विरार येथील हॉस्पीटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू : कोरोना पेक्षा जिवघेणा हलगर्जीपणा

नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन लिकेजमुळे २२ रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यातल्या विरार इथल्या विजय वल्लभ कोरोना हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत तब्बल १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजची सकाळ उजाडली तिचं मुळात ही दुर्दैवी बातमी घेवून. आग सद्यस्थितीत आटोक्यात आली आहे. शॅार्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

विजय वल्लभ हॉस्पिटलचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार,

रुग्णालयात एकूण ९० रुग्ण होते. त्यापैकी १७ रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. पहाटे ३:१५ वाजल्याच्या सुमारास अतिदक्षता विभागात सेंट्रलाईज एसीमधून शॉर्ट सर्किट झालं आणि इथं ऑक्सिजनचा सप्लाय जास्त असल्यामुळे दोन मिनीटांमध्येच आग सर्वत्र पसरली.

अतिदक्षता विभागातील या १७ रुग्णांपैकी अत्यावस्थ होते अशा १३ रुग्णांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यु झाला. मृतांमध्ये ४ महिला आणि ९ पुरुषांचा समावेश आहे. हॉस्पिटलचा बाहेरील भाग काचेचा असल्यानं रुग्ण आतमध्येच गुदमरले. तर ४ रुग्ण स्वतः चालतं, काच फोडून बाहेर येवू शकले. या रुग्णांना शेजारच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

पालघरचे जिल्हाधिकारी यांनी देखील या माहितीला माध्यमांशी बोलताना दुजोरा दिला आहे. तसेच इतर जे ८० रुग्ण होते ते सुरक्षित आहेत अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.

मृतांची नावं

उमा सुरेश कनगुटकर
निलेश भोईर
पुखराज वल्लभदास वैष्णव
रजनी आर कडू
नरेंद्र शंकर शिंदे
जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
कुमार किशोर दोशी
रमेश टी उपयान
प्रविण शिवलाल गोडा
अमेय राजेश राऊत
रामा अण्णा म्हात्रे
सुवर्णा एस पितळे
सुप्रिया देशमुखे

हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट झाले होते.

डॉ. दिलीप शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयाचे फायर ऑडिट देखील झाले होते. कुठे ही काही ही हलगर्जीपणा होतं नव्हता. ही घटना अचानकच घडली. महिन्याभरापुर्वीच भांडूप इथल्या ड्रिम मॉलमधील कोविड सेंटरला लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कोविड रुग्णालय आणि सेंटरचं फायर ऑडिट करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

हॉस्पिटल बाहेर नातेवाईकांचा आक्रोश :

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १३ रुग्णांच्या नातेवाईकांचा हॉस्पिटलबाहेर अक्षरशः आक्रोश सुरु आहे. तसेच या नातेवाईकांचा आरोपांनुसार या ठिकाणी आग लागली तेव्हा एक ही डॉक्टर आणि नर्स उपस्थित नव्हते. त्यामुळे रुग्णांना वाचवता आलेलं नाही.

मात्र डॉ. दिलीप शहा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले या ठिकाणी डॉक्टर आणि नर्स सगळे उपस्थित होते. पण ऑक्सिजन सप्लाय जास्त असल्यामुळे दोन मिनीटांमध्ये आग सगळीकडे पसरली.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 

मुख्यमंत्र्यांकडून सध्या या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले गेले असले तरी मागच्या काही महिन्यांमध्ये भंडारा जिल्हा सामान्या रुग्णालयातील नवजात शिशू विभागात लागलेली आग, भांडूपच्या कोविड सेंटरमध्ये लागलेली आग, नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळततीमुळे झालेले २२ मृत्यु या सगळ्या घटनांमुळे आता प्रशासानच्या कारभारवर प्रश्न विचारले जावू लागले आहेत.

देवेंद्र फडणवीसांकडून या आगीच्या सखोल चौकशीची मागणी :

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या आगीच्या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

या सगळ्याचा पार्श्वभुमीवर जेष्ठ पत्रकार मिलींद खांडेकर यांच ट्विट महत्वाच वाटतं.

ते म्हणतात, महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं आहे? कोरोनावरच्या उपचारांऐवजी रुग्णांच्या वाट्याला मृत्यु येत आहेत. विरारमधील हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने १३ कोरोना रुग्णांचा मृत्यु, नाशिकमध्ये ऑक्सिजन लीकमुळे २२ कोरोना रुग्णांचा मृत्यु. हॉस्पिटल्समध्ये आग लागण्याचा घटना सातत्यानं होतं आहेत.

 बोलभिडूकडून सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली….

Leave A Reply

Your email address will not be published.