विमलताईंनी फक्त नाव सांगितलं आणि त्यांना आमदारकी मिळाली

भारतीय क्रिकेटचा बाजीराव कोणाला म्हणतात ठाऊक आहे?  खंडेराव मोरेश्वर रांगणेकर.  भारतीय क्रिकेटमधले डावखुऱ्या हाताने बॅटिंग करणारे सर्वोत्तम खेळाडू समजले जायचे. फिल्डर तर ते भन्नाटच होते. त्याकाळी कव्हर पॉइंटवरील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं.

मुंबईमधल्या सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी अशा कित्येक खेळाडूंचे आदर्श हेच खंडू रांगणेकर होते.  बीसीसीआयचे उपाध्यक्ष देखील बनले. अनेक वर्षे मुंबई क्रिकेट असोशिएशनवर त्यांनी राज्य केलं. त्यांची पत्नी म्हणजे विमलताई रांगणेकर.

पण फक्त खंडू रांगणेकर यांची पत्नी एवढीच ओळख सांगणे म्हणजे विमलताईंवर अन्याय केल्याप्रमाणे ठरेल. त्या स्वयंभू नेत्या होत्या, सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ठाण्याच्या माजी आमदार देखील होत्या. विधानसभेत त्यांनी तालिका सभापती म्हणून देखील काम केलं. आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे त्यांनी विधिमंडळात चांगलीच छाप पाडली होती.

ठाण्यातील १९५२मधील काँग्रेसचे पहिले आमदार व ज्येष्ठ विधिज्ञ माधवराव हेगडे यांच्या त्या कन्या होत. आपल्या तरुण वयात त्या उत्तम खेळाडू म्हणून गाजल्या. एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असताना त्यांनी रनिंग, बॅडमिंटन व कबड्डी खेळात पारितोषिके मिळविली होती.

१९६० पासून जिल्हास्तरावर अल्पबचतीसाठी त्यांनी खूप कार्य केले. १९६१साली त्या रेडक्रॉसच्या सेक्रेटरी झाल्या. त्या कामाबद्दल त्यांनी अनेक बक्षिसे व प्रमाणपत्रे मिळाली. १९६५-६६ मध्ये हाफकिन्समध्ये ट्रिपल इंजेक्शन योजना सल्लागार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केले. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाइड संस्थेकडून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या गाइड कमिशनर हे मानाचे पद मिळाले होते. सरकारच्या महिला आर्थिक विकास योजनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

हे सगळं सुरु असताना सक्रिय राजकारणात उतरण्याचं स्वप्न देखील त्यांनी कधी पाहिलं नव्हतं. गोरगरीब स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनच त्या ओळखल्या जायच्या. निवडणूका आल्या की काँग्रेसची स्वयंसेविका म्हणून काम करण्याच्या एवढाच काय तो त्यांचा राजकारणाशी संबंध.

सत्तरच्या दशकाचा काळ. दिल्लीत इंदिरा गांधी सत्तेत होत्या. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान तर त्या होत्याच पण पाकिस्तानची फाळणी करून आपला कणखरपणा देखील त्यांनी दाखवून दिला होता. महिला राजकारण्यांबद्दल असलेला गैरसमज त्यांनी मोडून काढला. इतकंच नव्हे तर जास्तीतजास्त महिलांनी राजकारणात प्रवेश करावा यासाठी त्या आग्रही असायच्या.

१९७२ सालच्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना निरोप पाठवला कि महाराष्ट्रात महिला आमदारांचे कमी असलेले प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यातून कमीतकमी एका महिला तरी निवडून आलीच पाहिजे यासाठी प्रयत्न करा.

इंदिरा गांधींचा फतवा जारी झाल्यावर संपूर्ण काँग्रेसी यंत्रणा झाडून कामाला लागली. महिला उमेदवारांचा शोध सूर झाला. तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते बाळासाहेब सावंत. त्यांनी ही जबाबदारी पक्षाचे सचिव शरद पवार यांना दिली होती. त्यांनी ठाण्यात विमलताई रांगणेकर यांना फोन केला.

साहेबानी तुम्हाला रिव्हिएरा वर पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगसाठी बोलावले आहे.

मोठमोठ्या नेत्यांनी आपल्यासाठी शब्द टाकला आहे त्यांचा मान राखावा म्हणून विमलताई त्या मिटिंगसाठी गेल्या. तिथे गेल्यावर लक्षात आलं की इथे तर आमदारकीच्या तिकीटवाटपासाठी इच्छूकांच्या मुलाखती सुरु आहेत. आपण आमदार वगैरे व्हावं हे यापूर्वी त्यांच्या डोक्यात देखील आलं नव्हतं.

पक्षाच्या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या इच्छूकांचे नाव पुकारून बोलावून घेतलं जात होतं. प्रश्ने विचारली जात होती. उलटतपासणी घेऊन त्यांची विजयाची क्षमता, तयारी आहे का, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याची चौकशी केली जात होती.     

काही वेळाने बाळासाहेब सावंत यांनी घोषणा केली,

“विमलताई नाव सांगा.”

विमलताई उभ्या राहिल्या,”विमल खंडू रांगणेकर.” एवढं बोलून त्या खाली बसल्या. 

त्यांची मुलाखत एका प्रश्नावर संपली. त्यांना ठाण्यातून काँग्रेसचे  तिकीट जाहीर झाले. इतकंच नाही तर त्यांच्या प्रचारासाठी जेष्ठ नेते, कार्यकर्ते यांनी जोरदार प्रयत्न केले आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देखील आणले. राज्याच्या इतिहासात कोणताही वाद न होता, कोणतीही राजकीय जुगलबंदी न होता एका सामान्य कार्यकर्तीला तिकीट मिळणे आणि त्या निवडून देखील येण्याची हि पहिलीच घटना असावी.

महाराष्ट्रातून निवडून आलेल्या या महिला आमदारांप्रती इंदिरा गांधींना विशेष आपुलकी होती. ७२च्या दुष्काळात जेव्हा विरोधकांकडून वसंतराव नाईकनावर आरोप होत होते तेव्हा याच महिला आमदारांचं शिष्टमंडळ इंदिरा गांधींच्या भेटीसाठी गेलं होतं. त्यांनी खरी परिस्थिती समजावून सांगितली. इंदिराजींनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला व महाराष्ट्राला अन्नधान्याचा साठा वाढवून दिला.

आपल्या सहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात विमल ताईंनी ठाण्यात अनेक विकासाची कामे केली. कष्टकरी महिलेला दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणाऱ्या विमलताईंना गोरगरीब स्त्रिया ‘ताई’ या नावानेच आपुलकीने हाका मारीत.

आपली अखेरची काही वर्षे त्या पुण्यात वास्तव्याला होत्या. आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. २५ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.