२००७ साली चिघळलेलं दुध आंदोलन विलासरावांनी अमेरिकेतून सोडवलं होतं

कोरोनाचा कहर सुरु होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. कित्येकांचे रोजगार गेले. बाजार, कारखाने बंद असल्यामुळे शेतात माल असूनही शेतकऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत. गेल्यावर्षीचा महापूर, यावर्षीच चक्रीवादळ त्यात हा साथीचा महाभयंकर रोग यामुळे शेतकरी मोडकळीस आलेला आहे.

अशातच कोरोनामुळे दुध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्यामुळे दुध संघ शेतकऱ्यांकडून पडत्या भावाने दुध खरेदी करत आहेत. यामुळे हवालदिल झालेले दुधउत्पादक हवालदिल झालेले आहेत.

शासनाने या दुध उत्पादकांना लिटर मागे १ रुपया इतके अनुदान द्यावे म्हणून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध आंदोलन सुरु केलेले आहे.

त्यांचे अनेक कार्यकर्ते दुध रस्त्यावर ओतून निषेध करत आहेत. दुधाचा अभिषेक घातला जात आहे. आज हे आंदोलन चिघळल आहे.

असच २००७ साली दूधाच आंदोलन चिघळल होत.

राजू शेट्टी तेव्हा शिरोळचे आमदार होते. शेतकऱ्यांसाठी लढणारे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख देशभरात होत होती. साखर कारखान्याशी भांडून त्यांनी उसाला दर मिळवून दिला होता. हाच प्रयोग त्यांनी दुधाला दर मिळवून देण्यासाठी करायचं ठरवलं. कोल्हापूर सांगली सातारा भागातील ग्रामीण तरुण त्यांच्या पाठीशी होता.

या संबंधीची आठवण सांगताना ते म्हणतात,

“सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. राजकीय नेत्यांना मुंबई प्यारी असते. त्यामुळे दुध दराचा प्रश्न आल्यावर मी मुंबईच दुध तोडायचा निर्णय घेतला. चार दिवस मुंबईला दुद्च येऊ दिल नाही. तिथल्या लोकांइतकेच राजकीय नेते सुद्धा अस्वस्थ झाले. “

तेव्हा मुख्यमंत्री होते स्व.विलासराव देशमुख. ते तेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. राज्यातील इतर नेत्यांना राजू शेट्टी जुमानत नव्हते.

जेव्हा विलासरावांना हे कळाल तेव्हा त्यांनी रात्री अडीच वाजता राजू शेट्टी यांना फोन केला. 

“आंदोलन मागे घ्या. दोन दिवसात आर.आर.पाटील तुमच्यासोबत बैठक घेतील आणि दुध दरवाढ होईल अशी मी ग्वाही देतो. “

राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतले. विधानसभेत या गोष्टीवरून घमासान युद्ध बघायला मिळाले. विधानसभा बंद पडली. पण अखेर विलासराव देशमुखांनी दिलेला शब्द पाळला व दुध उत्पादकांना २ रुपये दरवाढ मिळाली.

झटपट निर्णय घेणे व तो योग्य प्रकारे तडीस नेणे हे विलासराव देशमुखांच्या कार्यक्षमतेचे प्रतिक होते. विरोधकांना देखील कस जिंकायचं याच कौशल्य त्यांच्या जवळ होतं. म्हणूनच एवढी मोठी आंदोलने होऊन त्यातून त्यांनी सरकार चालवून दाखवल.

आजच्या कोरोनाच्या संकटात कोणतेही आंदोलन चिघळू नये व त्यासाठी राज्यकर्त्यांनी वेगाने पावले उचलावीत हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.