विनोद तावडेंना साईडलाईन केलं अशी फक्त चर्चाय.. खरं प्रमोशन तर केंद्रात झालंय
तारिख होती १० मार्च २०२२… बहुमताने युपीमध्ये योगी सरकारचे पुनरागमन झालं होतं. युपीच्या रस्त्यारस्त्यावर भाजपचं सेलिब्रेशन चालू होतं. उत्तरप्रदेश हे सर्वात मोठ्ठ राज्य. या राज्यावर सलग दोनदा सत्ता स्थापन करणं आजवर कोणालाच जमलं नव्हतं. पण योगी आदित्यनाथ यांनी ही गोष्ट साध्य केली. त्यामुळे सेलिब्रेशन पण जोरदार होतं..
दिल्लीत देखील भाजपच्या या विजयाचं सेलिब्रेशन सुरू झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील या लोकांना अभिवादन करण्यासाठी समोर आले. जेव्हा मोदी आणि अमित शहा अभिवादन करत होते तेव्हा या दोन मोठ्या चेहऱ्यांच्या मागे एक चेहरा दिसत होता.
अनेक दिवसांनी थेट मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीमागेच उभा असणाऱ्या त्यांना पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या. त्या व्यक्तीचं नाव विनोद तावडे. कधीकाळी राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसवण्यावरून नकार मिळालेल, त्यामुळेच सोशल मिडीयावर ट्रोल झालेले. २०१९ च्या निवडणूकीत विधानसभेचं तिकीटही न मिळालेल विनोद तावडे…
अंतर्गत राजकारणातून विनोद तावडेंना संपवलं अशा चर्चा महाराष्ट्रात घडत होत्या, आजही घडत असतात.
आजच बातमी आली. विनोद तावडे यांना भाजप मध्ये मोठी जबाबदारी मिळाली. त्यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास कमावला वैगेरे वैगेरे चर्चा सुरु झाली.
त्यामुळेच प्रश्न पडतो विनोद तावडे संपले, त्यांच राजकारण संपल अशा चर्चा होत असताना पडद्यामागे राहून विनोद तावडे बडा गेम खेळत आहेत का? विनोद तावडे सध्या काय करतायतं?
१९८० ते १९९५ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. १९९५ पासून राजकारणात जम बसवला. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे १३ वर्षे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, २०१४ मध्ये मंत्रपदं अशाप्रकारे राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या दोन बड्या नेत्यांच्या सावलीत राहून विनोद तावडे यांनी भाजपमध्ये स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले होते मात्र २०१४ मध्ये त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वकांक्षेमुळे फडणवीसांनी त्यांच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहिले.
फडणवीस सरकार मध्ये तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही महत्वाची खाती होती. त्यांचा मंत्रिमंडळाचा कार्यकाळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
तर २०१९ मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट सुद्धा देण्यात आलं नाही. तावडे दोन वर्ष अडगळीत पडले होते. २०२१ मध्ये भाजपने त्यांचे पुनर्वसन केले.
त्या पुनर्वसनाचे टप्पे पाहिलेत तर विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणात बढतीच मिळत गेली…. त्याचेच हे टप्पे.
१. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पद.
राष्ट्रीय चिटणीस पदावरून विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदावर पदोन्नती झाली.
नोव्हेंबर २०२१ मध्ये भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची घोषणा करत विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीसपदी नेमणूक झाल्याचंही घोषित करण्यात आली ज्याची बरीच चर्चा झालेली. कारण राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावण्यास मदत झाली.
भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री झाल्यानंतर निर्माण झालेली रिक्त जागा भरण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले तावडे यांची सरचिटणीसपदी बढती करण्यात आली.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्त होणारे तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते आहेत.
२. त्रिपुरा आणि हरियाणा राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी.
२०२० पासून भाजपशासित हरयाणा राज्याचे प्रभारीपदाची जबाबदारी विनोद तावडेंवर होती. तसेच २०२३ मध्ये त्रिपुरा च्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्रिपुरातल्या निवडणुकांची कमान तावडेंच्या खांद्यावर आहे, तिथे भाजपाला यश मिळालं तर त्या श्रेयाचे वाटेकरी तावडे देखील असतील.
३. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांचे समन्वयक.
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांसाठी समन्वयक बनवले.
४. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे समन्वयक म्हणून देखील पक्षाने त्यांची नियुक्ती केलेली आहे .
५. मन की बातचे समन्वयक.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचं समन्वयकच नव्हे तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तावडे यांना प्रधानमंत्री कार्यालयातील पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’ या प्रकल्पाच्या समन्वयकपदाची जबाबदारी दिली. तसेच त्यांना विविध केंद्र सरकारच्या योजनांची जबाबदारीही दिली होती.
६. भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपद.
२०२१ च्या अखेरीस भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काही संघटनात्मक नियुक्ता केल्या त्यात तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची ठरली. कारण थोडक्यात ते महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी पाहणार आहेत.
७. राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने ‘राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापन केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा या समितीत समावेश आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, विनोद तावडे यांचा या समितीत समावेश आहे.
तावडे यांच्याकडे समितीचे सहसंयोजकपद सोपवण्यात आले आहे. त्यांची जबाबदारी म्हणजे, राष्ट्रपती निवडणुकीत भाजपशासित राज्यांतील मतांचे योग्य नियोजन करणे. मित्रपक्ष व अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करणे, त्यांची मते भाजपकडे वळवण्याची जबाबदारी तावडे यांच्याकडे दिली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षाकडून महाराष्ट्रातील नेत्याकडे अशा प्रकारची मोठी जबाबदारी पहिल्यांदाच देण्यात आली आहे.
८. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मिशन १४४’ ची जबाबदारी.
देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेत यायचं या उद्देशाने भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या लागलंय. भाजपने मागील निवडणुकीत जिंकू न शकलेल्या १४४ जागांवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. २०१९ मध्ये गमावलेल्या लोकसभा मतदारसंघाचां देखील या १४४ जागांमध्ये समावेश आहे. लोकसभा प्रवास योजना असं यालंनव्ह देण्यात आलेलं आहे.
या मिशनसाठी भाजपने ४ नेत्यांची नेत्यांची एक समिती स्थापन केली त्यात विनोद तावडे यांचाही समावेश आहे. विनोद तावडेंकडे दक्षिण भारतातील राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचा फारसा प्रभाव नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे आव्हानात्मक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.
आणि आत्ता याच यादीत भर पडली ती राष्ट्रीय महामंत्री पदाची.
ही भली मोठी यादी पाहिल्यास लक्षात येतं की, राज्याच्या राजकारणापासून सध्या कोसो दूर असलेले विनोद तावडे यांना भाजपने राष्ट्रीय राजकारणातच ठेवण्यावरच भर दिला आहे.
यावरून राजकारणात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते हे तर लक्षात येतंच शिवाय कोणत्याही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणीही गृहीत धरू शकत नाही हे स्पष्ट होतं.
राष्ट्रीय राजकारणात तावडे यांना दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय करत आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. शिवाय, भाजपमधील एक प्रमुख मराठा चेहरा म्हणून, तावडे यांची केंद्रात वर्णी लागणं हे महाराष्ट्रातल्या राजकारणात जिथे मराठा समाजाचे प्राबल्य आहे अशा राज्यातल्या राजकारणासाठी पक्षासाठी फायदेशीर ठरते.
असो यावरून हे तर स्पष्ट होतंय की, विनोद तावडेंना राज्यातून साईडलाईन केल्याचं कितीही बोललं तरीही त्यांना केंद्रात जबाबदाऱ्या वाढणं हे त्यांचं प्रमोशन आहे.
हे ही वाच भिडू :
- आता सरचिटणीस झालेले तावडे, कधीकाळी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते
- २०१४ ला फडणवीसांच्या पहिल्या मंत्रीमंडळात शपथ घेणारे आज पिक्चरमधून गायब आहेत
- भाजपचे दोन तुकडे होणार होते, राज्यात उभी फुट पडली… तेव्हा बाळासाहेबांनी बंड थोपवलं..