीकारत प्रमोद नवलकरांनी आपल्या भाषणास सुरवात केली ते पहाटे पर्यंत बोलत राहिले. त्यावेळी रात्रभर विधिमंडळ चाललं, दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाल्यावरच ते विधेयक पास झालं. असा हा नवलकरांचा महिमा होता.
एकदा तर विधानभवनातील सिक्युरिटी किती तकलादू आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी चक्क पिस्तूल आणि बॉम्ब विधानपरिषदेच्या सभागृहात आणला होता. तर एकदा कोणालाही सहजतेने मद्य परवाना मिळू शकतो हे सिद्ध करण्यासाठी चक्क भारताबाहेर पळून गेलेल्या दाऊद इब्राहिमच्या तसेच महात्मा गांधींच्याही नावाचा बनावट मद्य परवाना सभागृहात सादर केला होता.
विरोधी पक्षात असताना प्रमोद नवलकर भाषणाला उभे राहिले कि सत्ताधारी मंत्र्यांना घामच फुटत असे. ते कधी कोणता प्रश्न विचारतील आणि कधी कशाचे पुरावे मागतील सांगता यायचं नाही. त्यांचा अभ्यास जबरदस्त होता. शिवाय पत्रकार म्हणून अनेकदा ते वेषांतर करत रात्रभर मुंबईत फिरायचे. त्यामुळे अंडरवर्ल्ड पासून ते बॉलिवूड पर्यंत प्रत्येक गोष्टीची त्यांच्याकडे खडान खडा माहिती असायची.
सलग अनेक वर्ष नवशक्ती या वर्तमानपत्रात कोणताही खंड न पडता सलग स्तंभ लिहिण्याचा त्यांचा विक्रम होता, त्याची नोंद लिम्का बुक, गिनीज बुक मध्ये देखील झाली होती.
एकदा अशीच एक गंमत झाली. विधिमंडळाचे अधिवेशन संपत आले होते. प्रत्येकाला घरी जाण्याची गडबड लागली होती. विधानपरिषदेच्या सभापतींना देखील जायचं होतं आणि अचानक प्रमोद नवलकर प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले.
त्यांना पाहताच सगळ्याच सदस्यांना घाम फुटला. नवलकर रात्रभर विधानपरिषद एकहाती चालवतात याचा अनुभव सगळ्यांनाच होता.
तेव्हाचे सभापती जयंतराव टिळकहे सुरवातीला नकारच देत होते. पण नवलकरांनी विनंती केली की एकाच वाक्याचा प्रश्न आहे. शेवटी जयंतराव टिळक म्हणाले,
“ठीक आहे मी आपल्याला एका वाक्यात प्रश्न विचारण्याची परवानगी देतो. मात्र एका वाक्यानंतर जर दुसरं वाक्य उच्चारलं तर मी तुम्हाला खाली बसवेन. “
नवलकरांनी शिक्षण खात्याशी संबंधित एका वाक्यात प्रश्न विचारला. त्यावेळी या खात्याचे मंत्री होते विलासराव देशमुख.
विलासरावांचा तारुण्याचा उत्साह सळसळत होता. त्यांनी हजरजबाबीने प्रमोद नवलकरांच्या प्रश्नाला एका वाक्यात सडे तोड उत्तर दिलं, ते ही एका वाक्यात. नवलकरांनी त्यांना पाठोपाठ पुन्हा एका वाक्यातला उप प्रश्न विचारला. विलासरावांनी त्यांना पुन्हा एका वाक्यात उत्तर दिलं.
नवलकरांचा अनुभवी अभ्यासपुर्ण सवाल आणि विलासरावांचे तितकेच अभ्यासपूर्ण जवाब अशी जुगलबंदी सुरु झाली. संपूर्ण सभागृह थक्क झालं. प्रत्येक प्रश्नाला आणि उत्तराला टाळ्यांचा कडकडाट होत होता. विरोधक आणि सत्तापक्ष एकत्र येऊन ही जुगलबंदी अनुभवत होते.
फक्त एका मिनटात पस्तीस ते चाळीस प्रश्नोत्तरे झाली. दोघांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. तेव्हा सभागृहात उपस्थित असणारे आमदार अरुण गुजराथी आपल्या आठवणी मध्ये सांगतात,
“त्या दोघांचा हजरजबाबीपणा पाहून आम्ही सारेच स्तब्ध झालो होतो. प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा दोघेही हुशार असल्याशिवाय हे शक्य नाही.”
जवळपास पंधरा मिनिटे हि जुगलबंदी चालली. अखेर विधानपरिषद सभापतींनाच दम लागला. त्यांनी दोघांना थांबवत जाहीर केलं,
“मी आता हि कुस्ती थांबवत आहे आणि दोन्ही पैलवान विजयी झाले असं घोषित करत आहे.”
प्रमोद नवलकरांना भिडणारा तरुण नेता म्हणून विलासराव देशमुख गाजले. त्या जुगलबंदीनंतरच काँग्रेसचा उज्वल भविष्यकाळ म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जाऊ लागलं. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची पायाभरणी त्या दिवशी झाली होती.
हे ही वाच भिडू.
- मुंडे म्हणायचे, मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते
- विलासराव देशमुखांमुळे शासकीय पातळीवर शाहू महाराजांची जयंती सुरू झाली.
- स्वतः मुख्यमंत्री विलासराव देशमुख आभार मानण्यासाठी मातोश्रीवर आले.