आत्ताची चर्चा सोडा कधीकाळी खरंच तावडे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते
राज्याचे माजी शिक्षणमंत्री आणि विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते विनोद तावडे चर्चेत आहेत कशावरून तर भावी मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेवरून.
देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून विनोद तावडे महाराष्ट्राची धुरा सांभाळणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू असतात. त्यावर माध्यमांनी थेट तावडेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्ट केलं कि, या चर्चांमध्ये आजिबात तथ्य नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मला महाराष्ट्रात येण्यास रस नाही. मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल. केंद्राच्या राजकारणात शिकायला खूप मिळतंय. पण राज्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मी नक्की सहकार्य करेन असं ते म्हणाले आणि चर्चेवर फुलस्टॉप लागला.
पण असं असलं तरी कधीकाळी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते हे देखील तितकंच खरंय.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षांतर्गत संघटनात्मक पातळीवरच्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून राजकीय पटलापासून दूर असणाऱ्या तावडेंचं हे पुनर्सवन असल्याचं बोललं गेलं.
पण अधूनमधून ते राज्याच्या राजकारणात येणार, तसेच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा असते मात्र त्यात पॉईंट नाही हे क्लिअर आहे. पक्षाचे सचिव असणाऱ्या तावडेंना सरचिटणीस पदी बढती मिळाल्यानं त्यांचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन निश्चितच वाढलेलं आहे.
पण कधीकाळी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये तावडेंचं नाव कस काय तर, लालबागमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत वाढलेल्या तावडे यांच्या राजकीय कारकिर्दीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात झाली. तावडे यांनी १९९५ मध्ये भारतीय जनता पक्षाचा सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तावडेंनी राजकारणाचे धडे गिरवले. जबरदस्त वक्तृत्व आणि दांडगा जनसंपर्क या दोन गुणांच्या जोरावर त्यांनी राजकारणत मुसंडी मारली.
त्यांनी मुंबई भाजपचा अध्यक्ष, महाराष्ट्र सरचिटणीस अशी वेगवेगळी पदं सांभाळली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांवेळी ते बोरिवली मतदारसंघातून मोठ्या फरकानं आमदार म्हणून निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांच्याकडे शिक्षण व सांस्कृतिकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी, भाजपचा मराठा चेहरा म्हणून ओळखले जाणाऱ्या तावडेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येईल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, सगळ्यांचे अंदाज चुकले आणि मंत्री असणाऱ्या तावडेंना विधानसभेचं तिकीटही मिळालं नाही. फडणवीस आणि तावडे यांच्यात शीतयुद्ध असल्याच्या बातम्याही रंगू लागल्या.
भाजपनं तिकीट नाकारल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तावडेंना आपल्या डेऱ्यात येण्याचं आवताण दिलं, पण तावडे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी भारतीय जनता पक्षात राहणंच पसंत केलं.
विधानपरिषदेची उमेदवारीही नाकारण्यात आल्यानं तावडेंची निष्ठा भंग होण्याच्या शक्यतांना उधाण आलं होतं. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनावरुन वातावरण तापलेलं असताना, तावडेंना भाजप चांगली संधी देईल किंवा त्यांचं पक्षातलं वजन कायम राहील असं अनेकांना वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र उलटंच घडलं.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या गाडीत बसण्यावेळी झालेल्या वादापासून तावडे यांची अपमानांची मालिका थेट विधानसभा आणि विधान परिषदेचं तिकीट नाकारण्यापर्यंत गेली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक संख्याबळ असूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानंतर, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या भाजपच्या अनुभवी नेत्यांची नाराजी सगळ्या महाराष्ट्रानं वेगवेगळ्या कारणांनी पहिली. खडसे यांनी तर थेट पक्षाला रामराम ठोकला.
असो तर आत्ताच्या चर्चेवर भलेही तावडेंनी फुलस्टॉप लावला असेल मात्र राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हे मात्र खरंय.
हे ही वाच भिडू:
- राज्यातले बरेच आमदार बीडच्या या पठ्ठ्याकडूनच कपडे घेतात.
- जेटली, महाजन, मुंडे, फडणवीस, चंद्रकांत पाटील अशा अनेक नेत्यांना या एका व्यक्तीने घडवलंय..
- उत्पल्ल पर्रिकर वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी तयार आहेत पण फडणवीस सिरीयस नाहीत.