विलासराव देशमुखांनी १० आमदारांची भेट दिली म्हणूनच युतीचं सरकार स्थापन झालं होतं ?

नव्वदच्या दशकातला काळ. शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा अखेर विधानभवनावर फडकला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तर गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच बिगर  काँग्रेसी सरकार स्थापन झालं होतं.

मनोहर जोशी जरी मुख्यमंत्री असले तरी सत्तेचा रिमोट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता.

शिवसेना भाजप युतीची सत्ता अपक्ष आमदारांच्या टेकूवर उभी होती. पवारांच्या पुलोद नंतर पहिल्यांदाच युती आघाडी करून आलेलं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं होतं. त्याच्याही स्थापनेमागे देखील खूप मोठं राजकारण घडलं होतं असं बोललं गेलं. कोणी बोललं कि पवारांनी स्वतःच शिवसेनेला बाय दिला तर कोणी या मागे नरसिंह राव असल्याचं सांगितलं.

त्याकाळच्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना संजय राऊत यांनी प्रश्न विचारला,

विलासराव देशमुख असं म्हणत आहेत कि शिवसेनाप्रमुखांना मी १० आमदारांची भेट दिली तेव्हाच युतीच सरकार स्थापन होऊ शकलं.

सामनाच्या या मुलाखतीमध्ये विचारलेला सवाल आपल्याला स्फोटक वाटू शकेल. पण त्याकाळात खरोखर अशी चर्चा होती. नेमकं काय काय घडलं होत आधी जाणून घेऊ.

१९९५ सालच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा कॉंग्रेसचे शरद पवार मुख्यमंत्री होते. बाबरी मशिदीच्या पतनानंतरच्या दंगली, मुंबईतील बॉम्बस्फोट हे सगळे प्रकरण तस बघायला गेल तर ताजे होते.  पवारांच्यावर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप होत होते. अण्णा हजारेंची आंदोलने फेमस होत होती. गो.रा.खैरनार यांनी पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे असल्याचं जाहीर केलं होतं.

शिवसेना भाजपच्या प्रचारात हे मुद्दे प्रकर्षाने उचलण्यात आले. बाळासाहेब ठाकरेच्या सभांना राज्यभर तुफान गर्दी होत होती. भाजपची धुरा मुंडे महाजन यांनी समर्थपणे सांभाळली होती. 

याचाच परिणाम निकाल काँग्रेससाठी धक्कादायक लागले. कॉंग्रेसचे फक्त ८०,शिवसेनेचे ७३ आणि भाजपचे ६५ आमदार निवडून आले. कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हत. तब्बल ४५ अपक्ष निवडून आले होते. काँग्रेसला हा अनपेक्षित निकाल होता.

शरद पवारांची ही कारकीर्द प्रचंड वादग्रस्त ठरली. गटबाजीचा फटका बसला. सुधाकरराव नाईकांना हटवून पवारांनी मुख्यमंत्रीपद आपल्या हातात घेतलं तेव्हापासून हि धुसपूस सुरु होती. पवारांनी काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या नेत्यांना वगळून आपल्या जुन्या समाजवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिकिटे दिली. काही ठिकाणी आपल्या समर्थक नेत्यांना बंडखोरी करायला लावली.

या सगळ्याचा परिणाम अनेक दिग्गज काँग्रेस नेते पडले. पराभूतांच्या यादीत प्रमुख नाव होतं विलासराव देशमुख.

विलासरावांचा समज झाला की मुख्यमंत्र्यांच्या समर्थक नेत्यांनी प्लॅन करून आपल्याला पाडलं आहे. कधी नव्हे ते विलासराव काँग्रेस नेतृत्वावर नाराज झाले. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा डाव आहे अशी त्यांची समजूत झाली.

त्यांचे जवळचे मित्र गोपीनाथराव मुंडे हे सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करत होते. असं सांगितलं जातं की काँग्रेस वर नाराज झालेल्या विलासरावांनी मुंडेंना आपल्या मर्जीतल्या अपक्ष आमदारांना युतीला पाठिंबा देण्यासाठी पाठवलं.

हर्षवर्धन पाटील,अशोक डोणगावकर, अनिल देशमुख असे अनेक नेते मुंडेंकडे गेले. त्यांनी  अपक्ष आमदारांना मातोश्रीवर नेलं. कोणाला मंत्रिपद, कोणाला महामंडळ अशी वाटणी करून या अपक्ष आमदारांचा पाठिंबा मनोहर जोशी सरकारला मिळाला.

या सगळ्या घडामोडीमागे विलासराव आणि गोपीनाथ मुंडेंची मैत्री कारणीभूत होती.

बाळासाहेबांना त्या दिवशी मुलाखती मध्ये संजय राऊतांनी विलासरावांनी दिलेल्या दहा आमदारांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी आधी शरद पवारांवर टीका केली.  ते म्हणाले,

“नाही शरद पवार आग लावण्यात, काड्या लावण्यात पटाईत आहेत आणि आम्ही त्यांना ओळखून आहोत. आता विलासरावांचं म्हणाल तर ते दुखावलेले आहेत. चिडलेले आहेत. कोणी त्यांच्या आसनाला चूड लावली त्याच्याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना आहे. दहा माणसं जी आहेत त्यातली तीन-चार तर आमच्या मताची झालेली आहेत.

आतापर्यंत कधी आमचे संबंध आले नाहीत. मग तो राज असो, उद्धव असो आणि आता प्रत्यक्ष मी! काय असेल ते असो. त्यांना असं वाटतं की इथे आपला मान वाढतोय. आम्हीसुद्धा कधी त्यांचा अपमान करणार नाही. चांगल्या शासनामध्ये आपलाही काही सहभाग असावा असं त्यांना वाटतं. त्याप्रमाणे ते बसलेत. विलासरावांचे काही असतील-नसतील. कोण कोणाचे हे आम्हालाही माहीत नाही आता. डोणगावकर पवारांचा की विलासरावांचा? आम्हाला काय करायचं आहे? आज तो आमच्याबरोबर आहे. निष्ठेनं बसलाय. उद्या त्यानं काही वाकडंतिकडं केलं तर नाही ठेवणार आम्ही. “

एकूणच बाळासाहेबांनी विलासराव देशमुखांनी आपल्याला  खरंच मदत केली का याच उत्तर गुलदस्त्यातच ठेवलं. पुढच्या काही महिन्यातच विधानपरिषदेच्या निवडणुका आल्या. विलासराव देशमुख युतीचा उमेदवार म्हणून उतरले तेव्हा मात्र या शंकेवर शिक्कामोर्तब झालं. विलासराव देशमुखांनी मुंडेंच्या मैत्रीखातर १० आमदारांची मदत केली आणि म्हणूनच युतीच शासन सत्तेत आलं आणि टिकलं.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.