सोनिया गांधी म्हणाल्या, विलासराव मराठवाड्याच्या पाण्यापेक्षा आपल्याला सत्ता महत्वाची….

मराठवाडा म्हणजे वर्षानुवर्ष दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. इथली शेती देखील त्यामुळे संपुर्णतः निसर्गावर अवलंबून. त्यात नफा कमी न तोटाच जास्त अशी अवस्था. मराठवाड्याचं मागचं कित्येक वर्षाचं राजकारण केवळ पाणी या एकाच ज्वलंत प्रश्नांभोवती फिरत आलं आहे, या राजकारणात अनेक जण निवडून आले, काही जण घरी बसले.

या निवडून आलेल्यांमधील अनेकांनी हा पाणी प्रश्न सोडवण्याचा बराच प्रयत्न केला, पण आज देखील इथं एप्रिल-मे टँकर चालू होतो हे वास्तव आहे.

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा असाच एक प्रयत्न केला होता दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी. त्यासाठी त्यांनी आपली सत्ता आणि मुख्यमंत्री पद देखील पणाला लावलं होतं, पण त्यावेळी दिल्लीतून सोनिया गांधींचा आदेश आला, अन पाण्याचा प्रश्न मागे पडून सत्ता महत्वाची ठरली होती.जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी हा प्रसंग ‘स्मरणातले विलासराव’ या आपल्या लेखात सांगितला आहे.

तर त्याच झालेलं असं की, विलासराव देशमुखांची मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म होती.  शपथ घेतल्यावर काहीच दिवसात ते औरंगाबादला महात्मा गांधी मिशनच्या आवारात झालेल्या एका पाणी परिषदेला उपस्थित राहिले होते. सोबत होते तेव्हाचे सिंचनमंत्री डॉ. पद्मसिंग पाटील. यावेळी पद्मसिंग यांनी भाषण करताना मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाला हात घातला, बोलताना त्यांनी अगदी त्यांच्या पहिलवानी शैलीत ठासून सांगितलं,

‘आता, राज्याचा सिंचन मंत्री मी आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठवाड्याचाच आहे. तेव्हा मराठवाड्याच्या वाट्याचं २२ टीएमसी पाणी आणल्याशिवाय आम्ही दोघं गप्प बसणार नाही हे वचन आहे’.

यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या. विलासरावांनी मुख्यमंत्री म्हणून भाषण करताना पद्मसिंग पाटील यांच्या मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी आणण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केला आणि हे पाणी आता
येणारच असं सांगितलं. विलासरावांनी ‘च’ वर जरा जास्तच भर देत जाहीर केलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

हळू हळू दिवस सरले, महिने गेले पण, पण ते हक्काचं पाणी काही मराठवाड्यात आलंच नाही. याकाळात विलासरावांच मुख्यमंत्री पद देखील गेलं. पण पाणी काही आलं नाही. 

पुढे मुख्यमंत्रीपद गेल्यावर ४ ते ५ दिवसांनी विलासराव देशमुख औरंगाबादला आले. औरंगाबादचे मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालेले शासकीय कार्यक्रम रद्द झालेले असले तरी खाजगी जे दोन कार्यक्रम होते, ते ठरल्याप्रमाणे होणार होतेच. त्यासाठी ते शहरात आले.

प्रवीण बर्दापूरकर आणि विलासराव देशमुख यांची अगदी पक्की मैत्री. त्यामुळे औरंगाबादेत आल्यावर दोघांचं कायम भेटणं होतं असायचं. त्यावेळी देखील माजी खासदार उत्तमसिंग पवार यांचा बर्दापूरकरांना फोन गेला. त्यांनी सांगितलं की, विलासराव त्यांच्याकडे चहा प्यायला आणि थोडासा वेळ घालवायला येणार आहेत. तेव्हा मोजक्या लोकांना भेटायला बोलावलं आहे.

त्यानुसार बर्दापूरकर उत्तमसिंगांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे बऱ्यापैकी लोकं उपस्थित होती. उत्तमसिंग पवार आणि उदय बोपशेट्टी यांची कसलीतरी लगबग सुरू होती. विलासराव तिथं आले. स्वागत वर्गैरे झाल्यावर, सगळ्यांच्या गप्पांचा फड रंगला. बोलता बोलता त्यात नेमका तो पाण्याच्या प्रश्नाचा विषय निघालाच. तेव्हा बर्दापूरकर विलासरावांना म्हटले,

‘तुमची पाणी आणण्याची गर्जना कोरडीच ठरली. ना तुमचं पाणी आलं, ना मराठवाडा भिजला. अर्थात ते होणारच होतं. काँग्रेसकडून वेगळ्या अपेक्षा काय ?’

बर्दापूरकरांच्या बोलण्यातील खोच विलासरावांच्या लक्षात आली आणि त्यांनी गंभीर होऊन सांगितलं, ‘प्रवीण तुम्हाला सांगतो. मी आणि डॉक्टरांनी (पद्मसिंग पाटील) भरपूर प्रयत्न केले. हा विषय आम्ही इतका टोकापर्यंत नेला की पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पाण्याचा प्रश्न असा निकाली लावायचा असेल तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, अशी भूमिका घेतली.

पण तरी देखील मी आणि डॉक्टर पाणी न्यायचं या मुद्द्यावर ठाम होतो. त्यामुळे साहजिकच वातावरण नको तितकं ताणलं गेलं.

शेवटी मराठवाड्याच्या २२ टीएमसी पाण्याचा विषय मॅडमकडे अर्थात सोनिया गांधी यांच्याकडे गेला. त्यावर मॅडमनी विलासरावांना सांगितलं,

विषय जास्त ताणू नका. आपल्यासाठी सत्ता जास्त महत्त्वाची आहे.

पुढे बर्दापूरकरांनी विलासरावांच्या पूर्वपरवानगीने या विषयीची बातमी केली. ‘लोकप्रभाच्या अंकात ‘मुख्यमंत्रीपद गेल्यावरचे विलासराव’ हा लेख लिहिला; त्यामध्ये झालेल्या चर्चेवर आधारित विस्तृत
तपशील लिहिला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देखील हि माहिती कुठून मिळाली याच आश्चर्य वाटत होतं.

त्यानंतर २/३ कार्यक्रमात, आणि एकदा तर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, तत्कालीन खासदार विजय दर्डा आणि तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बर्दापूरकर यांनी या घटनेचा उल्लेख केला, मात्र अशा जाहीर आणि सार्वजनिक व्यासपीठावर देखील विलासराव देशमुखांनी यातील एका ही गोष्टीचा इन्कार केला नव्हता.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.