विलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा. 

दिलखुलास विलासराव !! 

विलासराव हे नाव नंतर येत त्याअगोदर दिलखुलास हे विशेषण येत. विलासरावांचा स्वभावच तसा होता. कधी कंबरेखालचे विनोद नाहीत की कधी अपमान होईल अशी टिका नाही. म्हणूनच त्यांच्यानंतर कित्येक माणसं त्यांच्याबद्दल चांगल बोलतात. 

विलासराव जितके दिलखुलास राजकिय व्यासपीठांवर असत तितकेच दिलखुलास ते सभागृहात देखील असायचे. गोड बोलत चिमटे काढणं, टिका करताना भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणं हे त्यांच्याकडून सुरवातीपासूनच जपलं जायचं. 

असाच एक सभागृहातील विलासरावांचा किस्सा. 

बॅ. ए.आर. अंतुले तेव्हा मुख्यमंत्री होते तर शालिनीताई महसूलमंत्री होत्या. त्याच काळात राज्याचे वनमंत्री म्हणून नानाभाऊ एंबडवार जबाबदारी पहात होते. नानाभाऊ एंबडवार यांच वैशिष्ट म्हणजे त्यांच्या भल्लीमोठ्ठी दाढी ! 

सभागृहात एक दिवस राज्यातील पर्यावरणाच्या अनुषंगाने चर्चा चालू होती. चर्चेमध्ये शालिनीताई पाटील, नानाभाऊ एंबडवार, विलासराव आणि नगरचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ठुबे हे सहभागी झाले होते. 

त्यावेळी आमदार ठुबे यांनी चर्चेत सहभागी होत म्हणाले,

“राज्यात प्रचंड जंगलतोड झाली आहे. कुठेही जंगल दिसत नाही. परंतु मंत्रिमहोदयांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की जंगलाची वाढ तिथेच झालेली दिसते”

( संदर्भ : मंत्री एंबडवार यांची दाढी)

आत्ता नंबर होता विलासरावांचा. विलासरावांनी लातूर जिल्ह्याच्या निर्मीतीचा प्रश्न उपस्थित केला. आणि अचानक त्यांना काही क्षणांपुर्वी आमदार ठुबेंनी मारलेली कोपरखळी आठवली. ते आपला प्रश्न अडवत मध्येच म्हणाले,

माझी मंत्रीमहोदयांना विनंती आहे,

“सन्माननीय सदस्य श्री. ठुबे यांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच केली तर जंगलाची वाढ होण्यास वेळ लागणार नाही.” 

विलासरावांचे हे वाक्य पुर्ण होताच. दोन्ही सदस्यांनी विलासरावांना जागेवरुनच हात जोडले. तर असे होते त्या वेळेच्या सभागृहातील चर्चा सहस,साध्या आणि सरळ. ज्याच्यावर टिका होतं असे तो देखील त्या विनोदात मनमुरादपणे सहभागी व्हायचा. 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.