हाताला ७ टाके असलेला विराट कोहली बॅटिंगला आला होता तेव्हा…
मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अशी मॅच झाली. धोनी अण्णाच्या चेन्नईला विजयाचा सूर सापडला, पण विराट कोहलीच्या बॅटिंगचा तडाखा काय अनुभवायला मिळाला नाही. कोहलीनं शेवटचं शतक मारुन जवळपास दीड वर्ष उलटून गेलं, त्याचा फॉर्म गंडलाय असं म्हणावं तर गडी ४०-५० रन्स तर किरकोळीत करतोच. मोठा धमाका तेवढा होत नाय.
मंगळवारच्या मॅचनंतर कोहली चेन्नईचा ओपनर ऋतुराज गायकवाडशी गप्पा मारत होता. सध्या ऋतुराजचा पण फॉर्म गंडलाय, त्यामुळं कोहली त्याला सल्ला देत असावा.
या सल्ला-मसलतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हातात मोबाईल असलेले फॅन्स कोहलीची मापं काढू लागले, की हाय काय सांगणार? याला म्हणावं आधी स्वतः रन्स कर. असं लय काय काय.
आता ॲजे क्रिकेट फॅन म्हणून आम्हाला इतिहास लय पटकन आठवतो. आम्ही थेट सहा वर्ष मागं गेलो आणि एका कोहली स्पेशल इनिंगचा नजराणा तुमच्यासाठी शोधून काढला.
तर तारीख होती, १८ मे २०१६. त्या वर्षीच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे दोघंही वेगळ्याच फॉर्ममध्ये होते. पण सनाट सुटलेल्या त्यांच्या गाडीला अध्येमध्ये ब्रेक लागले आणि प्लेऑफ्समध्ये जाण्यासाठी आरसीबीपुढं करो या मरो स्थिती उभी राहिली.
त्यांच्याच होम ग्राऊंडवर म्हणजेच चिन्नास्वामीवर त्याची किंग्स इलेव्हन पंजाबसोबत मॅच होती. जिंकणं गरजेचं होतं, पण खेळाडू मैदानावर येण्याआधीच पावसानं हजेरी लावली. त्यामुळं सगळ्यांना वाटलं मॅच बाद होणार आणि आरसीबीच्या प्लेऑफ्समध्ये जाण्याच्या आशाही.
पण कधीकाळी आरसीबीनं पावसाचीही मनं जिंकली असणार, कारण त्याला दया आली आणि पाऊस थांबला. मॅच रेफ्रीनं जाहीर केलं की मॅच फक्त १५ ओव्हर्सची होणार. त्यामुळं सिच्यूएशन अजूनच टाईट होती.
हे कमी की काय म्हणत आरसीबीचा तेव्हाचा कर्णधार विराट कोहली या मॅचमध्ये खेळणार की नाही, यावरही शंका होती.
कारण कोलकात्या विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली होती आणि ७ टाकेही पडले होते.
टॉसच्या वेळी कोहली मैदानावर आला आणि आरसीबीवाल्यांचं मोठं टेन्शन गेलं. टॉस उडाला आणि (नेहमीप्रमाणं) कोहली हरला. पंजाबनं घेतली बॉलिंग. त्या सिझनमध्ये कोहली ओपनिंग करत होता, पण हाताचा एवढा बाजार उठलाय म्हणल्यावर कोहली खाली येईल असा अंदाज होता.
इथं पण कोहलीनं धक्का दिला, ख्रिस गेलसोबत तो स्वतः ओपनिंगला आला. स्ट्राईक मिळाल्यावर पहिल्याच बॉलला त्यानं फोर हाणली. त्यानंतर मात्र गाडी अडखळली १४ बॉलमध्ये भावाला १८ रन्सच करता आले. मनातून असं वाटत होतं, की बाबा नव्हता हात बरा तर निवांत बॅटिंगला यायचं. घाई कशाला करायची?
क्रीझच्या दुसऱ्या बाजूला ख्रिस गेल होता. तो बाबाजी आपल्या धुंदीत पंजाबची बॉलिंग फोडून काढत होता आणि तेवढ्यात कोहलीचं रक्त उसळलं. त्यानं अक्षर पटेलला दोन चव्वे हाणले, करिअप्पाला एक फोर मारली… पण करिअप्पाच्या हाय वेस्ट नोबॉलवर कोहलीनं छकडा मारला आणि पुढच्याच बॉलवर असा काही सिक्स टाकला की सगळ्यांना समजून गेलं आजचा विषय वेगळाय.
काईल अबॉटला मारलेल्या बाऊंड्रीवेळी कोहलीच्या बॅटचा स्पीड १३३ किलोमीटर प्रतितास होता. जिथं ख्रिस गेल सुटला होता, तिथं कोहलीनं त्याच्या आधी पन्नास पूर्ण केली. मग या दोघांमध्ये चढाओढ लागलेली की कोण जास्त हाणतंय.
कोहलीची मेन क्षमता त्याचं टायमिंग आहे, पण त्यादिवशी हात जखमी असूनही गडी ताकदीनं शॉट मारत होता. हाणामारी करायच्या नादात गेल आऊट झाला, भरवशाच्या एबीडीला शून्यावर माघारी फिरावं लागलं, पण कोहली मात्र क्रीझवरच होता.
घामानं अंगाला घट्ट चिकटलेला टीशर्ट, डोळ्यात आणि मनगटात आग आणि मनात जिद्द… हे कोहलीचं रुप काय आवरणारं नव्हतं.
त्यानं मिस्ट्री बॉलर केसी करीअप्पाला हाणला, अनुभवी संदीप शर्माला हाणला. मोहित शर्माला सलग तीन चव्वे इतक्या सहज मारले की एकदम मख्खन वाला फील. कोहली आता नर्व्हस नाईंटीजमध्ये होता, समोर बॉलर संदीप शर्मा. सलग दोन बॉल्स, दोन सिंगल. कोहली ९९ वर.
संदीप शर्मानं कोहलीच्या पॅड्सवर बॉल टाकला आणि पद्धतशीर मनगटं वापरत कोहलीनं बाउंड्री मारली, ४७ बॉलमध्ये १०३. टाळ्या वाजवण्यापलीकडं काय करावं हेच लोकांना सुचत नव्हतं.
कोहलीनं हेल्मेट काढलं, बॅटसोबत खाली ठेवलं आणि आपल्या डगआऊटकडे बघून हातावरच्या टाक्यांकडे खूण केली.
याच्या पुढचा बॉल सिक्स होता आणि त्याच्या पुढचा फोर. एवढं मारुन भूक भागली नाही म्हणून कोहलीनं ओव्हरचा शेवटचा बॉलही उचलला आणि आऊट झाला. पण जाता जाता ५० बॉलमध्ये ११३ रन्स केले होते, सोबत १२ फोर आणि ८ सिक्स. डकवर्थ लुईस नियम लागूनही आरसीबीनं ती मॅच जिंकली.
१५ ओव्हरची मॅच, त्यात काहीही करुन जिंकायचं प्रेशर, गेल, वॉटसन, एबीडी, केएल राहुल असा तगडा बॅकअप… कोहलीपुढं दोन पर्याय होते,
एकतर मैदानात येऊन स्वतः जबाबदारी घ्यायची किंवा आपल्या हाताला जपत निवांत खेळायचं. कोहलीनं ‘कोहलीसारखंच’ खेळत पहिला पर्याय निवडला. तो पंजाबच्या बॉलर्सवर तुटून पडला आणि थांबलाच नाही.
कोहलीचा फॉर्म आज तळ्यात-मळ्यात आहे, कदाचित तो उद्या पुन्हा फॉर्मात येईल किंवा नाही. आयपीएलमध्ये नवनवे विक्रम करेल किंवा कदाचित करणारही नाही. पण हाताला टाके असलेल्या कोहलीनं १८ मे २०१६ ला जे केलं होतं ते कोणताच क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही.
एका मुलाखतीत कोहली म्हणाला होता, “माझ्या करिअरमध्ये त्या इनिंगवेळी जशी मजा आली, तशी कधीच आली नव्हती.”
जिंदगीत कधी मोठा प्रॉब्लेम समोर आला तर कोहलीची ही इनिंग बघा… बाकी सगळं किरकोळ वाटेल.
हे ही वाच भिडू:
- टॅटू आणि केसांचा बॅटिंगशी संबंध नसतो, हे सिद्ध करणारा पहिला भिडू म्हणजे विराट कोहली
- आपल्याला ‘Deja-vu’ मोमेंट देणाऱ्या राहुल तेवातियाचं आयुष्य एका रात्रीत बदललं होतं…
- ज्याला शेन वॉर्न तोफ म्हणायचा, त्या स्वप्नील असनोडकरचं पुढं काय झालं..?