दिल्लीत बोर्ड पाहिला अन् विलासरावांनी ठरवलं, आपणही तुळजापूर प्राधिकरण स्थापन करू

असे मोजके राजकारणी असतील ज्यांच्या टीकाकारांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांची आठवण काढली तरी लोक हळवे होतात. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या दिलदारपणाचे, भाषणाचे, रुबाबदार दिसण्याचे किस्से सांगितले जातात. आजही कार्यकर्त्यांच्या पुढे त्यांचा आदर्श ठेवला जातो.

काँग्रेसचा शेवटचा लोकनेता

कै. विलासराव दगडोजीराव देशमुख

विलासराव देशमुखांना घरात देशमुखीचा वारसा होता. बाभळगाव मध्ये त्यांची मोठी गढी होती. वडिलांच्या आग्रहामुळे विलासराव वकिलीच्या शिक्षणासाठी पुण्याला आले. लातूरमधली देशमुखी मागे ठेवून पुण्यात नोकरी देखील केली. वकिलीची प्रॅक्टिस करताना पुण्याच्या खेड्यापाड्यात आपल्या दुचाकीवरून प्रवास केला.

राजकारणाची त्यांना विद्यार्थी दशेपासून आवड होती. पुण्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कामास सुरवात केली. पुढे राजकारणातच करियर करायचं म्हणून गावी परतले. सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरु केली. पंचायत समिती जिल्हापरिषद अशा ठिकाणी काम करत आपली वेगळी छाप पाडली. शिवराज पाटील, निलंगेकर, शंकरराव चव्हाण अशा नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क निर्माण झाला.

युवक काँग्रेसचं काम करत असताना त्यांना एकदा दिल्लीतल्या राष्ट्रीय अधिवेशनाला जाण्याची संधी मिळाली.  

ते साल होतं १९७३.  विलासराव देशमुख, हनुमंतराव देशमुख, शरदराव सस्ते, रावसाहेब जगताप, माधवराव कुतवळ आदी कार्यकर्ते रेल्वेने दिल्लीला दाखल झाले. रेल्वेतून उतरून अधिवेशन असलेल्या मैदानाकडे जाताना रस्त्यात त्यांना विमानतळाच्या बाहेर प्राधिकरण असे लिहीलेला फलक दिसला. आपल्या भागाचा विकास कसा करावा यासाठी नेहमी जागरूक असलेल्या विलासराव देशमुखांना तो प्राधिकरणाचा बोर्ड पाहून उत्सुकता वाटली.

तेव्हा त्यांनी व त्यांच्या सहकारी मित्रांनी प्राधिकरण नेमकं काय असतं, त्याच काम कस चालत याची चौकशी केली.   

त्याकाळात लातूर आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे एकत्रित होते. विलासराव देशमुख तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्याचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष होते.  देशमुख घराण्याचे कुलदैवत तुळजापूर असल्यामुळे त्यांचं तुळजापूरशी जुनं नातं होते. इथले रावसाहेब जगताप, माधवराव कुतवळ, पुजारी माणिकराव कदम-पाटील यांच्यासह अनेक कुटूंबासोबत विलासरावांचे जिव्हाळ्याचे सबंध होते. 

तुळजाभवानी मंदिराची सुधारणा, शहराचा विकास, अशी विकासाची संकल्पना आणि दृढ इच्छा त्यांच्याकडे होती.

त्या दिवशी प्राधिकरणाची माहिती मिळाल्यानंतर विलासरावांनी आपल्या मित्रांजवळ मनीषा व्यक्त केली 

 जेव्हा कधी जगदंबेच्या आशीर्वादाने आपण मंत्री झालो तर तुळजापुरात असेच प्राधिकरण स्थापन करू, 

पुढे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ही आठवण कायम जपली आणि मित्रांना सहज दिलेला शब्द खरा करत तुळजापूर प्राधिकरण स्थापन केले. या तुळजापूर प्राधिकरणाची विलासराव देशमुखांनी ३१५ कोटी रुपये जाहीर केले. त्यानंतरचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या रकमेत १० कोटींची वाढ केली. या प्राधिकरणामार्फत तुळजापूर शहराचा विकास केला जात आहे.

विलासरावांची तुळजापूर भवानीबद्दलची आस्था हि कायम होती. कित्येकदा आपल्या प्रचाराचा नारळ ते तुळजापुरात फोडायचे. हीच भक्ती परंपरा देशमुख कुटूंबाच्या पुढच्या पिढीमध्ये देखील उतरली आहे. विलासराव देशमुख आणि रितेश देखमुख यांचा फोटो याचीच साक्ष देतो.

सन्दर्भ- दिव्य मराठी 

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.