सत्येंद्र जैन यांच्याआधी हे ८ जण जेलमधल्या व्हीआयपी ट्रिटमेंटमुळे चर्चेत आले होते

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असलेल्या सत्येंद्र जैन यांच्यावरून होणारे वाद थांबण्याचं नाव घेत नाहीत. सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे काही व्हिडीओ आज समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये जैन यांची बॉडी मसाज केली जात असल्याचे दिसत आहे. सोबतच रिमोट कंट्रोल, मिनरल वॉटरची बॉटल, रूममध्ये भेटायला आलेले लोक हे सुद्धा दिसत आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी ट्विटरवर जैन यांचा एक व्हिडीओ ट्विट करून आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे. 

ते म्हणाले की, “तर सजेऐवजी जैन यांना पूर्ण व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत होती. ५ महिन्यांपासून जमीन न मिळालेल्या हवालाबाजाच्या डोक्याची मसाज केली जात आहे. आप सरकारच्या तुरुंगात नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय.”

भाजपच्या या आरोपानंतर आपकडून याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलंय. सत्येंद्र जैन हे आजारी आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ते फिजिओथेरपी घेत आहेत असं प्रत्युत्तर मनीष सिसोदिया यांनी दिलंय. 

आता भाजप आणि आपमधील आरोप प्रत्यारोप काहीही असले तरी, सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये मिळणाऱ्या व्हीआयपी सुविधांवरून पूर्वी सुद्धा राळ उडली होती. त्यामुळे ४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या काळात जेलमधील ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. यात जेल अधीक्षक, दोन हेड वॉर्डन तर एका वॉर्डनचा समावेश आहे. सोबतच ४० कर्मचाऱ्यांची बदली सुद्धा करण्यात आली.

व्हायरल व्हिडिओंमुळे जैन यांना मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा होतेय, पण अशाप्रकारे व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे चर्चेत आलेले ते पहिले व्यक्ती नाहीत. 

जैन यांच्यापूर्वी सुद्धा अनेक नेते, उद्योगपती हे जेलमध्ये मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे चर्चेत आले होते. 

१) शशिकला नटराजन

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंगलोरच्या परापन्ना सर्वहारा जेलमध्ये असलेल्या शशिकला नटराजन या सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे चर्चेत आल्या होत्या. जुलै २०१७ मध्ये जेलच्या उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी जेलमध्ये शशिकला यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे असा आरोप केला होता. या कामासाठी शशिकला यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना २ कोटी रुपयांची लाच दिली आहे असं सुद्धा म्हटलं होतं. यानंतर डी. रूपा यांची बदली करण्यात आली होती. 

यात सुविधांमध्ये शशिकला यांची प्रायव्हसी जपण्यासाठी आजूबाजूचे पाच सेल मोकळे ठेवण्यात आले होते. या खाली सेलमध्ये शशिकला इतर लोकांना भेटत होत्या. त्यांच्या सेलमध्ये तिची लावण्यात आला होता. त्यांच्यासाठी स्पेशल किचन चालवण्यात येत होतं असं डी रूपा यांनी सांगितलं होतं. प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते.

२) लालू प्रसाद यादव

सीबीआयने कोर्टाने चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना झारखंडमधील बिरसा मुंडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा व्हीआयपी लोकांसाठी बनवण्यात आलेल्या सेलमध्ये लालू प्रसाद यादव यांना अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. यात टीव्ही सेट पासून वृत्तपत्रे या सुविधा उपलब्ध होत्या. सोबतच येणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र हृदयरोग आणि इतर आजारांमुळे त्यांना जेलमधून एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. लालू प्रसाद यादव हे आजाराच्या नावाखाली जेलऐवजी हॉस्पिटलमध्ये राहत आहेत असे सुद्धा आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

३) अमर सिंग

पैसे देऊन मतदान खरेदी करण्याच्या आरोपाखाली समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग हे दिल्लीच्या तिहार जेलमध्ये होते. तेव्हा किडनी आणि मूत्रपिंडात असलेल्या संक्रमनाचं कारण देऊन त्यांना जेलमध्ये व्हीआयपी सुविधा देण्यात आल्या होत्या. यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

अमर सिंग यांना सामान्य सेलमध्ये ठेवण्याऐवजी वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. यात घरच जेवण, मिनरल वॉटर देण्यात येत होतं तर त्यांच्या वार्डची क्लिनिंग करण्यासाठी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. वॉर्डमध्ये मच्छर आणि किडे येऊ नयेत यासाठी कर्मचारी दिवसातून चार-पाच वेळा वार्डला फिनाईलने स्वछ करत होते. यासोबतच वार्डला लागूनच वेस्टर्न पद्धतीचं शौचालय सुद्धा होतं. 

४) मुख्तार अन्सारी 

उत्तर प्रदेशातील आमदार आणि गुंड मुख्तार अन्सारी सुद्धा पंजाबच्या बांदा जेलमध्ये व्हीआयपी सुविधांमुळे चर्चेत आला होता. पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर जिल्हाधिकारी अनुराग पटेल आणि एसपी अभिमानंदन यांनी बांदा जेलमध्ये छापा मारला होता. तेव्हा जेलमध्ये मुख्तारला व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचं उजेडात आलं होतं. 

मुख्तार आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी जेलमध्ये फळे, चिकन बिर्याणी, हॉटेलचं जेवण, सुके मेवे, मिनरल वॉटर, कुलर आणि एक छोटा फ्रिज अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. जेलचे काही अधिकारी आणि मुख्तारचे सहकारी जेलमध्ये पार्टी करत असल्याचे सुद्धा त्या वेळी समोर आले होते. मुख्तारच्या वस्तू जेलमध्ये आणताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जात होते असं सुद्धा समोर आलं होतं. 

५) बीबी जागीर कौर 

स्वतःच्या मुलीचा गर्भपात केल्याच्या आरोपाखाली, अकाली शिरोमणी दलाच्या नेत्या बीबी जागीर कौर यांना कपूरथला सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा बीबी कौर यांना व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे फोटो समोर आले होते.

जेव्हा बीबीला जेलमध्ये नेण्यात आलं तेव्हा जेलचे अधिकारी त्यांचं दर्शन घेण्यासाठी धावत आले होते, बीबी यांच्या वॉर्डमध्ये ३२ इंचाचा टीव्ही आणि खासगी मोबाईल सुद्धा देण्यात आला होता. या व्हीआयपी सुविधांचे फोटो समोर आले होते तेव्हा बराच राजकीय धुरळा उडला होता.

६) सुब्रतो रॉय 

सहारा इंडियाचे प्रमुख यांना तीन हॉटेल विक्रीच्या प्रकरणात जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना साध्या वॉर्ड ऐवजी स्पेशल वार्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. या वॉर्डमध्ये दीड, दीड टनाचे आठ एसी लावण्यात आले होते. टीव्ही, वायफाई, डिजिटल प्रेस कॉन्फरंस, फ्रिजसारख्या व्हीआयपी सुविधा देण्यात आल्या होत्या. रॉय यांच्या सहकार्यासाठी सुद्धा अशाच सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच सुरक्षेसाठी ४५ अधिकारी आणि कमांडो तैनात करण्यात आले होते.

या सुविधांवर एका दिवसाला ७० हजार रुपयांचा खर्च येत होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देण्यात आलेल्या या सुविधांचा सर्व खर्च रॉय यांनीच दिला होता. यासाठी रॉय यांनी १ कोटी ३० लाख रुपये प्रशासनाकडे अदा केले होते. 

७) अब्दुल करीम तेलगी 

२० हजार कोटींच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात आरोपी असलेल्या अब्दुल करीम तेलगीला सुद्धा बंगलोरच्या पारपन्ना अग्रहारा जेलमध्ये ठेवण्यात आलं होत. तेव्हा त्याला व्हीआयपी सुविधा देण्यात आल्याचा आरोप जेल उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी केला होता. यात तेलगीला टीव्ही पासून मोबाइलपर्यंत वेगवगेळ्या सेवा सुविधा दिल्या जातात तसेच जेलमधले ३ ते ४ कैदी तेलगीच्या शरीराची मालिश करतात असं सुद्धा डी. रूपा यांनी सांगितलं होतं. 

शशिकला आणि तेलगी यांचे प्रकरण एकाच वेळी समोर आल्यामुळे कर्नाटक सरकारवर बरेच आरोप करण्यात आले होते. तर डी. रूपा यांची जेलमधून बंगलोरच्या वाहतूक नियंत्रण प्रमुख म्हणून बदली करण्यात आली होती. 

८) दिलीप 

एका अभिनेत्रीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात मल्याळी अभिनेता दिलीप याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १४ दिवसांच्या या कोठडीत त्याला वेगवगेळ्या प्रकारच्या व्हीआयपी सुविधा देण्यात येत आहेत हे प्रकरण समोर आलं होतं. दिलीपला सामान्य कैद्यांच्या जेवणाऐवजी अधिकाऱ्यांसाठी बनवण्यात येणारं जेवण देण्यात आलं. यासोबतच इतर व्हीआयपी सुविधा सुद्धा त्याला देण्यात आल्याचं समोर आलं होतं. 

आता सत्येंद्र जैन यांच्याबाबत दिल्ली सरकार काय भूमिका घेणार आणि या सगळ्याचे नेमके काय परिणाम होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल.

 हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.