विलासरावांनी एकाच भेटीत छ. शिवाजी महाराजांच्या पुस्तकातील ६३ चुका दुरुस्त करायला लावल्या

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर लिखित ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून सध्या राज्यात बराच मोठा वाद सुरुय. यानंतर अगदी राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची मागणी झाली, अजूनही ही मागणी होताना दिसते.

या मागणीसाठीचं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी त्यांनी केलेलं आक्षेपार्ह लिखाण.

सध्या तरी या पुस्तकारावर राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र अजूनही बंदीची मागणी कायम आहे. तर दुसऱ्या बाजूला काही जणांनी केवळ चुका दुरुस्त करण्याची मागणी केली आहे, काही चुकांसाठी संपूर्ण पुस्तकावर बंदी नको अशी त्यांची भूमिका आहे.

आता यावर काय असेल तो योग्य निर्णय न्यायालय, सरकार या व्यवस्था घेतील ते घेतील. पण असाचं एक वाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकावरून जवळपास ५ वर्ष सुरु होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केवळ एकाच भेटीत हा सगळा वाद निकाली काढला होता, आणि तब्बल ६३ चुका दुरुस्त केल्या होत्या.  

जेष्ठ इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी हा किस्सा एके ठिकाणी सांगितला आहे.

त्याचं झालेलं असं की, इयत्ता चौथीच्या पुस्तकात १ किंवा २ नाही तर तब्बल ६३ चुका होत्या. तरीही जवळपास ३० वर्ष हे पुस्तक विद्यार्थ्यांना बिनदिक्कतपणे शिकवलं जात होतं. त्यावेळी कोकाटे यांनी २००१ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यांनी यावर काहीही निर्णय घेतला नाही.

मात्र पुढे देखील या चुका दुरुस्त करण्याची मागणी सातत्यानं राज्यभरातून होतं होती. कोकाटे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदावरून जावून सुशील कुमार शिंदे आले. ते देखील जावून परत विलासराव आले. पण हा वाद शमला नव्हता.

अखेरीस कोकाटेंनी २००५ मध्ये थेट छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

उदयनराजेंना भेटून त्यांनी इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पुस्तकात खूप चुका असून त्या चुका शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या आहेत, हि गोष्ट पुराव्यांसह निदर्शनास आणून दिली. त्यावेळी उदयनराजेंनी लगेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना फोन आणि महत्वाच्या कामासाठी वेळ पाहिजे असल्याचं सांगितलं.

विलासरावांनी देखील उदयनराजेंना तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निरोप दिला कि,

फलटण तालुक्यातील गिरवी इथं माजी आमदार चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त येणार आहे, तिथं आलात, तर सविस्तर बोलू.

त्यानंतर कोकाटे आणि लातूरचे श्रीमंत जाधव नियोजित दिवशी सकाळीच गिरवीत पोहचले. तिथं उदयनराजे देखील आले होते. त्यावेळी स्वतः कोकाटे, उदयनराजे, विलासराव देशमुख या तिघांनी त्या पुस्तकावर सुमारे एक तास चर्चा केली.

शिवाजीराजे, राजमाता जिजाऊ, शहाजीराजे यांच्या बदनामीचा कट कसा शिजला आणि त्याला या पुस्तकात कशी पूरक व  इतिहासाचा संदर्भ नसलेली मांडणी जोडली आहे, हे सप्रमाण पटवून दिले. कोकाटेंनी विलासरावांना अनेक परिच्छेद, ओळी वाचून दाखवल्या.

तेव्हा विलासरावांनी लगेचच तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांना या विषयाची कल्पना दिली, आणि तात्काळ लक्ष घालून चुका दुरुस्त करण्याचे आदेश दिले. बघू, करू, असला कोणताही शब्द न देता मुख्यमंत्र्यांकडून लागलीच चक्र फिरवण्यात आली.

वसंत पुरके यांनी देखील तात्काळ या विषयात गंभीरपणे लक्ष घातलं, स्वतः संदर्भ वाचले. मग हा विषय मनावर घेऊन थेट समिती नेमली आणि अवघ्या काहीच दिवसात चौथीच्या पुस्तकातील सगळ्याच्या सगळ्या ६३ चुका दुरुस्त करण्यात आल्या. ५ वर्षांपासून रेंगाळत पडलेला प्रश्न आणि वाद विलासरावांनी एकाच भेटीत निकालात काढतं शिवरायांचा सन्मान कायम राखण्याचं काम केलं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.