एकेकाळी विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले पुण्यात एका बाईकवरून फिरायचे..

विलासराव देशमुख म्हणजे काँग्रेसच्या राजकारणातील अखेरचा लोकनेता. सरपंचपदापासून सुरवात केली, दोन वेळा मुख्यमंत्रीपद भोगलं, केंद्रात मंत्री देखील झाले. काँग्रेस पक्षाचे सर्व गुणावगुण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.

याच्या बरोबर उलट म्हणजे विक्रम गोखले. त्यांच्या चार पिढ्या सिनेमा क्षेत्रात. विक्रम गोखले यांच्या आजी आणि नानी या दोघी सुद्धा भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या नायिका. त्याकाळी कोणीतीही स्त्री सिनेमात काम करण्यास धजावत नसे. अशावेळेस दुर्गाबाई आणि कमलाबाई गोखले या दोघी मायलेकींनी ‘मोहिनी भस्मासुर’ सिनेमात एकत्र काम केलं. म्हणूनच गोखले कुटुंबात अभिनयाचा वारसा पूर्वी पासूनच चालत आलेला आहे.

कमलाबाई गोखले यांचा मुलगा चंद्रकांत. चंद्रकांत गोखले यांनी अनेक भूमिका गाजवल्या.

असा हा अभिनयाचा वारसा असलेले विक्रम गोखले आणि राजकारण गाजवलेले विलासराव देशमुख यांचं नाव एकत्र कसे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. लातूर जवळच्या बाभळगावचे विलासराव देशमुख उच्चशिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आले. इथल्या गरवारे मध्ये त्यांचं कॉलेज सुरू झालं. लातूरचा देशमुखी इथं गळून पडलेली. अहोजावो ची जागा अरेतुरेनं घेतली. पुण्यात विलासरावांनी काय कमवलं अस त्यांना कोणीतरी विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते दोस्त. आपण गावखेड्यातली माणसं पुण्या-मुंबईत येतोच ते मुळी दोस्त कमवायला. विलासरावांनी देखील तेच केलं होतं.

विलासराव गरवारेतून बीएस्सी करत होते. तेव्हा विलासरावांच्या सोबत असायची ती “जावा”.

कर्वेनगरच्या एका हॉस्टेलमध्ये ते रहायचे, पुढे  MES हॉस्टेल ला आले.

जयंत बर्वे, वैद्य, नागनाथ फटाले, प्रा. वर्तक अस त्यांच मित्रमंडळ. जावा आणि ते अस समीकरण होतं. जावावरून ते एकदा थेट हैद्राबादला जावून आले. हक्काच ठिकाण होतं कॅफे पॅराडाईज. तेव्हा विलासराव बुलबुल वाजवायचे. SES च्या व्हॉलीबॉल टिममधून खेळायचे. डेक्कन जिमखान्यावर असायचे. पूना कॉफी हाऊसला पडिक असायचे आणि बिनाका गीतमाला ऐकायचे.

त्यांच्या मित्रमंडळात आणखी एक नाव होतं ते म्हणजे विक्रम गोखले.

विक्रम गोखले देखील त्या काळात गरवारेला शिकायला होते. गोष्टी वेल्हाळ विलासराव देशमुखांशी त्यांची लवकरच गट्टी जमली. विलासरावांना देखील अभिनयाची नाटकाची आवड होती त्यामुळे दोघांचे सूर जुळले.

विक्रम गोखले सांगतात

“मी लातूरला जेव्हा जायचो तेव्हा विलासच्या घरी जाणे व्हायचं. मला अजूनही तो चाळीस वर्षांपूर्वी जुन्या खडकाळ रस्त्यातून लातूरला केलेला प्रवास, विलासच गढी सारखं मोठं प्रचंड घर, त्याच एकत्र कुटूंब, त्यांनी आपुलकीने केलेलं स्वागत आठवतं.” 

विलासराव आपल्या मित्रांना शेतात फिरायला घेऊन जायचे. कुरणात चरणारी ढोरे, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं कष्टमय जीवन त्यांनी आपल्या मित्रांना समजावून सांगितलेलं देखील विक्रम गोखले आठवणीने सांगतात.

मध्यंतरी अमित देशमुख एका कार्यक्रमात विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले यांच्या मैत्रीबद्दल सांगत होते. पुण्यात विलासराव आणि विक्रम गोखले अनेकदा त्यांच्या जावा गाडीवरून फिरायचे. एकदा एका मैत्रिणीला भेटायला दोघे एकत्र गेल्याचा किस्सा विक्रम गोखलेंनी सांगितल्याचं अमित देशमुखांनी सांगितलं.

पुढे वर्ष पालटली. दोन्ही मित्र आपापल्या क्षेत्रात रमले. तिथं आपलं नाव कमावलं. विक्रम गोखले सांगतात विलासराव देशमुख राजकारणात गेले आणि तेव्हापासून आमचा संपर्क कमी झाला.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.