शेक्सपियरने झपाटलेलं गाव..

“मी पानपट्टीवाल्याकडे सिगरेट मागितली तर त्यान शेक्सपियर समजावून सांगितला. कटिंगवाल्यानं मला ग्रीक फ्रेंन्च नाटकांचा इतिहास सांगितला. पंक्चरवाला कालिदासावर बोलत होता”

कर्नाटकातल अस एक गाव जिथ घराघरात शेक्सपियर आणि कालिदास राहतो. लोक नाटकावर बोलतात, नाटकं लिहतात..

कर्नाटकातला शिमोगा जिल्हा. कर्नाटकातील बंगलोर आणि बेळगाव यांच्यापासून समान अंतरावर असणारा. सह्याद्रीच्या रांगामध्ये घाटमाथ्याजवळ असणाऱ्या कोल्हापूर सारखाच. याच जिल्हात आहे हुगूड्डू नावाच गाव. गावाच विशेष काय, तर गावात असणारी एक संस्था.

या संस्थेला भेट देण्यासाठी सकाळी सात वाजता मी शिमोगा सोडलं. लोकांना हुगूड्डूचा पत्ता विचारत मी या गावात पोहचत होतो. गावाला जाणारा रस्ता म्हणजे डोंगराचा. दोन्ही बाजूला दाट झाडी. कोयते लावलेले म्हातारे, गावच्या चौकात मिश्यांना पिळ देत बसलेली माणसं. ठिकठिकाणी लावलेल्या कन्नड पाट्यांमुळे गावाच नाव वाचण्याचा संबध येत नव्हता. मोडक्या तोडक्या भाषेत पत्ता विचारत मी या गावात पोहचलो.

गावात सुरवातीला संस्थेची मोठ्ठी इमारत. शेजारी छोट्या मोठ्या खोल्या. या खोल्यांच्या बाहेरच चार पाच जण उभा होते. संस्था आणि संस्थेची माहिती अगोदरच माहिती असल्यामुळ मी पहिला गावातल्या लोकांना भेटायच ठरवल. संस्थेच्या इमारतीपासून पुढ गेल्यानंतर अजून एक चौक. चौकात एक हॉटेल दोन चार पानपट्या एक केशकर्तनालय वगैरे वगैरे.

पिक्चर मध्ये जसा गावाचा सेट असतो अगदी तसाच. ज्याला जी गरज असते त्यातल एक एक दुकान. गाडीतून उतरलो आणि एका पानपट्टीत शिरलो सिगरेट मागितली आणि सहज विचारलं.

नाटक के बारे में क्या जानते हो क्या ?

तसा त्यान मला उलटा प्रश्न विचारला,

शेक्सपियर के बारे मैं जानना चाहते हो क्या कालिदास के बारे मैं. फ्रेंन्च कला या आफ्रिका मैं नाटक का क्या स्वरूप हैं. किस बारे में जानना चाहते हो ?

झाल.. त्याच्या एका प्रश्नावर माझ्या बत्या गुल झालेल्या.

मी विचारलं शेक्सपियर के बारेमें क्या कहैना हैं ?

शेजारच्या लुंगीवाल्या म्हाताऱ्यासाठी पान तयार करत तो शेक्सपियर बद्दल सांगत होता.
हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅकबेथ यहां शेक्सपियर क्या था समज आता हैं. उन्हें कला के नियमों का सहज ज्ञान था.वो कवी रहतें तो सुख देते औंर नाटक लिखतें तो दूख की बाते बतातें. वो अनुभव लेते इसिलिए रोम कथा पर नाटक होते हुए भी लोगोको वो अपने लगतें.

पानपट्टीवाला शेक्सपियरवर बोलत होता आणि अर्जुनाला विष्णुनं विश्वरूप दर्शन दाखवल्याचा भास मला पानपट्टीवाल्याकडे बघून झाला.

नाटकात कधी काम केलय का ? अस विचारल्यावर तो म्हणाला पहिले करता थां अब काम की वजह सै नहीं होता. लेकिन जाता हू कभीं कभीं. आगे जो दुकान हैं. वो अभी भी करता हैं. आप उससें पुछ लो.

आत्ता माझा मोर्चा समोर असणाऱ्या केशकर्तनाच्या दुकानाकडे वळला.

दुपार होत आलेली. कटिंगवाला बाकड्यांवर द हिंदू पेपर वाचत बसलेला. त्याचं नाव रवीप्रकाश. तामिळ पिक्चरमध्ये गरिब गाववाले असतात त्या प्रकारची चेहरेपट्टी.
मी पहिलाच प्रश्न विचारला, अंकल कभी नाटक मैं काम कियां हैं ?

तसा तो म्हणाला, अभी तो फ्रेंन्च मैं एक नाटक आया था. उसका हमने यक्षगाण मैं रुपांतरत किया हैं. अभी तो वहीं करता हू. ज्यादा कुछ नहीं वैंसे आप कहा सै हैं.

“मैं पुणा से”

अच्छा तो हम पुणा मैं भी आये थै. पुणा मैं वो भारतनाट्यमंदीर है वहां हमारा शो था. मराठी मै वो विजय तेंडूलकर अच्छा आदमी थां. उनकीं वो घाशीराम कोतवाल देखी हैं हमने. उसका फॉरमॅट अच्छा लगा हमकों. कटिंगवाला मराठी नाटकांवर घसरला. घसरलेल्या गोष्टींवर घसरताना बघून मला विषय बदलण्याची इच्छा झाली.

तो रविप्रकाश आप बचपनसे नाटक मै हिस्सा लेते हो क्या ?

नही नही मै मस्कत मैं था. मेरे दादा पिता सबीं नाटक मै काम करते थे. मैं भी बचपन से काम करता था लेकिंन बाद मे मस्कत चला गया. वहा काम करता था लेकिन फिर कुछ हजम नहीं हूआं तो गाव चला आया. अब कभी कभी नाटक हो जाता हैं और काम भी करता हूं.
नाटक से कुछ मिलतां हैं ?

“पैसे के लिए थोडीहीं करते हैं.”

मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत होती. गावला नाटकांच वेडच नव्हतं तर तितका अभ्यासदेखील होता. गावातले सगळेच लोकं कालिदास, शेक्सपियर, टॉलस्टाय पासून विजय तेंडूलकर, गिरीष कर्नाड यांच्यावर बोलायचे. रवीप्रकाशना विचारल सभीं को मालुम हैं इस नाटक के बारे मै, तर तो म्हणाला गाववाले तो थिसिस लिख कर दे सकते है आपको.

Screen Shot 2018 04 26 at 11.06.05 AM
गावच्या चौकात असणारं कटिंगच दूकान. सोबत रविप्रकाश

एखाद्या संस्थेचा गावावर असा परिणाम व्हावा हे अशक्य होत. मला माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती. समोरून एक विद्यार्थी येताना दिसला.

नेहमीसारख हाय हॅल्लो हिंदी और इंग्लीश अस करत सुरवात केली. याच नाव होत अजित. हा विजापुरचा. नुकताच या संस्थेत प्रवेश मिळवलेला.

त्याला विचारलं नेमकी ॲडमिशनची प्रोसेस काय असते तर तो म्हणाला, संस्थेत दरवर्षी साधारण पाचशे अर्ज येतात. अर्ज प्रश्नपत्रिकेसारखाच असतो. त्यानंतर ग्रुप डिस्कशन घेतल जात. तुम्हाला एखादा विषय दिला जातो आणि त्याबद्दल तुम्हाला काय सुचत ते विचारल जात. कोणत्याही विद्यापीठासारख फिक्स अस काहीच नसत. माझं बी.एस्सी कॉम्युटर झालं. मला नाही वाटत, मी पेपर लिहण्याच सोडून वेगळ काय शिकलो. पण हितं दोन महिन्यात खूप समजलं. याठिकाणी फक्त नाटक करायला सांगितल जात नाही. मेकअप कसा करावा लाइट कशी लावावी इथून सगळच सांगितल जात.

जागतिक नाटकांचा अभ्यास केला जातो. कर्नाटकची लोककला म्हणजे यक्षगाण तर आम्ही फ्रेंन्च नाटक सुद्धा आमच्या फार्म मध्ये आणायचा प्रयत्न करतो. दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात सेमिस्टर पटर्न नाही का अन्युअल पटर्न नाही. सगळ शिकायच आणि वाचायच इतकच.

मुलगा विजापूर जवळच्या खेड्यातला होता. बी.एस्सी करताना कुणीतर त्याला संस्थेबद्दल माहिती सांगितली. आणि त्यान अर्ज केला. सगळे विद्यार्थी तसेच ग्रामिण भागातून आलेले.
एकंदरीत गाव आणि विद्यार्थी यांच्यावर संस्था काय फरक पाडते ते समजत होतं आत्ता संस्थेला भेट द्यायची होती.

संस्थेच्या दारातच दोन तीन माणसं थांबलेली. ओळख झाली. समोरचा व्यक्ती होता श्रीकांत. संस्थेच सर्वच काम पाहणारा.

श्रीकांतनी फोन केला आणि अक्षरा कुठे आहेत याची चौकशी केली.

अक्षरा हे के. वी. सुबन्ना नंतर या संस्थेचा कारभार पाहतात.

अक्षरा आत्ता लेक्चर मध्ये आहेत. तुम्ही आमच प्रक्टिस बघता का ? अस म्हणत ते मला त्यांच्या हॉलमध्ये घेवून जावू लागले. स्टेजवर मुलं कोणत्यातरी नाटकाची तयारी करत होते. समोर लाकडी खुर्चीवर एक शिक्षक. कोपऱ्यात तबला आणि पेटी घेतलेले दोघं आणि समोर यक्षगाणच्या प्रवेशाची तयारी करणारी मुलं. इतक्यात श्रीकांत बोलवायला आले. श्रीकांतबरोबर जाताना ते संस्थेची माहिती देत होते.

Screen Shot 2018 04 26 at 11.48.28 AM
संस्थेचं ग्रॅंथालय

कोणतीतरी एखादी संस्था गावात आली आणि गाव बदलल अस होत नाही. सुरवातीला शेतातली काम झाली की लोकं गवताच्या झोपडीत एकत्र येत. नाटक यक्षगाण जागतिक नाटक याबद्दल चर्चा करत. वेगवेगळे उपक्रम हातात घेत. गावातल्या लोकांच्या सहकार्यानेच निनासम या संस्थेची स्थापना झाली.

निनासम म्हणजे निलकंटेश्वरा नाट्यसेवा संघ.

निळकंटेश्वर ही या गावची स्थानिक देवता. निनासम या नावामागे अजून एक अर्थ आहे नि म्हणजे तू ना म्हणजे मी आणि सम म्हणजे बेरीज. माझी आणि तुझी बेरीज असा काव्यात्मक अर्थ देखील या नावाला मिळालेला आहे. भारताच्या स्वातंत्रयुद्धाच्या कालखंडात अनेक लोक या ठिकाणी एकत्र येत आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत.

त्यातूनच पुढे ग्रंथालय बांधण्याची संकल्पना आली. पुढे अशोका नावाच साप्ताहिक काढण्यास सुरवात करण्यात आली. के.वी. सुबन्ना यांनी गावातल्या लोकांच्या इच्छेला एक मुर्त स्वरूप दिलं. पुढ संस्था मोठ्ठी होत गेली. आज या संस्थेनं १३० नाटके तर नाटक, सिनेमा संस्कृती, तत्वज्ञान यांसारख्या विषयांवर आठशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. संस्था मोठ्ठी झाली पण संस्थेच बाजारीकरण झाल नाही. आज अक्षरा त्याच तळमळीने संस्थेचा कारभार पाहतात.

संस्थेचा इतिहास सांगत ते मला त्यांच्या लायब्ररी मध्ये घेवून जात होते. पाच पन्नास हजार पुस्तकांच ते समृद्ध ग्रंथालय. चार कपाटं झाली की एक टेबल खुर्ची पाठीमागे खिडकी. कन्नड साहित्य नाटक कविता सोबत जागतिक साहित्य भारतीय लोककलेबद्दलची पुस्तके यांचा तो खजिना.

इतक्यात लेक्चर सुटल्याचा आवाज आला. अक्षरा नक्की कोण. तामिळ सिनेमात दाखवतात तशी गजरा घातलेली सुंदर स्त्री जी या संस्थेचा सगळा कारभार बघत असावी असा अंदाज अक्षराच्या नावावरून झालेला. लेक्चर सुटलं आणि हातात झोळी लटकवलेले. बारीक पांढरी दाढी असणारे अनिल अवचटांसारखे दिसणारे गृहस्थ माझ्या समोर उभा राहिले. श्रीकांतनी ओळख करून दिली हे अक्षरा सर.

पत्रकार आहे सांगितल की कोणीही लगेच बोलायला तयार होत हा माझा आत्तापर्यंन्तचा अनुभव पण अक्षरा म्हणाले , जी अब मुझकों एक लेक्चर औंर हैं. आय एम व्हेरी साॅरी लेकिंन मुझै बहोत कम टाइम हैं.

कोठून आला वगैरे चौकशी करुन अक्षरा दूसऱ्या लेक्चरसाठी गेले.

जाताना परत भेटण्याचा शब्द देताना त्यांनी संस्थेच्या एका विद्यार्थाला आमच्यासोबत पाठवले.
अक्षरा लगेच गेले मात्र मला बर वाटल हा माणूस प्रसिद्धीपासून दूर राहून फक्त काम करणाऱ्यातला होता.

संस्था पाहिली. गाव पाहिलं. गावातली माणस पाहीली. पण हे नुसतच बघून झालेलं.हितं गवताच्या झोपडीत शेक्सपियर होता. शेक्सपियर होता म्हणून तो मोठ्ठा नाही तर तो समाधानी होता. कलेवर झपाटल्याप्रमाणे प्रेम करणार हे गावं होतं. क

र्नाटकातल्या एका कोपऱ्या कोपऱ्यावर मला शेक्सपियर दिसावा हे विश्वास बसण्यासारखं नव्हतचं. कुणास ठावुक भारताच्या वळणावळणावर अजून काय काय घेवून जगणारी माणसं भेटतील….

  • सौरभ पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.