व्हायरल काकांच्या “काकूंबद्दल” माहित झालं का ? 

 

सर्वात पहिला प्रश्न म्हणजे, “आपण तो व्हिडीओ पाहिलात का ?”

हा प्रश्न ऐकल्यानंतर तुम्हाला गेम ऑफ थ्रोन्सच्या दिवसांची आठवण येवून मनात एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होईल. तंत्रज्ञानाच्या अफाट जगात तुमच्यापर्यन्त तो व्हिडीओ पोहचला नसेल तर फेसबुकवर पेट्रोल दरवाढीचं समर्थन करुन चुक केल्यासारखं तुमच तोंड होईल. तुम्ही तो व्हिडीओ एखाद्या गुड मॉर्निंगच्या मॅसेजप्रमाणे झटकून द्यावा तसा दिला असेल तर पश्चाताप होईल. 

हे वाचताना पुन्हा तो व्हिडीओ पहावा वाटेल म्हणून सर्वात प्रथम तोच व्हायरल व्हिडीओ. 

 

कसा वाटला ? 

उतार वयाकडं सरकताना कॉलेजचे दिवस आठवले की म्हातारपणी आपण असच जगायचं म्हणून म्हातारपणाच्या दिवसांची स्वप्न पडू लागली. उत्तर काहीही असो गेल्या चार दिवसांपासून या व्हायरल काकांनी पेट्रोलदरवाढीपासून सर्वांची मुक्तता केली आहे. 

जगात कोणतीच दुख नाहीत, या जगात माणूस फक्त जगायला आला आहे आणि त्यानं प्रत्येक क्षण जगला पाहीजे अस सामान्य तत्वज्ञान आपल्या छोट्याशा व्हायरल व्हिडीओतून मांडणारे हे काका आहेत.

साहजिक मिडीयानं या काकांची माहिती काढली आणि तुमच्यापर्यन्त पोहचवली. 

काका विधीशा गावचे सुपुत्र. लहानपणापासून त्यांना डान्सर बनायचं होतं. त्यांच नाव संजीव श्रीवास्तव, ते प्रोफेसर आहेत वगैरे वगैरे. 

पण या सगळ्यात काकूंबद्दल कोणी तुम्हाला सांगितल का ?

हो त्याच काकू ज्या काकांच्या मागे हिरवी साडी घालून नाचत आहेत ? म्हणजे तसा काकूंना डान्स येत नाही. त्या बच्चन सारखं डावा हात उचलून कंबरेच्या वरती नेतात आणि पुन्हा त्या हाताला मोठ्या कष्टानं खाली आणून सोडतात. काकांचे लटके झटके बघून त्या एखादा ठुमका मारतात पण बस्स एखादा ठुमकाचं. मध्येच अभिषेक बच्चनसारख्या टाळ्या वाजवतात. जस काही जितेंद्र बरोबर धर्मेंद्र नाचतोय असा फिल यावा तसं काकू नाचतात. 

काकूंना डान्स येत नसला तरी एक काम मात्र काकूंनी बेस्टच केल आहे ते म्हणजे फुल्ल सपोर्ट. 

जस अमित शहा मोदिंना करतात, जस कॉंग्रेसच्या पराभवाला EVM मशिन्स करतात अगदी तसाच फुल्ल सपोर्ट या गाण्यात काकू काकांना करतात. 

बोले तो एकदम घनघोर इश्क. 

काका सारखं जगावं. काकासारखं म्हातारपण असावं यासारखी सुमधूर वाटणारी फिलॉसॉफी प्रत्येकानेच मांडली असेल पण काकूंची फिलॉसॉफी आपल्या लक्षात का आली नाही. मुळात काकूसारखा फुल्ल सपोर्ट द्यावा. भर लग्नात पाव्हण्यापुढं आपला नवरा मनासारखं जगतोय, खुष राहतोय त्याला बरं वाटतय तर नाचावं.

येत नाही तरी नाचल्यासारखं तरी करावं इतकं सोप्प तत्वज्ञान. फुल्ल सपोर्टवालं फुल्ल पाठिंब्याचं तत्वज्ञान. शिवसेनेसारखं कधीही सोडून जाण्याची भाषा करणार नाही तर जन्मजन्माचं नातं सांगणार विश्वासमत मांडायला देखील न लागणार तत्वज्ञान.

विशेष काही नाही पण काकांकडे बघून जगू वाटणाऱ्यांनी जरा काकूकडे बघून फुल्ल सपोर्टने कस जगायचं हे शिकावं. काकूंच्या फिलॉसॉफीचा देखील फुल्ल पाठिंब्यानं विचार करावा इतकच.

Leave A Reply

Your email address will not be published.