विनय आपटेंनी शरद पोंक्षे यांच्या नावाची घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला

रंगभूमी ही दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षक यांच्या यांच्याभोवती वावरणारी संकल्पना आहे. बॅकस्टेजला काम करणारी मंडळी, नेपथ्य निर्माण करणारा कलंदर माणूस, रंगभूषाकार आदी सर्वजण सुद्धा नाटकाचा एक प्रयोग सजवायला नाटक सादर होण्याअगोदर विंगेत धडपड करत असतात. जेव्हा नाटकाचा पडदा उघडतो तेव्हा प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामध्ये होणाऱ्या साद – प्रतिसादांचा अनोखा खेळ बघायला मिळतो.

म्हणून सिनेमांपेक्षा नाटक ही खूप मोठ्या प्रमाणात जिवंत अशी कला आहे. आपण अभिनय कसा करत आहोत याची पोचपावती रंगमंचावर काम करत असलेल्या कलाकाराला त्याक्षणी मिळत असते. रंगभूमीच्या इतिहासामधले सोनेरी क्षण चाळल्यावर एक अनोखा किस्सा सापडतो.

तो किस्सा असा की, नाटकाच्या दिग्दर्शकाने निर्माण केलेल्या अजब पेचामुळे एका कलाकाराला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद येतो याची पराकोटीची उत्कंठा लागली होती.

हा कलाकार म्हणजे शरद पोंक्षे. आणि तो दिग्दर्शक म्हणजे विनय आपटे.

महात्मा गांधी हे केवळ आपल्या देशापुरते नव्हे तर संपूर्ण जगासाठी असलेलं एक पूजनीय व्यक्तिमत्व. अशा महान माणसाच्या आयुष्याची वेगळी बाजू मांडणारं नाटक लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलं. हे नाटक मराठी रंगभूमीवर आणण्याचं धाडस केलं ते विनय आपटे या दिग्दर्शकाने. धाडस शब्द अशासाठी वापरला आहे की, नाटकाचा विषय काहीसा वादग्रस्त होता. मराठी रंगभूमीच्या चौकटी पलीकडचा.

गांधीजींना उद्देशून असणारी मोठमोठी स्वगतं, गांधीजींचं अस्तित्व संपवणाऱ्या नथुराम गोडसेने व्यक्त केलेली त्याची बाजू अशा अनेक गोष्टी या नाटकामध्ये असणार होत्या. त्यामुळे असं नाटक रंगभूमीवर आणण्याचं धाडस विनय आपटे या माणसाकडे होतं.

कारण नाटक रंगभूमीवर सादर झाल्यावर वाद होणार हे उघड होतं. तरीही विनय आपटे यांनी हे धाडस करायचं ठरवलं.

आणि प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक साधारणत: १९९८ साली रंगभूमीवर आलं.

एखाद्या नाटकात मोजकेच संवाद वाट्याला आलेल्या एका कलाकाराच्या अभिनय क्षमतेवर विनय आपटेंनी विश्वास ठेवला. हा कलाकार होता शरद पोंक्षे. हे सुद्धा विनय आपटे यांचं एक धाडस म्हणावं लागेल. कारण ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकात लांबलचक पल्लेदार वाक्य होती. मराठी भाषेचा एक वेगळा आविष्कार या नाटकात होता. त्यामुळे अभिनय उत्तम असलेला, भाषेवर प्रभुत्व मिळवलेला शरद पोंक्षे हा कलाकार विनय आपटेंनी निवडला.

शरद पोंक्षेंनी सुद्धा हा विश्वास सार्थ ठरवला. आणि यापुढे नथुराम गोडसे म्हणजे शरद पोंक्षे हे समीकरण बनलं.

अपेक्षेप्रमाणे या नाटकाला कोर्टकचेरी, आंदोलनं, राजकारणी व्यक्तींचा रोष अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. परंतु नाटकाच्या संपूर्ण टीमला आणि प्रामुख्याने दिग्दर्शक विनय आपटे यांना स्वतःच्या कलाकृतीवर विश्वास होता.

त्यामुळे अजिबात डगमगून न जाता त्यांनी हा सर्व विरोध सहन केला आणि ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे प्रयोग चालू ठेवले.

या नाटकाला सामजिक आणि राजकीय स्तरांमधून जरी विरोध होत असला तरीही नाट्यरसिकांनी या नाटकावर भरभरून प्रेम केलं. या नाटकात गांधींचा कुठेही द्वेष केलेला दिसत नाही. किंवा कोणत्याही प्रसंगात नथुराम गोडसेला हिरोचा दर्जा दिलेला नाही. लेखक तटस्थपणे स्वतःची बाजू मांडतो. प्रेक्षक म्हणून आपणही मनात कोणाच्याही बाजूने माप न झुकवता तटस्थपणे या नाटकाचा आस्वाद घेतला की एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचं भरभरून कौतुक होत होतं. शरद पोंक्षे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसे या भूमिकेची सर्वत्र चर्चा होती. परंतु नाटकाच्या जाहिरातीत शरद पोंक्षे यांचं नाव ठळक नव्हतं.

नाटकात प्रमुख भूमिका जरी त्यांची असली तरीसुद्धा नाटकाच्या जाहिरातीत कलाकारांची जी नावं असतात त्यात इतर कलाकारांच्या नावामध्ये शरद पोंक्षे यांचं नाव होतं.

‘शरदच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होती. प्रेक्षक त्याच्यावर भरपूर प्रेम करत होते. मुळात हे संपूर्ण नाटक त्याचं होतं. त्यामुळे जाहिरातीत नाही तर निदान नाटकाच्या मध्ये शरदच्या नावाची घोषणा ठळक व्हावी’

अशी इच्छा नाटकात नाना आपटेची भूमिका करणाऱ्या विवेक जोशी या कलाकाराने व्यक्त केली. विवेक जोशींनी ही इच्छा शरदला बोलून दाखवली.

इतके प्रयोग झाले होते, त्यामुळे शरद पोंक्षे यांच्याही मनात ही इच्छा कित्येक वेळा डोकावून गेली होती.

परंतु दिग्दर्शक विनय आपटे यांचा दरारा इतका होता, कि शरद पोंक्षे यांनी कधीही ती इच्छा बोलून दाखवली नाही. एके दिवशी नाटकाचा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होता. या प्रयोगाला दिग्दर्शक विनय आपटे स्वतः उपस्थित होते. त्या प्रयोगाला विवेक जोशींनी ही इच्छा विनय आपटेंना सांगितली.

“ठीक आहे. मी स्वतः ही घोषणा करेन. पण शरदचं नाव घेतल्यानंतर पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरच्या हाउसफुल प्रयोगाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला नाही, तर पुन्हा माझ्याजवळ यायचं नाही. आणि आहे तसंच चालू राहील.”

विनय आपटेंनी स्पष्टपणे स्वतःचं मत सांगितलं. विनय आपटे यांचं हे बोलणं विंगेत उभ्या असलेल्या शरद पोंक्षे यांनी ऐकलं. शरद पोंक्षे यांना आता वेगळेच दडपण आलं. प्रयोग पुण्यात होता.

पुण्यातले प्रेक्षक चोखंदळ. त्यांचे स्वभाव निराळे.

नेहमी कोणताही आवाज न करता शांतपणे प्रयोगाचा आनंद घेणारे. त्यामुळे माझ्या नावाच्या वेळेस प्रेक्षकांकडून टाळ्या येतील का? ‘ असा एक वेगळाच प्रश्न शरद पोंक्षे यांच्या मनात उभा राहिला.

नाटकाचा पहिला अंक झाला. दुसरा अंक थोड्याच वेळात सुरू होणार होता. तिसरी घंटा झाली. विनय आपटेंनी कागद घेतला.

‘रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून….”

अशा भारदस्त आवाजात विनय आपटेंनी सर्वांची नावं घ्यायला सुरुवात केली. शरद पोंक्षे विंगेत होते. कारण लगेच दुसऱ्या अंकाचा पहिलाच प्रवेश त्यांचा होता. विनय आपटे एक-एक करून सर्व कलाकारांची नावं घेत होते. शरद पोंक्षे यांच्या नावाची घोषणा करण्याअगोदर त्यांनी विंगेत शरद पोंक्षे यांच्या चेहऱ्यावरची तगमग बघितली.

ते मनोमन हसले. आणि स्वतःच्या भारदस्त आवाजात विनय आपटेंनी घोषणा केली,

“आणि नथुराम गोडसेच्या भूमिकेत शरद पोंक्षे”

ही घोषणा झाल्यावर, पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शरद पोंक्षे यांच्या मनावरचं दडपण दूर झालं. जीव हायसा झाला. त्याक्षणी दिग्दर्शक विनय आपटे आणि कलाकार म्हणून शरद पोंक्षे यांच्यामध्ये झालेला अबोल संवाद खूप काही सांगून गेला. या प्रयोगानंतर पुढे प्रत्येक प्रयोगाला शरद पोंक्षे यांच्या नावाची घोषणा ठळकपणे करण्यात आली.

अशाप्रकारे कलाकार, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांमध्ये रंगणारा एक आगळावेगळा प्रयोग म्हणजे नाटक.

आज ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे दिग्दर्शक विनय आपटे आपल्यात नाहीत. परंतु त्यांनी दिलेली शिकवण जोपासून ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत शरद पोंक्षे आणि संपूर्ण टीमने या नाटकाचे प्रयोग सुरूच ठेवले.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.