२००८ ला कॉंग्रेसची मतं राष्ट्रवादीकडे गेली आणि कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला…

कसली निवडणूक झाली लगा…!!!

आग आय..आय..आय…

रात्रीच्या निवडणूकीनंतर सगळीकडं गुलाल. राडा आणि देवेंद्र फडणवीस यांचा गौरव. मुद्दा पण साहजिक आहे, कारण अशक्य ते शक्य फडणवीसांनी केलं. एकमागून एक अशी मतं फोडून फडणवीसांनी आपला करिष्मा दाखवला. या निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून फडणवीसांना आपला उमेदवार विजयी केला.

पण हे पहिल्यांदा झालं का? तर नाही..

कोणीही यावं आणि टपली मारून जावं हा प्रकार कॉ़ंग्रेसच्या बाबतीत पहिल्यांदा झालाय का तर नाही, असाच प्रकार २००८ साली देखील झाला होता..

तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख.

विधानपरिषदेसाठी निवडणूका जाहीर झालेल्या एकूण ९ जागा रिक्त होत्या व त्यासाठी १० उमेदवार रिंगणात होते. त्या काळात कॉंग्रेसचे आमदार होते ६९, राष्ट्रवादीचे आमदार होते ७१, शिवसेनेचे आमदार होते ६२ तर भाजपचे आमदार होते ५४..

या संख्याबळानुसार युतीचे 3 व आघाडीचे ६ उमेदवार निवडून येवू शकत होते..

कारण कॉंग्रेसचा तेव्हा मुख्यमंत्री पण होता आणि दिवस पण कॉंग्रेसचे होते. त्यामुळं अपक्ष मतदारांची फौज कॉंग्रेससोबतच होती. त्यातही नारायण राणेंनीं 2005 सालीच कॉंग्रेस सोडल्याने त्यांच्या ५ समर्थकांनी सेनेचा पाठींबा काढून घेतला होता. 

कॉंग्रेसच्या समर्थक आमदारांची संख्या होती १४.. पक्षाचे ६९ आणि अपक्ष १४ असा कॉंग्रेसचा आकडा ८३ पर्यन्त जात होता…

याच विश्वासावर कॉंग्रेसकडून विधानपरिषदेसाठी शिवाजीराव देशमुख, जयप्रकाश छाजेड आणि सुधाकर गणगणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून संजय काका पाटील, हेमंत टकले, राणा जगजीत सिंह पाटील उमेदवारी देण्यात आली होती. 

कॉंग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादीचे ३ उमेदवार मैदानात होते तर भाजपकडून पांडुरंग फुंडकर आणि विनोद तावडे व शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि किरण पावसकर असे प्रत्येकी दोन-दोन उमेदवार मैदानात होते… 

तेव्हा मतांचा कोटा होता २८…

मतदान झालं तेव्हा राष्ट्रवादीचे संजय काका पाटलांना 32, राणा जगजीत सिंह यांना 33, कॉंग्रेसचे शिवाजीराव देशमुख व जयप्रकाश छाजेड यांना 29, सेनेच्या नीलम गोऱ्हे यांना 31, भाजपच्या विनोद तावडेंना ३२ मते मिळाली आणि पहिल्या फेरीत हे 5 उमेदवार निवडून आले. आत्ता वेळ होती ती दूसऱ्या फेरीची.. 

दूसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे हेमंत टकले आणि भाजपचे पांडुरंग फुंडकर यांनी 28 मतांचा कोटा पुर्ण करत विजय मिळवला..

आत्ता आली शेवटची फेरी..

या फेरीत निलम गोऱ्हेंच्या 33, विनोद तावडेंच्या 32 आणि पांडुरंग फुंडकर यांच्या मतांची बेरीज सेनेच्या पावसकर यांना मिळाली व ते अवघ्या एका मताने निवडून आले. यामुळेच कॉंग्रेसच्या सुधाकर गणगणे यांचा फक्त एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीकडे तेव्हा ७१ मते असताना देखील त्यांना पहिल्या पसंतीची ९३ मते मिळाली होती. त्यावेळी जनसुराज्य पक्षाचे ४ आमदार होते व या आमदारांनी राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता.

कॉंग्रेसला एकूण ८३ मतांचा पाठींबा असल्याचा दावा केला जात होता, पण अखेरच्या क्षणी कॉंग्रेसला ८२ मते मिळाली. 

आत्ता मुद्दा राहतो तो म्हणजे कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव कसा झाला..?

या पराभवाला विलासराव देशमुख आणि शिवसेनेतून काँग्रेस मध्ये आलेल्या नारायण राणे राजकीय शत्रुत्वाची किनार असल्याचे सांगण्यात येत. 

भाजपचे ५४ आमदार असताना त्यांना ६० मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या ५६ पैकी ५६ आमदारांची मते सेनेला मिळाली होती.

त्यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेसमधील आणि शिवसेनेतील त्यांची काही मते राष्ट्रवादीकडे वळवल्याचाही आरोप झाला होता. मात्र शेवटी वस्तुस्थिती अशी होती की विधानसभेत सगळ्यात जास्त आमदारांचा कोटा आपल्या बाजूला असून देखील काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला नव्हता. आणि विलासरावांच्या अगदी जवळचे असणाऱ्या सुधाकर गणगणे यांचा पराभव झाला होता. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.