गायकांचा खलनायक ही ओळख तो कधीच मिटवू शकला नाही.

नव्वदच्या दशकातला काळ. थिएटर पब्लिकने खचाखच भरलेलं. पडद्यावर लांब केसाचा संजू बाबा डोक्यावर टोपी घालून येतो आणि गरजतो,

“जी हां मै हु खलनायक “

ड्रगमुळे बदनाम झालेला, बॉम्बस्फोटात नाव आलेला, सध्या जेलची वारी काढत असलेला सज्जन सुनील दत्त यांचा बिघडलेला मुलगा म्हणून संजय दत्तची इमेज खलनायक सिनेमासाठी प्रचंड उपयोगाची ठरली. हा सिनेमा तुफान सुपरहिट झाला पण या यशात नायक नही खलनायक हूं मै या गाण्याचा मोठा वाटा होता. संजू बाबाला चपखल बसेल असा हा आवाज होता.

 तो गायक होता विनोद राठोड. ज्याच्या विशीष्ट आवाजाने बॉलीवूडमध्ये  एका नवीन आवाजाची दखल घेतली गेली होती. विनोद राठोडचा युनिक आवाज हीच त्याची खासियत होती.

नव्वदच दशक हे भारतीय संगीतातलं खूप महत्वाचं दशक होत. या काळात भारताला नवीन नवीन गायक आणि महान संगीतकार लाभले. किशोर कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये फक्त बोटावर मोजता येतील इतकेच गायक होते ज्यांनी किशोर कुमारजींच्या गाण्याच्या पावलावर पाऊल ठेवून गायन क्षेत्रात चांगली प्रतिष्ठा मिळवली. ज्यात प्रामुख्याने कुमार सानू, अभिजित भट्टाचार्य आणि विनोद राठोड ही मंडळी होती.

विनोद राठोडने नव्वदच्या दशकातील सगळ्याच अभिनेत्यांना आपला आवाज दिला पण एकदम अचूक आवाज बसला तो फक्त संजय दत्तसाठी. १९९३ साली आलेला संजय दत्तच्या कारकिर्दीतील सगळ्यात हिट आणि महत्वाचा चित्रपट ‘ खलनायक  ‘ असो किवा २००३मध्ये आलेला ‘ मुन्नाभाई एम बी बी एस ‘ असो किंवा ‘लगे रहो मुन्ना भाई’ . संजय दत्त आणि विनोद राठोड हे इतकं परफेक्ट कॉम्बिनेशन होत की त्या चित्रपटातील गाणी ही हिट व्हायची म्हणजे व्हायचीच.

विनोदचे वडील शास्रीय संगीतातले पंडित होते त्यामुळे घरात साहजिकच सांगीतिक वातावरण होतं. गाण्याप्रतीची त्याची ओढ लहानपणीचं दिसून आली होती. एका मुलाखतीत विनोद राठोड म्हणतो की

लहानपणी मी रडायच्या आधी गाणं गायला सुरवात केली होती.

मोहम्मद रफी आणि किशोर कुमार हे त्याचे आदर्श होते. वडिलांनी जातीने त्याच्या गाण्याच्या शिक्षणात लक्ष घालायला सुरवात केली. नदीम-श्रवण या संगीतकार जोडीतील श्रवणकुमार आणि प्रसिद्ध गझल गायक रूप कुमार राठोड हे विनोद राठोडचे सख्खे भाऊ आहेत.

बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधी विनोदने काही अल्बम बनवले. या अल्बम मधी त्याचा आवाज ऐकून संगीतकार उषा खन्ना यांनी त्याला बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळवून दिला. १९८६मध्ये ‘ बेदाग ‘ या चित्रपटात त्यांनी विनोदला एक कव्वाली गाण्याची संधी दिली.

मेरे दिल में हे अंधेरा, कोई शम्मा तो जला दे….

ही कव्वाली त्याने मोहम्मद अजीज यांच्यासोबत गायली होती. हे गाणं तेव्हा तितकसं गाजलं नाही आणि परत त्याचा संघर्ष सुरु झाला. १९८८साली आलेल्या ‘ विजय ‘ या चित्रपटात तो सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्यासोबत तो गायला. ह्या गाण्याने तो ओळखला जाऊ लागला पण हिट गाणं त्याला मिळत नव्हतं. मग १९८९ साली आलेल्या ‘ चांदणी ‘ चित्रपटात त्याने हिट दोन गाणी गायली आणि इंडस्ट्रीत आपलं स्थान मजबूत केलं.

हा काळ तो होता जेव्हा कुमार सानुची कारकीर्द ऐन जोमात होती तेव्हा त्याच्यासमोर विनोद राठोडने पाऊल टाकले होते.

नव्वदच्या दशकाला दणक्यात सुरवात झाली आणि विनोद राठोडचं नशीब चमकल. दिवाना चित्रपटातील शाहरुख खानवर चित्रित झालेले दोन गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. रूप की राणी चोरो का राजा, डर, गुमराह, श्रीमान आशिक अशा अनेक चित्रपटातील त्याची गाणी हिट ठरली. कुमार सानुने त्यावेळी बॉलीवूड सगळ खिशात घातलं होतं आणि सगळी गाणी तोच गात होता. विनोदचा मोठा भाऊ श्रवण कुमार सुद्धा त्याची सगळी गाणी कुमार सानुकडून गावून घेत होता.

खलनायक चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली..

लक्ष्मीकांत -प्यारेलाल पासून ते अनु मलिक , बप्पी लहिरीपासून ते ए आर रेहमान पर्यंत सगळ्याच संगीतकारांनी त्याच्याकडून एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गावून घेतली. एका बाजूने त्याच्यावर टीकाही झाली की तो शास्रीय गाणी गावू शकत नाही अशा प्रकारच्या गायकीत तो फेल आहे.

तेव्हा साजन चले ससुराल या चित्रपटातील त्याने गायलेल्या में हुं नंबर एक गवैय्या… या गाण्यात त्याची रागदारी दिसून येते.

‘ शक्तिमान ‘ ही मालिका न पाहिलेला माणूस भारतात शोधून सापडणार नाही. शक्तिमान मालीकेच टायटल सॉंग सगळ्यांना अगदी मुखोद्गत होत. विनोद राठोडचा  भरदार आणि उंच पट्टीत जाणारा आवाज त्या मालिकेची रंगत अजूनच वाढवायचा.

संजय दत्तशी जोडलं गेलेलं नातं त्याला फायदेशीर देखील ठरलं आणि संजय दत्तच्या पडत्या काळात तोट्याचं.

हा शिक्का तो कधी मिटवू शकला नाही आणि एकविसाव्या शतकात तो विस्मरणात गेला. गेल्या काही काळात त्याची नवी गाणी ऐकायला मिळत नाहीत. त्याची जुनी गाणी अजूनही रसिक लोकं आवडीने ऐकतात आणि त्याच्या आवाजाची तारीफ करताना दिसतात

आजही त्याला कार्यक्रमात नायक नही खलनायक हूं मैं गायला लावतात. त्याने आजवर वेगवेगळ्या भाषेत साडे तीन हजार गाणी गायली पण इतकी वर्षे झाली गायकांचा खलनायक ही त्याची ओळख अजूनही मिटलेली नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.