मुंबईत सिमेंटच्या पाईपमध्ये दिवस काढले. पुढे अख्खा बॉलिवूड ‘लायन’ म्हणून ओळखू लागला.

बॉलिवुडमध्ये जसे हीरो बदलत गेले तसे काळानुरूप खलनायक सुद्धा बदलत गेले. आत्ता हे बदलणं म्हणजे काय? तर प्रत्येक सिनेमा हा त्या काळाचं एक प्रतिबिंब असतं. उदाहरणार्थ ‘शोले’ मधल्या गब्बर सिंग सारखे डाकू १९७० दरम्यान भारतामध्ये अस्तित्वात होते. त्यांचं रूप सुद्धा गब्बर सारखंच. दाढी वाढलेलं, केस पिंजारलेले असे डाकू. त्यामुळे जुन्या सिनेमांमध्ये असलेले गुंड, डाकू सुद्धा असेच काहीसे.

ही प्रथा मोडून सिनेमातला खलनायक या अभिनेत्यामुळे पहिल्यांदा सुटा बुटात आला. हा अभिनेता म्हणजे अजित खान.

खलनायक म्हणून अजित खान यांच्याविषयी सांगण्याआधी अजित खान यांची एक विशेष ओळख सांगायची झाली तर… ‘मुगल ए आजम’ सिनेमा खूप जणांनी पहिला असेल. या सिनेमात एक गोरा , उंच असा दुर्जन सिंग शहेनशाह अकबर सोबत दिसतो. अभिनयापेक्षा दुर्जन सिंगचं रुबाबदार व्यक्तिमत्व नजरेत येतं. याला कारण म्हणजे अजित खान. ‘मुघल ए आजम’ सिनेमात त्यांनी रंगवलेला हा दुर्जन सिंग विशेष लक्षात राहिला.

सिनेमात खलनायक साकारण्यात हातखंडा असलेले अजित खान यांचं पूर्वायुष्य सुद्धा काहीसं रंजक घटनांनी भरलं‌ आहे.

त्यांचं मूळ नाव हमीद अली खान. त्यांचे बाबा बशीर आली खान निजामाच्या सैन्यात होते. हमीदला लहानपणापासून अभिनयाची प्रचंड आवड. परंतु अभिनय करण्यासाठी वडिलांचा सक्त विरोध. मग काय ! कॉलेजची पुस्तकं विकून त्यांनी मुंबईचं ट्रेनचं तिकीट खरेदी केलं. हमीद या स्वप्ननगरीत दाखल झाला. पण त्याची कोणाशी ओळख नव्हती. सुरुवातीचे काही दिवस एका नाल्याशेजारी सिमेंटच्या पाईपमध्ये ते राहत होते.

हळूहळू त्यांना सिनेमात कामं मिळत गेली. पण कामं म्हणजे कसली कामं तर.. गर्दीत तिसऱ्या ओळीत वगैरे त्यांना उभं करायचे.

अभिनयाची आवड असल्याने भूमिका कसलीही असो ती चोख साकारायची हे त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे हमीद नकळत तिसऱ्या ओळीतून पहिल्या ओळीत आला. गर्दीत छोट्या भूमिका साकारणारा हमीद महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट यांच्या नजरेत आला. त्यांनी सर्वप्रथम उच्चारायला मोठं असल्याने हमीद आली खान हे त्याचं नाव बदलून अजित हे नाव ठेवलं. आणि केवळ मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर अजित खान यांना ‘नया दौर’, ‘मुघल ए आजम’, ‘सोने की चिडिया’ यांसारख्या मोठ्या सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अजित खान यांना सिनेमांमध्ये कामं मिळत होती. इतकंच नव्हे तर ‘नास्तिक’, ‘बडा भाई’, ‘मिलन’ यांसारख्या सिनेमांमध्ये ते हीरो म्हणून झळकले.

इतर भूमिका करता करता अजित खान ‘सूरज’ या सिनेमातून पहिल्यांदा विलन म्हणून समोर आले. आणि त्यानंतर ‘जंजीर’ आणि ‘यादो की बारात’ मध्ये त्यांनी रंगवलेला विलन प्रचंड लोकप्रिय झाला. याला कारण असं.. अमरीश पुरी यांचा स्वतःचा एक आवाज होता. यामुळे अमरीश साब जेव्हा खलनायक म्हणून समोर यायचे तेव्हा भारदस्त आवाजामुळे ते समोरच्याला गारद करायचे. असाच काहीसा विशिष्ट आवाज अजित खान यांनी विलन करताना वापरला.

त्याकाळी सिनेमांमधले खलनायक हे मोठ्याने ओरडणारे, किंचाळणारे होते. अजित खान यांचा खलनायक मात्र वागण्या बोलण्यात शांत असायचा.

‘जंजीर’ मध्ये त्यांनी उभा केलेला तेजा तर कोणीच विसरू शकत नाही. ‘लिली डोन्ट बी सिली हे’ त्यांचं वाक्य असो .. किंवा ‘यादो की बारात’ सिनेमात त्यांचा ‘मोना डार्लिंग’ हा संवाद असो.. बोलण्याची अनोखी पद्धत, विशिष्ट आवाज आणि प्रभावी संवादफेक या तीन कौशल्यांवर अजित खान यांच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या.

आपण आजच्या काळात जसे सोशल मीडियावर मिम्स बघतो तसं त्या काळात लोकांमध्ये अजित खान यांच्या या संवादांवर विनोद व्हायचे. त्यांच्या याच संवादाचा वापर जावेद जाफ्रीने मॅगीच्या एका जाहिरातीसाठी केला. तो संवाद असा होता, “बास, पास द सास”. तसेच पार्ले जी ने बिस्किटांचा खप वाढवण्यासाठी अजित यांच्या मदतीने “माल लाये हो?” या डायलॉगचा वापर केला.

अजित खान यांनी सिनेमांमध्ये जे खलनायक साकारले ते शिकलेले, चांगले कपडे घातलेले, थंड डोक्याने विचार करणारे होते. त्यामुळे एकूणच हिंदी सिनेमांमध्ये असलेली टिपिकल खलनायकाची व्याख्या अजित खान यांनी बदलली.

प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्यांचं राहणीमान साधं होतं. ते दरवर्षी स्वतःसाठी सहा जोड पांढऱ्या रंगाचे शर्ट – पँट, आवश्यक तेवढी सिगरेट आणि खूप सारी पुस्तकं खरेदी करायचे. हीरो तेव्हाच मनात ठसतो जेव्हा त्याच्यासमोरचा विलन तगडा असतो. अजित खान यांनी असेच तगडे विलन साकारून भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची अजरामर ओळख निर्माण केली. आज त्यांची पुण्यतिथी.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.