तावडे सर, या आठ गोष्टी तुम्हाला झेपत नसतील तर सोडून द्या.

जगातले आदरणीय, माननीय, सन्मानीय इतिहास रचणारे नेते आपल्या फॉलोअर्सना एकतरी नारा देत असतात. म्हणजे आपणाला काहीच देता आलं नाही तर नारा देवून का होईना फॉलोअर्स टिकवता येतो हे आदरणीय नेत्यांना माहित असतं. असा एक नारा आपणा सर्व विद्यार्थावर्गाला तावडे सरांनी दिला आहे.

हा नारा आहे, झेपत नसेल तर सोडून द्या.

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना मित्रप्रेमापोटी पहिली बियर प्यायलो होतो. सुरवातच एवढी वाईट होती की दोन तास डोकं धरून बसलो होतो. तेव्हा जवळचे काळजीवाहू मित्र म्हणाले, झेपत नाही तर पितो कशाला? आज कळकळीने सांगणाऱ्या त्याच मित्राची आठवण झाली. शेवटी तरुणांची काळजी घेणारा एक तरी मंत्री आहे हे बघून डोळे भरून आले.

तावडे साहेबांनी जिथून डिग्री मिळवली ते विद्यापीठ जर गावोगाव काढलं तर सगळेच तरुण झेपत नसलं तरी इंजिनियर होतील. त्यात आहे काय आणि नाही काय? तावडे साहेबांची आम्हाला कमाल वाटते. त्यांनी आधी करून दाखवलं. सहज डिग्री घेऊन दाखवली. मग उपदेश करायला सुरुवात केली.

मागे ते काहीतरी झा T का काय असं पण म्हणाले होते. पण त्यांची भाषा एकदम बहरत चाललीय. शिक्षणाने प्रगती होते म्हणतात. मग शिक्षणमंत्री होण्याने किती प्रगती होत असेल याचं उदाहरण म्हणजे तावडे साहेब. जीं आर हाच त्यांना पीआर चा भाग वाटतो. त्यामुळे ते सतत काही ना काहीतरी जी आर काढत असतात. मागे त्यांनी सरकारी शाळेतल्या शिक्षकांना फुटबॉल सोबत मुलांची सेल्फी काढायची आज्ञा केली होती. आता ज्या शाळेत गोट्या खेळायला जागा नाही त्या शाळेत फुटबॉल कसा खेळायचा असा प्रश्न शिक्षकांना पडला. पण माणसाचं व्हिजन मोठं असलं पाहिजे हे तावडे साहेबांच वैशिष्ट्य. म्हणूनच विद्यार्थ्याने कष्ट करत बसण्यात त्यांना अर्थ वाटत नाही. ते थेट सोडून दे म्हणतात.

हा उपदेश मोदी साहेबांच्या एक्झाम वारियर या पुस्तकात आहे का हे बघावं लागेल. कारण सगळ्यात जास्त वाटप झालेलं पुस्तक म्हणून त्याची नोंद आहे. तावडे खरंतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार. लोक समजत नसले तरी ते स्वतः नक्कीच समजत असणार. अशावेळी शिक्षण खात्यात जीव रमत नसल्याने त्यांची चिडचिड होत असणार. चिडचिड झाली की माणूस भलतं बोलून जातो. पण आपण समजून घेतलं पाहिजे. त्यात जिथे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री बऱ्याच विषयावर अभ्यास चालू आहे असं सांगत असतात तिथे राज्यातला एखादा तरुण अभ्यासात अडचण आहे असं कसं म्हणू शकतो? यामुळेसुद्धा तावडे साहेबांना राग आला असेल.

एकतर ते स्वतः चार चार खाते गेली चार वर्षे सांभाळताहेत. त्यात पोरांनी चार विषय हाताळायला अडचण येते असं म्हणू नये असं त्यांना वाटत असेल. फार प्रगती नसली तरी निदान कुठल्या खात्याची अडचण तर सांगितली नाही तावडे साहेबांनी हे मानलं पाहिजे. मिळेल तेवढे खाते घेतले. नाही म्हणाले नाहीत हा किती मोठेपणा.

एकतर आपल्याकडे शिक्षण आणि खेळ हे खातं एकाच माणसाला का देतात हे कळत नाही.

खेळाच्या शिक्षणाऐवजी खुपदा शिक्षणाचा खेळ होऊन जातो. पण तरी तावडे साहेब डगमगले नाहीत. सोबत सांस्कृतिक खातं पण मोठ्या जोशात सांभाळतात. आजपर्यंत एकही शिक्षणमंत्री झा T असं जाहीरपणे बोलू शकला नव्हता.(इतकचं काय तर आम्ही तो शब्द लिहू देखील शकत नाही) मराठी भाषेचा अस्सल तडका जगाला दाखवला तो तावडे साहेबांनी. आणि आता मुजोर संस्थाचालक पण कधी विद्यार्थ्याशी ज्या dashing पद्धतीने बोलू शकले नाहीत त्या पद्धतीने त्यांनी बोलून दाखवलं. लोक म्हणाले की तावडेंनी त्या मुलाला अटक करायला सांगणे चूक होते. 

तावडे साहेबांची ही तरुणांची काळजी घेण्याची वृत्ती बघून आम्हाला खरंच गलबलून आलं. एक माणूस स्वतःच्या कामाकडे लक्ष न देता पोरांना फुकट सल्ले देत असेल तर आपण पण त्यांना काही सल्ले दिले पाहिजेत. पण आपली गल्लत होण्याची शक्यता आहे. शब्द चुकण्याची शक्यता आहे. म्हणून आपण त्यांच्याच भाषेत सल्ले दिले पाहिजेत. तर त्यांच्याच भाषेत काही उपदेश.

1) तावडे साहेब खूप प्रयत्न करूनही विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न काही तुम्ही सोडवू शकला नाही. जर झेपत नसेल तर सोडून द्या. त्यासाठी विशेष अनुदान द्यायला लावू आम्ही सरकारला.

2) क्रीडा संकुल खाजगी कंपनीला द्यायचा तुमचा विचार आहे. क्रीडा खात्याला क्रीडा संकुल चालवता येत नसेल तर क्रीडा खाते पाहिजे कशाला? झेपत नसेल तर सोडून द्या.

3) राम मंदिराचा प्रश्न कोर्टात सोडवायचा असेल तर दर निवडणुकीत आम्ही मन्दिर बांधून दाखवणार असं तुमच्या पक्षाने सांगायची गरज काय? झेपत नसेल तर निदान जाहीरनाम्यात तसं आश्वासन देणे सोडून द्या.

4) सत्तेत आलो की सिंचन घोटाळ्यातल्या आरोपींना अटक करू अशा वल्गना केल्या. अजून त्याचं काहीच झालं नाही. फक्त चौकशी जमत असेल कारवाई नाही, तर उपयोग काय? झेपत नसेल तर सोडून द्या.

5) मराठी शाळा बंद पडणार असतील तर शिक्षणमंत्री तरी कशाला मराठी पाहिजे? झेपत नसेल तर सोडून द्या.

6) शरीरावर ताबा असायला माणूस संत असावा लागतो. पण तुमच्या सारख्या सांस्कृतिक मंत्रीपद सांभाळणाऱ्या माणसाने निदान जिभेवर ताबा ठेवलं पाहिजे. आजकाल तुमच्या वक्तव्यातून ते जाणवत नाही. झेपत नसेल तर द्या सोडून.

7) क्रीडा खाते सांभाळून चार वर्ष होऊन गेली. खेळाडूंना काय लाभ झाला? शालेय स्तरावर खेळासाठी काय प्रयत्न झाले? सारखे सेल्फी काढून काढून पोरांचं वाटोळ होतं तसं शिक्षण खात्याच पण होऊ शकत बरं. त्याच्यामूळ एकच सेल्फी घ्या. त्यात तुम्ही एकटेच थांबा. आणि सांगा तुम्ही जे बोलले ते बरोबर होतं का? आता हे सुद्धा जमत नसल तर द्या सोडून.

8) शेवटी फक्त एकच सूचना. अजित पवार धरणावर बोलले होते. त्यांनी नंतर यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यापाशी बसून प्रायश्चित्त घेतलं. तुम्ही बसायचं ठरवलं तर कोणत्या नेत्याचा पुतळा आहे? आमच्या तर डोक्यात कुणी येत नाही. तुम्हीच विचार करून बघा. नाही जमलं तर द्या सोडून.

 

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.