कोरोना काळात आरक्षणासाठी मोर्चा काढणं कितपत योग्य?
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज सध्या आक्रमक झाल्याचं दिसून येतं आहे. आणि हा आक्रमकपणा आता मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची शक्यता आहे. याचा प्रत्यय म्हणजे आज काही तरुणांनी मंत्रालयाच्या गेटवर काळा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आता आजचं शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी मराठा समाजाकडून थेट राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या ५ जूनपासून बीडमधून या मोर्चाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मेटेंनी याबाबत माहिती दिली. त्यावेळी ते पुढे म्हणाले,
हे मोर्चे आता मूक नाहीतर बोलके असणार आहेत, आणि हे सर्व मोर्चे कोणत्याही एका संघटनेचे नसून संपूर्ण मराठा समाजाचे असणार आहेत.
तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली आहे. ते मराठा आरक्षण प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी, काही सूचना जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा काढणार आहेत. त्यासोबतच ते २७ तारखेला मुंबईत येणार असून त्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेते यांची भेट घेणार आहेत.
या भेटीत सर्वांशी चर्चा करून नेमकी मराठा समाजाची काही भूमिका आहे, हे सविस्तर पद्धतीनं आपण मांडू असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मात्र याच वेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मोर्चा काढण्यास मात्र विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले,
आरक्षणासाठी मराठा समाजानं आत्तापर्यंत ५८ मूक मोर्चे काढले आहेत. आता पुन्हा नव्यानं मोर्चे काढण्याची गरज नाही. कोरोनाचा काळ आहे, आणि अशात आता जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे आंदोलन, उद्रेक या शब्दाला आता स्थान नाही.
त्यामुळे एका बाजूला विनायक मेटे यांची घोषणा आणि दुसऱ्या बाजूला संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका अशा परिस्थिती खरंच कोरोना काळात मोर्चा काढणं योग्य कि अयोग्य असा प्रश्न सध्या समाजमाध्यमांवर विचारला जातं आहे. याच प्रश्नाचा ‘बोल भिडू’ने घेतलेला आढावा…
सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती कशी आहे?
राज्यात काल म्हणजे २३ मे रोजी २६ हजार ६७२ रुग्ण नव्यानं सापडले आहेत. तर २९ हजार १७७ रुग्णांना डिस्चार्च दिला होता. मात्र त्यानंतर देखील आज घडीला तब्बल ३ लाख ४८ हजार ३९५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात आणि राज्यात आगामी काळात तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे.
अशा सगळ्या गंभीर परिस्थितीमध्ये मोर्चा काढणं योग्य कि अयोग्य?
याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,
आमची भूमिका विनायक मेटेंच्या आंदोलनापेक्षा पूर्ण वेगळी आहे, ती आम्ही २७ तारखेला जाहिर करूच. पण यात आम्ही कुठेही जनतेला वेठीस धरणार नाही किंवा त्यांचं आरोग्य देखील धोक्यात आणणार नाही. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे योग्य नाही.
मुळात मोर्चाने हा प्रश्न सुटणार नाही, मोर्चाच्या देखील पलीकडे सरकारवर दबाव आणण्याचे अनेक उपाय आहेत. त्यावर सध्या विचार सुरु आहे.
तर छावा संघटनेचे धनंजय जाधव ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,
मराठा समाजातील अनेक जण या कोरोना काळात दगावले आहेत, यात मग काही आमच्या संघटनेत काम करणारे होते, काही सेवा संघात काम करणारे होते. त्यामुळे आता रस्त्यावर मोर्चे काढून आम्हाला आणखी बांधवाना गमवायचे नाही.
सध्याच्या स्थितीमध्ये आंदोलन रस्त्यावर उतरून करण्यापेक्षा ते डिजिटल असावे. समाजाच्या भावना जरी तीव्र असल्या तरी आरोग्य आणीबाणी आहे हि गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक विकास पालसकर ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,
आजच्या घडीला मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, पण त्याच वेळी आरोग्याची परिस्थिती देखील पाहायला हवी. आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाची आकडेवारी कंट्रोलमध्ये येताना दिसत आहे, पण त्याच वेळी पश्चिम बंगाल, केरळ, उत्तरप्रदेश आणि ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, गर्दी झाली त्याठिकाणी परिस्थिती भयावह आहे.
त्यामुळे सध्या तरी मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढण्यासाठी थांबायला हवं. मोर्चा काढणं आवश्यकचं आहे, आपला आवाज सरकार पर्यंत पोहोचायला हवा. पण आणखी थोडे दिवस हा मोर्चा पुढे ढकलायला हवा.
तर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार काकडे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,
आता मोर्चा काढणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. कारण ज्या काही गोष्टी शासनाच्या अखत्यारीमध्ये आहेत, त्या देखील ते करताना दिसत नाहीत. आम्ही १५ दिवसांपूर्वी शासनाला काही सूचना केल्या होत्या, मात्र त्यातील एकही गोष्ट केलीली नाही. त्यामुळे या सरकारला जाग करणं गरजेचं आहे.
आता राहिला प्रश्न कोरोनाचा. तर बंगालमध्ये कोरोनाकाळात निवडणूक झाली, याआधी देखील राज्यात कोरोना काळात मोर्चे झाले. यात मग अगदी कंगना-सुशांतच्या समर्थनापासून ते शेतकरी आंदोलनासाठीच्या मोर्चांचा समावेश होता. त्यामुळे मराठा समाज आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत असेल तर त्यात गैर काहीही नाही. आम्ही मोर्चामध्ये जे सहभागी होतील त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊ.
याबाबत ‘बोल भिडू’ने मराठा समाजातील काही तरुणांची देखील मत जाणून घेतली आहेत.
यात नुकतीच इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केलेला पंढरपूरचा अभिजित जाधव म्हणतो,
सध्याची परिस्थिती बघता मोर्चा काढण्यावाचून आम्हाला पर्याय नाही. मान्य आहे कोरोना मागच्या दिड वर्षांपासून तळ ठोकून आहे. पुढे देखील तिसऱ्या लाटेचा धोका आहे. कधी जाईल हे माहित नाही.
पण त्यासोबतच आमच्या भविष्याचा प्रश्न देखील महत्वाचा आहे ना. आताचं जर काही पावलं नाही उचलली तर उद्या जून-जुलैमध्ये आमचे प्रवेश सुरु झाल्यानंतर आम्हाला आरक्षण नसल्यास त्याचा केवळ मलाच नाही तर लाखो मुलांना फटका बसणार आहे.
तर सध्या राज्यसेवेची तयारी करत असलेला अमरावतीचा सुजय सूर्यवंशी म्हणतो,
कोरोनाची आजची परिस्थिती बघता सध्या तरी मराठा समाजानं मोर्चाची भूमिका घेणं योग्य नाही. आपलं म्हणणं सरकार पर्यंत पोहचवण्याचे इतर देखील मार्ग आहेत. यात मग सही मोहीम, सरकारला एकच वेळी पत्र लिहिणं किंवा जसा मागच्या वेळी ट्विटचा अवलंबलेला मार्ग.
मागच्या वेळी ११ ऑक्टोबरची राज्यसेवा परीक्षा रद्द झाल्यानंतर ‘परीक्षा व्हावी’ हे आमचं मागणं होतं. ते सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी आमच्या ग्रुपमधील ५ जणांनी मिळून सलग तीन दिवस रोज १०० ट्विट करून आंदोलन केलं होतं.
तर ११ महिन्यांनंतर देखील अदयाप नियुक्ती न मिळालेला उमेदवार नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला,
न्यायालयानं मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरक्षणाला स्थगिती मिळाली तेव्हा पासून आम्हाला परीक्षा पास होऊन देखील अद्याप नियुक्ती मिळाली नाही, मात्र तरी देखील माझ्यासारखे जवळपास २ हजार उमेदवार संयम बाळगून आहेत. त्याचं कारण एकचं आहे ते म्हणजे कोरोना.
कारण जेव्हा आपल्या घरातील कोणाला तरी कोरोना होतो, किंवा कोरोनमध्ये जवळच्या कोणाचा तरी मृत्यू होतो तेव्हाचं दुःख काय असतं हे शब्दात न सांगता येणार आहे. पुढे जाऊन अशा मोर्चात जर तरुणांना कोरोनानं गाठलं आणि काही कमी जास्त झालं तर ‘ते होणार नुकसान आरक्षण नसलेल्या नुकसानीपेक्षा जास्त असणार आहे हे नक्की.
त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आणि आंदोलकांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये मोर्चांपासून लांब राहण्यातच शहाणपण आहे. कारण बचेंगे तो और भी लढेंगे…!!!
हे हि वाच भिडू.
- मराठा आरक्षण रद्द : निकषांचा गोंधळ नेमका कुठे उडाला ?
- आरक्षण रद्द : MPSC च्या नियुक्ती, निवड व प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या मुलांच काय होणार..
- यांच्यामुळे विदर्भातला मराठा समाज दाखल्यावर कुणबी लिहू लागला आणि त्यांना आरक्षण मिळालं