हसतमुख शोकांतिका.

शरद पवार बोलत होते. विलासराव देशमुख यांच्याबद्दल. गडचिरोलीमधला किस्सा सांगत होते. एका तरुणाला मदत आवश्यक होती. नियमात बसत नव्हती. विलासराव मुख्यमंत्री होते तेंव्हाची गोष्ट. पण त्या तरुणाची केस अर्जंट होती. नियमात बसत नसताना विलासरावांनी फाईलवर स्पष्ट लिहिलं होतं की मदत आवश्यक आहे. जर काही अडचण आली तर या प्रकरणातला एक न एक रुपया मी माझ्या खिशातून देईन. पवारांकडे फाईल आली होती तेंव्हा त्यांना वाचायला मिळालं हे सगळं. नशीब हे आजी माजी कॉंग्रेसवाले एकमेकांचे असे किस्से पण सांगतात.

मीडियातून आपल्याला विलासरावांना सावकाराची बाजू घेतली म्हणून कोर्टाने दंड केला हे माहित असतं. तेच ते सानंदा प्रकरण. लातूरला रेल्वे नेणारे विलासरावच असतात. पाण्यासाठी लढणारे विलासरावच असतात. विलासराव गेले आणि अचानक लातूरला केवढी मोठी पाणी टंचाई जाणवली. रेल्वेने पाणी न्यावं लागलं. लातूरच्या लोकांना हे माहित आहे की विलासराव असते तर अशी वेळ आली नसती.

पण विलासरावांनी आपल्या घरात एवढे नेते बनवले होते. त्यांच्या कर्तृत्वाचं काय? लातूरच्या लोकांनी किती वर्षं विलासराव असायला पाहिजे होते असं म्हणायचं? विलासराव होते म्हणून ज्यांना नेता म्हणून स्वीकारलं त्यांची काहीच जबाबदारी नाही का ?

परवा अशोक चव्हाणांचा पराभव बघितला सगळ्यांनी. पृथ्वीराज चव्हाण देखील आज महाराष्ट्राच्या राजकारणात काही करु शकले नाहीत. संजय निरूपम यांना फक्त राहूल गांधीनी झेललं. आज कॉंग्रेसकडे नेतृत्व नाही आणि आजही कॉंग्रेसला विलासराव देशमुख यांचा पर्याय सापडत नाही. जसे बीजेपीला दुसरे प्रमोद महाजन सापडत नाहीत.

प्रमोद महाजन यांना पर्याय म्हणून बीजेपीने देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. पण नळावर भांडल्यासारखं बोलणं गेली चार वर्षं फडणवीस विसरू शकले नाहीत. उंच आवाजात बोलल्याने फक्त खोकला येतो. श्रोते आपल्या मागे येत नाहीत हे कुणीतरी फडणवीसांना सांगायला हवं. बाकी त्यांची सगळ्यात उजवी बाजू ही आहे की कॉंग्रेसकडे कुणीही चांगला वक्ता नाही. खरंतर राज ठाकरे सोडले तर कुठल्याच पक्षाकडे चांगला वक्ता नाही हे आजचं महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. विलासराव उत्तम वक्ते होते यापेक्षा त्यांच्यामागे माणसं होती. आता कॉंग्रेसकडे असा माणूस नाही मराठवाड्यात. शरद पवार यांच्या विरोधात बंड करायची ताकद असणारे विलासराव होते. शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या कडक शिस्तीतल्या नेत्याला आपला राजकीय वारस वाटले ते विलासराव. विलासराव शून्यातून मोठे झाले. ते जगाला माहित आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहेच. पण पुढे काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

महाराष्ट्र सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव यांच्या जुगलबंदीत रमायचा.

तरी दो हंसोका जोडा म्हणायचा दोघांना. हा लातूर सोलापूरचा जोडा. लातूर बीडचा जोडा होता विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांचा. या तिन्ही माणसांच्या बोलण्याने लोक भुलून जायचे. यांचे तेच ते विनोद ऐकत असायचे. विलासराव छान हसायचे. गोपीनाथरावपण विलासराव असले की मार्मिक बोलायचे. सुशीलकुमार पण छान हसायचे. पण हंसोका जोडा दोन ठिकाणी असला तरी कॉमन होते विलासराव. विलासराव तसे दिलदार मित्र असावेत. कारण दोनदा मुख्यमंत्री झाले तरी फार कमी तक्रारी दिल्लीत गेल्या असतील पक्षातून. कारण एकदा त्यांनी कारकीर्द पूर्ण केली. एकदा त्यांना राजीनामा द्यावा लागला.

कारण होता रामगोपाल वर्मा. मुंबईत अतिरेक्यांनी हल्ला झाला. रामगोपाल वर्माला सिनेमा सुचला की काय पण विलासराव त्याला घेऊन ताजला गेले. अर्थात यात त्यांचा अभिनेता पुत्र रितेश देशमुख हेच कारण असणार हे उघड होतं. तेंव्हा रितेश नाच वगैरे सिनेमे करत होता रामगोपाल वर्मा सोबत. रामूला ताजला घेऊन जाणं विलासरावाना महागात पडलं. खूप चर्चा होऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला. दुर्दैवाने एक विलासरावांच्या दृष्टीने सुदैवाची गोष्ट घडली होती ती म्हणजे आर आर आबा यांच्याकडून पण एक खूप चुकीचं विधान निघून गेलं होतं. बडे बडे शहरोमे वगैरे आबा बोलले आणि फोकस स्वतःकडे ओढवून घेतला. पण विलासरावांना खुर्ची सोडावी लागली. मुलाच्या चुकीने. किंवा मुलाच्या प्रेमापोटी.

विलासरावांचा आणखी एक निर्णय अंगलट आला होता. सुभाष घईला फिल्मसिटीमध्ये जमीन दिल्याचा. व्हिसलिंग वूड नावाची सिनेमाचं प्रशिक्षण देणारी संस्था सुभाष घईने सुरु केली. फिल्मसिटीत सगळे नियम धाब्यावर बसवून त्यांना जमीन दिली गेली. कोर्टाने हा निर्णय चुकीचा ठरवला. आज त्या केसमध्ये पुढे काही घडलं नाही पण विलासरावांची बदनामी मात्र झाली होती. पुन्हा एकदा या प्रकरणाचा संबंध लोकांनी आणि मिडीयाने रितेश देशमुखशी जोडला. रितेश देशमुख या गोष्टी साठी जवाबदार आहे की नाही हा मुद्दा नाही. मुख्य मुद्दा हा आहे की विलासरावांनी रितेश देशमुखची ओळख व्हावी म्हणू खूप काही केलं. त्यात काही चूक नाही. प्रत्येक बाप ते करतोच. विलासराव मोठ्या पदावर होते म्हणून त्यांनी जरा जास्त कष्ट केले. त्यात त्यांना नुकसान झालं.

पण आता विलासराव विस्मृतीत जाताहेत. विलासरावांचे चिरंजीव अमित देशमुख यांचं राजकारणातलं वर्चस्व वेगाने कमी होतंय. संभाजी पाटील निलंगेकर मोठे नेते म्हणून समोर आले. चांगली गोष्ट आहे. अमित देशमुख यांनी घराणेशाही चालवावी असं मत नाही. पण विलासरावांच्या लातूरमध्ये त्यांना पराभवाची चव चाखायला लावू नये. विलासराव शक्य तेवढ्या लोकांना भेटायचे. हसत हसत भेटायचे.

मुख्यमंत्री असले तरी बाभूळगावचे सरपंच असल्यासारखेच वागायचे लातूरमध्ये आले की.

विलासराव आणि गोपीनाथराव नेहमी जुगलबंदीने हसवत आले. त्यांना बोलताना मजा यायची दोघांना. लोकांना ऐकताना मजा यायची. या गमती जमतीत लोक पाणी टंचाई विसरून जायचे. खराब रस्ते विसरून जायचे. नवे उद्योग आले नाही हे विसरून जायचे. अर्थात लोकांना हे माहित नव्हतं की विलासराव मुंबईत पश्चिम महाराष्ट्रातल्या दिग्गज लोकांशी पंगे घेत मराठवाड्याच्या विकासासाठी भांडत असायचे. गोपीनाथराव पक्षातल्या विरोधकांनाच तोंड देत देत त्रस्त होते. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की पश्चिम महाराष्ट्राच्या एकीपुढे हे दोघे मराठवाड्याचे नेते खंबीरपणे लढले. त्यांना स्वतःला सिध्द करायला वेळ मिळाला पण त्यानंतर जेंव्हा  मराठवाड्याला न्याय द्यायची वेळ आली तेंव्हा दोघांना पुरेसा वेळ मिळाला नाही. आज सत्तेत पण मुंडेंसारखं मराठवाड्याचं कणखर नेतृत्व नाही. विरोधात पण विलासरावांसारखं लोकप्रिय आणि जनतेचा पाठिंबा असलेलं नेतृत्व नाही. 

अमित देशमुख यांचं काय चाललय माहित नाही. पण रितेश देशमुखकडून लातूरच्या खूप अपेक्षा आहेत. कारण विलासरावांना ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला ते आजही फार हळवं करतं लोकांना. रितेश देशमुखने थोडी तरी परतफेड करावी ही लोकांची अपेक्षा आहे. राजकारणात नाही पण असं काही सामाजिक कार्य करावं की विलासराव यांचं नाव अजरामर व्हावं.

नाना पाटेकर, अमीर खान यांच्या सामाजिक कामाएवढीच रितेश कडून काहीतरी भरीव अपेक्षा लातूरकरांची आहे. रितेशला ही खरंतर उत्तम संधी आहे. रितेश आम्हाला विलासरावांचा राजकीय वारस नसला तरी चालेल. पण त्यांच्या मराठवाड्याशी असलेल्या बांधिलकीला तोड नव्हती. मराठवाड्याला आपला माणूस पाहिजे जो हसत खेळत विचारपूस करेल. एवढ्याच गोष्टीवर मराठवाडा आजवर जगतोय. बाकी अपेक्षा नाही. लातूर विलासरावाना विसरणार नाही. पण चर्चेत लक्षात ठेवायचं का? त्यांचं कार्य करणारा एक देशमुख हवाय. राजकारण नको समाजकारण पण चालेल. पण आता वेळ आलीय. निदान या देशात अवयव प्रत्यारोपण एकदम सहज आणी सोपं व्हायला हवं. कारण मराठवाड्याचे विलासराव या गोष्टीत दिरंगाई झाली म्हणून या जगात नाहीत. या गोष्टीत मराठवाड्यात सगळ्यात जास्त मोठं काम व्हायला हवं. विलासरावांमुळे रितेश कसा हिरो झाला सगळ्यांना माहित आहे. पण विलासराव पण हिरोपेक्षा कमी नव्हते हे वारंवार सांगण्याची जबाबदारी रितेशची आहे.

कारण कॉंग्रेस नरसिंहरावांना पण विसरते. लातूर विलासरावांना विसरणार नाही. पण विलासरावांचा बळेच द्यावा लागणारा राजीनामा पण विसरणार नाही. बाकी कुणाकडून अपेक्षा करणार?  दुर्दैव हे आहे की साला हसत खेळत विचारपूस करणारा नेता सुद्धा नाही मराठवाड्यात. 

1 Comment
  1. Madhavi Tambare says

    अतिशय भाऊक आणि अंत्तर्मुख करायला लावणारा लेख! मराठवाड़ा ही संत आणि कर्तृत्व वाण लोकांची खाण, परंतु मागील दशक भरा पासून कचखाऊ नेते या भागाला खद्द्यात नेण्यत यशस्वी झाले आहेत.

    विशेषः त बीड, लातूर या राजकरण प्रिय जिल्ह्या तील उदयोनमुख चेहरे यात आघाड़ी वर आहेत. समाज चे भरभरून प्रेम लाभलेल्या विलासराव देशमुख यांच्या आत्म्यास याने नक्कीच वेदना होत असव्यात

Leave A Reply

Your email address will not be published.