गर्लफ्रेंडला हॉटेलवर आणून दिल नाही, म्हणून विनोद कांबळी रडला होता

१९९३ सालचा भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा होता. मोहम्मद अझरूद्दीन तेव्हा भारताचा कॅप्टन होता.

टीम मध्ये कपिल देव सारखे सिनियर सुद्धा होते आणि तेंडुलकर कांबळी सारखे विशी-बाविशीतले खेळाडू होते. भारताचे माजी कॅप्टन अजित वाडेकर या टीमचे कोच होते.

अजित वाडेकर मुंबईचे असल्यामुळे त्यांच आणि सचिन विनोद या खेळाडुंच चांगलंच जमायचं. त्यांच्यात वयामध्ये अंतरसुद्धा होते तरी त्यांच्यात दोस्ती पक्की होती. या दोघांना अजित वाडेकर यांना जित्या म्हणून हाक मारण्याची परवानगी होती.

या सिरीजच्या वेळी दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या धोक्यामुळे खूप सुरक्षितता होती. खेळाडूंना कुठेही हॉटेलच्या बाहेर जाऊ दिल जायचं नाही. तरुण असल्यामुळे विनोद कांबळी आणि सचिन खूप खोडकर होते. ते त्यांना भूक लागली की कोचच्या रूम मध्ये जाऊन ऑर्डर करायचे, ज्याचं बील वाडेकराना भरावं लागायचं.

wadekar ie m
Cricketer Ajit Wadekar, Ratnakar Shetty and Vinod Kambli right. SOURCE- Indian Express archive photo

विनोद कांबळी वाडेकरयांचा आवाज एकदम हुबेहूब काढू शकतो. तो सगळ्या टिममेट्स वाडेकर यांच्या आवाजात फोन करून म्हणायचा “रूम पे आके मिलो कुछ काम है.” तिथं गेल्यावर कळायचं की कांबळीने आपला पोपट केला आहे. अशा गंमती जंमती चालू असायच्या. 

पहिली टेस्ट मॅच पावसामुळे पहिल्याच दिवशी रद्द करावी लागली. तेव्हा बराच वेळ शिल्लक राहिला होता. दहशतवादी हल्ल्यामुळे बाहेर जाता येत नसल्यामुळे खेळाडू वैतागले होते. द्वारकानाथ संझगिरी तेव्हा पत्रकार म्हणून दौरा कव्हर करायला श्रीलंकेमध्ये गेले होते.

एकदा ते आणि अजित वाडेकर डिनर करून हॉटेल मध्ये परत आले तेव्हा त्यांना कळाले की विनोद कांबळी आपल्या रूममध्ये रडत बसला आहे. अजित वाडेकरनी त्याला विचारलं की काय झालं? विनोद द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे वळून म्हणाला,

“मला माझी गर्लफ्रेंड इथे हवी आहे. मी तिच्या शिवाय राहू शकत नाही.”

वाडेकरनी कोड ऑफ कंडक्ट प्रमाणे नियम केला होता की कोणीही व्यक्ती खेळाडूंच्या सोबत त्यांच्या रूममध्ये राहणार नाही. विनोदने सांगितले कपिल देवची बायको त्याच्यासोबत राहत आहे. वाडेकर त्यावेळी शांत पणे म्हणाले,

“कपिल देवने १२५ कसोटी खेळल्या आहेत. तू २५ जरी खेळलास तरी तुला मी तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या सोबत राहू देईन.”

विनोद कांबळी त्या सिरीज मध्ये फॉर्मात होता. त्यावेळी त्याने सलग दोन शतक काढले. या सिरीजच्या अगोदर त्याने डबल सेंच्युरी काढून सर्वात कमी वयात हा विक्रम केला होता. त्याचा कसोटी मधला अव्हरेज शंभरच्यावर होता, जो ब्रॅडमन पेक्षा जास्त होता. अशा वेळी विनोद स्वतःला पुढचा विव्हिअन रिचर्ड समजत होता.

पण पुढे त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. खेळाला गंभीरपणे न घेण्याची किंमत त्याला भोगायला लागली. वयाच्या २४ व्या वर्षी विनोद कांबळी शेवटची कसोटी खेळला. अजित वाडेकरनी त्याला २५ कसोटी खेळण्याचे आव्हान दिले होते, विनोद पूर्ण करीयर मध्ये फक्त १७च कसोटी खेळू शकला.

प्रतिभा असून खेळात शिस्त आणि मेहनत याला किंमत दिली नाही तर काय भोगावे लागते याचं उदाहरण म्हणजे विनोद कांबळी.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.