वीर बाजी पासलकरांचं नाव दिलेल्या धरणामध्येच त्यांचा चिरेबंदी वाडा बुडालेला आहे.

तो काळ म्हणजे महाराष्ट्रासाठी अंधकाराचा होता. वेगवेगळ्या पातशाह्या वर्चस्वासाठी एकमेकांशी भांडत होत्या. मोठमोठे वतनदार त्यांच्या चाकरीत अडकले होते.

सर्वसामान्य रयत रोजच्या लढाईमध्ये भरडली जात होती.

अशावेळी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणाऱ्या शिवबाच्या रूपाने पहिल्यांदाच मराठी मनामध्ये स्वातंत्र्याची मशाल पेटली. मांसाहेब जिजाऊंच्या संस्काराची ही मशाल बघता बघता वणवा पेटवणार यात शंका नव्हती.

बारा मावळातले तरुण या स्वातंत्र्ययुद्धासाठी रक्त सांडायला तयार होता. असाच एक जिवाभावाचा सवंगडी शिवरायांना मिळाला होता,

वीर बाजी पासलकर

ते मोस मावळखोर्याचे वतनदार होते. निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजे, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यासाठी पंचक्रोशीतून लोक त्यांच्याकडे येत असत.

शिवरायांच्या स्वराज्ययज्ञाचे ते प्रमुख शिलेदार होते.

त्यांच्या सारख्या मावळ्यांच्या तलवारीच्या बळावर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील एकेक किल्ले स्वराज्यात सामील होऊ लागले.

विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवरायांच्या विरोधातल्या तक्रारी जाऊ लागल्या. पिसाळलेल्या आदिलशाहने हे बंड ठेचून काढण्यासाठी आपला बलाढ्य सरदार फत्तेखानाला धाडलं.

फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला. ते साल १६४८ असावं.

खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. पहिल्यांदाच मराठ्यांना एक पाऊल मागे जावं लागलं होतं. पण हा पराभव महाराजांच्या जिव्हारी लागला होता होता.

कावजी मल्हार सुभानमंगळ भूईकोटावर चालून गेले. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप यांना बेलसरच्या छावणीवर धाडलं.

कावजी मल्हार यांनी एका रात्रीत गड सर केला तर अचानक छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे खानाच्या सैन्याची वाताहत झाली.

हे सगळे मराठे विजेच्या वेगाने आले आणि त्याच वेगात माघारी पुरंदरच्या दिशेने निघून गेले.

अपमानाचा बदला घेण्यासाठी भडकलेल्या फत्तेखानाने सरदार मुसेखानाला पुरंदरावर पाठवलं. खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.

बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. गोदाजी जगतापांनी मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.

वीर बाजी पासलकर व कावजी मल्हार खासनीस यांनी सासवड पर्यंत पाठलाग केला. सासवडमध्ये पुन्हा हातघाईची लढाई जुंपली खानाच्या सैन्याची डोकी उडाली. खान घाबरून विजापूरला पळाला.

मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकरासारखा वाघ या युद्धात जबर जखमी झाला.

त्यांची पालखी पुरंदराच्या पायथ्याशी पोहचली. स्वतः शिवाजी महाराज बाजींच्या भेटीसाठी धावले. महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून बाजी पासलकरांनी प्राण सोडला. त्यादिवशी २४ मे १६४९ ही तारीख होती.

वीर बाजी पासलकरांचे बलिदान वाया गेले नाही. त्यांच्या सांडलेल्या रक्तातून हजारो नवे वीर उभे राहिले.

आजही त्यांचे मराठी मनासाठी आदर्श आहे. वीर बाजी पासलकरांचे स्मारक पुण्यातील सिंहगड येथे उभारण्यात आले आहे.

पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.