खोटं नाय पण आयपीएल खेळत असता, तर विनोद कांबळी कोटींचा मालक असता…

विनोद कांबळी, भारतीय क्रिकेटचा शापित गंधर्व. राहिलेल्या काही केसांची आणि फ्रेंच दाढीची अतरंगी स्टाईल, समोरच्याचं प्रतिबिंब दिसेल असा चकचकीत गॉगल, खांद्यावर टॅटू आणि कानात बाळी असा त्याचा अवतार अजूनही कित्येक चाहते विसरलेले नाहीत. कांबळीबाबतची आणखी एक गोष्ट चाहते विसरलेले नाहीत, ती म्हणजे १९९६ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये लंकेविरुद्ध कांबळी एकाकी खिंड लढवत होता, नेमका प्रेक्षकांनी कल्ला केला आणि मॅच थांबवण्यात आली. त्यावेळी कांबळीच्या डोळ्यातले अश्रूही यादगार आहेत.

कांबळीचा जिगरी दोस्त म्हणजे सचिन तेंडुलकर. शालेय क्रिकेट खेळताना दोघंही एका पार्टनरशिपमुळे चर्चेत आले. १९८८ मध्ये मुंबईत प्रतिष्ठीत हॅरिस शिल्ड स्पर्धेचा सामना सुरु होता. १४ वर्षांचा तेंडुलकर आणि १६ वर्षांचा कांबळी शारदाश्रम विद्यामंदिरकडून खेळत होते, तर समोर होता सेंट झेव्हियर शाळेचा संघ. दोघांनीही क्रीझवर नांगर ठोकला आणि तब्बल ६६४ रन्सची पार्टनरशिप केली. त्या मॅचमध्ये कांबळीनं नॉटआऊट ३४९ रन्स चोपले होते.

पुढं तेंडुलकरनं कांबळीच्या आधी डेब्यू केला. कांबळी काहीसा मागे पडला, याचं कारण होतं त्याला करावा लागलेला स्ट्रगल. तेंडुलकरच्या पाठीशी त्याचं सगळं कुटुंब होतं, कांबळीला मात्र ही लक्झरी मिळाली नाही. शारदाश्रम शाळेत येण्यासाठी त्याला रोज सकाळी गर्दीच्या वेळी कांजूरमार्ग ते दादर असा प्रवास लोकलमधून करावा लागायचा. आता गर्दीनं खच्च भरलेल्या लोकलमध्ये भलीमोठी किटबॅग घेऊन प्रवास करणं अशक्यच. त्यामुळं तो दुपारीच शाळेतून निघायचा, परत लोकलनी घरी जाऊन, पुन्हा किटबॅग घेऊन प्रॅक्टिसला यायचा. या अशा कसरतीमुळं त्याची निम्मी एनर्जी खर्ची पडायची. त्यामुळे एक दिवस तो वडिलांशी भांडला आणि आपल्या मित्रासोबत वरळीला खोली घेऊन राहू लागला… त्यावेळी त्याचं वय होतं… फक्त १२ वर्ष!

विचार करा, फक्त १२ वर्षांचा पोरगा घरापासून लांब राहतो.. तेही फक्त क्रिकेटसाठी.

पुढं त्यानं तेंडूलकरच्या नंतर का होईना, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडक मारलीच. त्यानं आल्या आल्या दणका उडवून दिला. तेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये टेक्निकला फार महत्त्व होतं. शॉट मारायचा तर तो जमिनीलगतच असा कित्येकांचा शिरस्ता होता. त्यात ज्या मुंबई स्कुल ऑफ क्रिकेटच्या मुशीत सचिन आणि विनोद घडले, तिथं तर टेक्निक म्हणजेच सर्वकाही होतं. पण स्वभावाप्रमाणंच त्याची बॅटिंगही बंडखोर होती.

कांबळीनं आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दोन द्विशतकं आणि तीन शतकं लावत त्यानं सगळ्या जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. त्याच्याकडे लोक सुपरस्टार म्हणून बघू लागले. पण पुढं मात्र त्याचा फॉर्म बेक्कार गंडला. विंडीजविरुद्ध खेळताना त्याला तीन इनिंग्समध्ये खातंही खोलता आलं नाही. ९६ च्या वर्ल्डकपची जखम भळभळतीच राहिली. त्याचं संघात आतबाहेर सुरु होतंच, त्यानं तब्बल ९ वेळा संघात पुनरागमन केलं. २००० सालानंतर मात्र कांबळी संघातुन बाहेरच पडला. त्याला कारणंही तशीच होती. संघात तंत्रानं परफेक्ट असणारे आणि अधिक सातत्य असणारे खेळाडू आले होते. कांबळी हाणायचा खरा, पण त्याची बॅट नेहमीच बोलेल असं नसायचं.

एक मात्र होतं कांबळी प्लेअर म्हणून लई वांड. युवराज-विराटच्या आधीही त्यानं भारतीय संघात स्टाईल आणली. कानात बाळी, अंगावर टॅटू आणि कायतरी वाढीव हेअरस्टाईल असणारा तो पहिलाच प्लेअर होता. खऱ्या अर्थानं ट्रेंडसेटर.

क्रिकेट संपल्यानंतरही स्ट्रगलनं कांबळीची पाठ सोडली नाही. त्याचं पहिलं लग्न मोडलं, त्याचा हृदयविकार वाढला. थोडक्यात काय, तर लोकलच्या गर्दीतला प्रवास, संघातलं आतबाहेर आणि पाठीमागे लागलेलं शुक्लकाष्ठ काय संपलं नाही.

कांबळीच्या वागण्यावर कितीही शंका घेतली, तरी भावाची बॅटिंग इतकी वाढीव होती की, टी20 आणि आयपीएलच्या काळात तो असता, तर भारताकडेही आपला स्वत:चा ख्रिस गेल असता. २००८ मध्ये त्याची आयपीएलसाठी निवडही झाली होती, मात्र दुखापतीमुळे त्याची ती संधीही हुकली.

मोठे फटके खेळण्याची अफाट ताकद, निडर वृत्ती आणि बिनधास्त वृत्ती… कांबळीमध्ये गुणांचं भांडार होतं, पण सातत्य नसलेली बॅटिंग आणि मैदानावरचा दंगा याच गोष्टी हायलाईट होत राहिल्या आणि प्रचंड गुणवत्ता असलेला कांबळी भारतीय क्रिकेटचा शापित गंधर्वच ठरला.

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. SANJAY says

    Kambli the great batsman and proud BHARAT RATNA MR.SACHIN HIS BEST DOST THANKS VINOD

Leave A Reply

Your email address will not be published.