गावागावात असणारे बायोगॅस, गोबरगॅस कशामुळं बंद पडले..?

डोक्याला जरा ताण देवून जुन्या गोष्टी आठवा. म्हणजे हळुहळु मागं जा. कोरोना आला लॉकडाऊन झालं. त्याच्यापूर्वी २०१४ ला मोदींची लाट आली होती. त्याच्याहीपुर्वी चायना मोबाईल आले होते. त्याच्याहीपूर्वी इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमियाची गाणी वाजत होती. त्याच्याही पुर्वी राज पिक्चरमधली गाणी वाजत होती…

बस्स याच काळात जा आणि आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करा.

घरात कॅसेट असणारा टेप, व्हिडीओकॉन बझुकाचा टिव्ही, गावात आलेली नवीन स्पेंडर..आणि घराच्या मागं असणारा गोबरगॅसचा भल्लामोठ्ठा सांगाडा..

एक काळ होता जेव्हा ग्रामीण भागात सर्रास गोबरगॅस वापरायला सुरवात झालेली. चुलीपेक्षा बरय म्हणून म्हाताऱ्याकोताऱ्या पण हा गॅस वापरायच्या. तर काय ठिकाणी आत्ता संडासावरचा गॅस जेवाय वापरायचा का म्हणून जेवणासाठी सोडून सगळ्यासाठी गोबरगॅस वापरायच्या.

पण हळुहळु गोबरगॅस गायब होत गेले. घरामागची नाय म्हणलं तरी अर्धा गुंठा जमीन खावून टाकणारे हे गोबरगॅस बंद का झाले..?

तुम्ही म्हणाल हे आत्ताच का सुचलं, तर का सुचलं ते सांगतो. एकतर आत्ता गाईंना चांगल मार्केट आलय आणि दूसरं म्हणजे घरगुती गॅस मार्केट खायलेत. मग आत्ताच सुचलं पाहीजे की…

तर आज आपण चर्चा करणाराय गावागावात असणारे गोबरगॅस बंद का आणि कसे झाले..?

त्यासाठी सर्वात पहिला बायोगॅस आणि गोबरगॅस यातला फरक समजून घेतला पाहीजे.

एका बंद टाकित कचरा, मेलेल प्राणी टाकून जो गॅस तयार केला जातो त्याला बायोगॅस म्हणतात. तर गोबर गॅसमध्ये फक्त शेण आणि पाणी वापरलं जायचं. म्हणून या पद्धतीला गोबरगॅस म्हणतात. दोन्ही तयार करण्याच्या सिस्टीम, प्रोसेस सेमच म्हणूनच नावांमध्ये पण सेमपणा यायचा. म्हणजे काही ठिकाणी बायोगॅस ला गोबरगॅस म्हणायचे तर काही ठिकाणी गोबरगॅसला बायोगॅस म्हणायचे.

आत्ता हा घरगुती गॅस तयार करण्याचा कार्यक्रम कुठे गंडला ते पाहूया..

तर भारतात खादी व ग्राम उद्योगाकडून ४० टक्के अनुदान आणि ६० टक्के कर्ज हा प्रकल्प सुरू करणाऱ्यांना देण्यात येत होतं. साधारण १ किलो वाळलेलं शेण म्हणजेच गोवऱ्या जाळल्या तर त्यातून ४ हजार कॅलेरी उर्जा तयार होते आणि तेच शेण गोबरगॅससाठी वापरलं तर त्यातून २०० कॅलरी गॅस तयार होतो.

मग इतक्या उचापत्या करून गॅस का तयार करा, तर ते फक्त शुद्धतेसाठी. शेणाच्या गोवऱ्या चुलीसाठी जाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर होतो. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी बायोगॅस तयार करावा असा प्रचार करण्यात आला होतो. पण आपल्याकडे आरोग्यापेक्षा खिश्याकडे लक्ष असल्याने हा प्रचार बायोगॅसचं जाळं विणू शकला नाही.

दूसरी गोष्ट म्हणजे गोबरगॅस प्रकल्पासाठी किमान रोजचं २० किलो शेण लागायचं.

ज्यांच्या घरात मुबलक गाई म्हशी होत्या त्यांना हे शक्य झालं मात्र ज्यांच्या घरात एकच गाई होती त्यांना हे जरा अवघडच प्रकरण होतं. अजून एक गोष्ट म्हणजे पाण्याची. गोबरगॅस प्रकल्पासाठी ४० लीटर पाणी लागायचं. आत्ता आपल्या ग्रामीण भागात आज माणसांना प्यायला पाणी मिळत नाही अशा वेळी रोजचं हे ४० लिटर अशक्यचं होतं.

तुम्ही म्हणाल सांडपाणी आणि मानवी मैला व शेण याची जुळणी करून हे शक्य होतं. तस हे शक्यही होतं पण लागणारी जागा, व्याप आणि यासाठीची किचकिच त्यामुळं लोकांनी इतर कोणताच पर्याय नव्हता तेव्हा गोबरगॅस वापरला पण नंतर मात्र पर्याय आले आणि गोबरगॅस मागे पडत गेला.

हळुहळु गॅस सिलेंडरचा प्रचार आणि प्रसार झाला. पुर्वी तालुक्याला असणारी एकच एजन्सी. त्यातही नंबर लावून मिळणारा गॅस सिलेंडर ही प्रोसेस मागे पडू लागली. गॅस सिलेंडर मिळणं तुलनेत सोप्प पडू लागलं. या टप्प्यात लोकांची लग्न होवू लागली तेव्हा लग्नाच्या हुंड्यात पण गॅस शेगड्या मिळू लागल्या. म्हणजेच काय एक डेव्हलपमेंट होवू लागली होती व त्यात गॅस सिलेंडर हा सहज सोप्पा होवू लागला होता.

त्यामुळेच योग्य पर्याय मिळू लागला व गॅस सिलेंडरचा भाव वाढला..

यात सरकारमार्फेत देखील उज्ज्वला योजनेसारख्या योजना आल्या. त्यातूनही ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळू लागला. कुटूंब देखील छोटी होत गेली. चार पाच जणांच्या कुटूंबासाठी इतका गॅस करायचा कसा आणि इतक्या गॅसच करायचं काय हे दोन्ही प्रश्न होते त्यामुळं LPG सिलेंडरचाच पर्याय निवडण्यात आला.

सोबतच १९४० ते २०२२ दरम्यान गोबर गॅस तंत्रज्ञानात फारसा बदल झाला नव्हता.. 

जगात बायोगॅस प्रकल्पांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. उदाहरणार्थ चीनचं. इथे छोटी जागा व्यापणारे, कमी खर्चात बांधता येणारे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले. त्यामुळे चीन या क्षेत्रात पुढे गेलं. पण भारतात मात्र गुरांची संख्या जास्त असूनही यांची संख्या ७० हजारांच्या वर पोहचली नाही. त्यामुळेच हळुहळु का होईना हे गोबरगॅस बंद पडत गेले आणि संपले…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.