कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार जैनांसाठी विशेष का आहे ?

परभणी असो जर्मनी, जगभरात राजकारण म्हणजे अडाण्यांचे नंदनवन समजले जाते. अगदी जगाच्या महासत्तेचा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने बघून कळतं की अमेरिकेत देखील हेच खरं आहे. आपली भाषणे स्वतः लिहू न शकणारे हे पुढारी लोक देशाचा कारभार चालवतात  ही खरे तर दुर्दैवाचे गोष्ट.

पण काही नेते असे आहेत ज्यांनी हे खोटं ठरवलं. यात प्रमुख नाव येते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली.

वीरप्पा मोईली मुळचे दक्षिण कारवार मधील मुडबिद्रीचे. तिथल्या तुळूभाषिक देवाडिगा समाजात जन्मलेले मोईली यांचं संपूर्ण शिक्षण मंगलोर इथे झालं. तिथेच त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. एक प्रचंड हुशार वकील म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. बेंगलोरचे हाय कोर्ट आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात त्यांचं नाव गाजू लागलं.

यातूनच त्यांनी राजकारणात उडी घेतली. युथ कॉन्ग्रेस मधून त्यांनी केलेल्या कामाची दखल दिल्ली पर्यंत घेतली गेली. अवघ्या  ३४ व्या वर्षी ते कर्नाटकमध्ये कॅबिनेटमंत्री बनले. या तरुण मंत्र्याच कर्तृत्व ओळखून इंदिरा गांधीनी शेती व ग्रामीण क्षेत्रासाठी बँक स्थापनेसाठी जी समिती नेमली होती त्या त त्यांचा समावेश केला. यातूनच नाबार्डची निर्मिती झाली.

एक अभ्यासू नेता म्हणून वीरप्पा मोईली यांना ओळखल गेलं. कर्नाटकात अनेक महत्वाचे मंत्रीपद त्यांनी सांभाळले. जमीन सुधारणा कायद्या पासून शिक्षण क्षेत्राचे धोरण ठरवण्यापार्यंत अनेक बाबतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. 

१९९२ साली त्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. पुढे मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, पर्यावरण मंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार सांभाळला. कॉंग्रेसचे कार्यकाळात सर्वात कर्तबगार मंत्र्यामध्ये त्यांचा समावेश केला जात होता.

अनेक निवडणुका जिंकलेले वीरप्पा मोईली हे  एक कसलेले राजकारणी तर आहेतच पण त्यांची कर्नाटकात ओळख एक उत्तम साहित्यिक अशी सुद्धा आहे. कर्नाटकातील विविध समाज, त्यांच्या देवी देवता हा मोईली यांच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे. आपल्या राजकारणाच्या धामधूमी मध्ये देखील त्यांनी कन्नड भाषेत कित्येक ग्रंथ लिहिले.

यापैकी द एज ऑफ टाईम या कादंबरीमध्ये कोस्टल कर्नाटकात चालणाऱ्या भूतार्दने सारख्या प्रथा, तिथल्या पंबदा या मागास समाजातील प्रथा, अंधश्रद्धा यांचा आढावा घेतला. 

२००१ ते २००४ या चार वर्षात त्यांनी श्री रामायणा महान्वेषणम नावाचे पाच खंडाचे महाकाव्य लिहिले. या पुस्तकाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी अनेक नाटके देखील लिहिली.

गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली सर्वात महत्वपूर्ण साहित्यकृती म्हणजे जैन धर्माचे भगवान बाहूबली यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेलं ‘श्री बाहूबली अहिंसादिग्विजयम’ हे महाकाव्य .

भगवान बाहूबली हे जैनधर्मीयांतील एक ज्वलंत पर्व आहे. अनेकांनी श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबलीच्या मूर्तीच दर्शन घेतलेलं असत. मात्र त्यांचा इतिहास अनेकांना ठावूक नसतो. जैन धर्मातील नवीन पिढ्यांना देखील याची  माहिती नसते. काही वर्षांपूर्वी प्रचंड हिट झालेल्या बाहुबली सिनेमामुळे भगवान बाहुबली हेच होते का असा संभ्रम देखील देशभरातील कित्येकांना पडलेला दिसतो.

अशा वेळी जैन समाजातील नसलेल्या वीरप्पा मोईली यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर महाकाव्य रचल व भगवान बाहुबली यांचा इतिहास जगासमोर आणला हे विशेष समजले जाते. देशभरात अनेक समज गैरसमज पसरलेल्या जैन समाजासाठी ही महत्वाची गोष्ट ठरते.

मात्र हा ग्रंथ लिहिल्यासाठी मोईली यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. प्राचीन जैन साहित्यातील संदर्भ शोधणे, त्याकाळच्या शब्दांचा अर्थ लावणे हे महाकठीण काम होतं. पण वीरप्पा मोईली यांनी हे शिवधनुष्य सहज पेललं.

आज वयाची एक्याऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या वीरप्पा  मोईली यांच्या अखंड मेहनतीचा परिणाम म्हणून हे महाकाव्य साडेतीन वर्षांत पुर्ण झालं.

काल भारत सरकार तर्फे दिला जाणारा साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार वीरप्पामोईली यांच्या ‘श्री बाहूबली अहिंसादिग्विजयम’ या कादंबरीला जाहीर झाला. आजवर आपल्या पीएकडून भाषण लिहून घेणारे नेते खोट्या डिग्र्या व खोटे डॉक्टरेट मिळवणारे मंत्री आपण पाहिले होते मात्र  स्वतः अनेक वर्षे  संशोधन करून प्रचंड परिश्रमातून राजकारणी विरळाच मानला पाहिजे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.