पोराला खेळवायचं असेल तर लाच द्या, तेव्हा बाप म्हणाला पोरगं घरी बसेल पण..

दिल्लीमध्ये राहणारी एक टिपिकल पंजाबी फॅमिली. वडील प्रेम कोहली स्कूटरवरून डुगडुग करत सकाळी कोर्टात नोकरीला जायचे, आई सरोज हाऊसवाइफ. त्यांना एकूण तीन मुले. मोठा विकास, दोन नंबरची आरती आणि सगळ्यात धाकटा चिकू उर्फ विराट.

सगळेजण खेळतात त्याप्रमाणे कोह्लींची मुले सुद्धा क्रिकेट खेळायची. धाकटा चिकू तर तीन वर्षाचा होता तेव्हा पासून बॅट फिरवायचा.

जसाजसा मोठा होईल तसा तसा त्याचा खेळ त्या उत्तमनगरमधल्या तंग गल्ल्यांमध्ये मावेनासा झाला. मग काय एक दिवस एका शेजाऱ्याने प्रेम कोहलीना बोलावल आणि त्या सांगितलं,

“दररोज हा गल्लीतल्या खिडक्या फोडणार त्यापेक्षा त्याला कुठल्या तरी क्रिकेट क्लबमध्ये पाठवा. पुढ जाऊन तुमच नाव मोठ करेल.”

प्रेम कोहलीनी ते ऐकल. आपल्या दोन्ही पोरांना नव्याने सुरु झालेल्या वेस्ट दिल्ली क्रिकेट अॅकडमीमध्ये दाखल केलं. दिल्लीच्या रणजी टीममध्ये खेळलेले राजकुमार शर्मा ही अकादमी चालवायचे. एकदा नऊ वर्षाच्या धाकटया कोहलीने बाउन्ड्री लाईनवरून थ्रो मारला ते थेट कीपरच्या हातात. हे बघितल्यावर राजकुमार शर्माना लक्षात आलं पोराच्या हातात दम आहे. त्यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरवात केली.

तो दिवस दिवसभर बॅटिंग करायचा. आपल्या वयाच्या मुलांसोबत खेळून तो लगेच कंटाळायचा. त्याच म्हणण होतं की ते मला आउट करू शकत नाहीत मला मोठ्या मुलांच्या सोबत खेळू द्या. खरी गोष्ट अशी होती की मोठी मुलेसुद्धा त्याला आउट करू शकत नव्हती.

खोडकर होता. बऱ्याचदा कोचकडून मारही खायचा पण त्याला त्याच्या खोड्या कमी व्हायच्या नाहीत. त्याच्या खोड्या, त्याचे गोल फुगलेले गाल, त्याचे मोठे कान बघून कोणी तरी त्याच नाव चिकू द रॅबीट पाडलं ते आजही लोक त्याला त्याच नावावरून ओळखतात.

चिकू कोहलीच दिल्लीच्या क्रिकेट वर्तुळात नाव होऊ लागल.

शाळास्तरावर तो खोऱ्याने धावा करत होता. तो क्रिकेटमध्येच करीयर करणार हे तो पर्यंत सिद्ध झालं होतं. एकदा मात्र एक विचित्र स्थिती आली. दिल्लीच्या अंडर फिफ्टीन टीमच सिलेक्शन सुरु होतं.

कोणी तरी बातमी आणली की विराटची त्या टीममध्ये निवड होऊ शकते फक्त एका निवडसमिती सदस्याला काही पैसे द्यावे लागतील.

त्यादिवशी संध्याकाळी विराटचे कोच त्याच्या वडिलाना भेटायला त्याच्या घरी आले. त्यांनी सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. तसं बघितल तर विराटचे वडील तेवढी रक्कम नक्कीच उभी करू शकत होते. विराटमध्ये टॅलेंट होतं, त्याच्या साठी ही संधी खूप महत्वाची होती. अनेक दारे त्याच्यासाठी उघडली जाणार होती. प्रेम कोहलीनी सांगितलं,

“कोई चान्सही नही. मै एक भी गलत काम नही करुंगा. अगर अपने दम पे खेल सकता है तो खेल जाएगा. नही तो नही. “

त्यांच्या भावांनी वगैरे समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण विराटचे वडील आपल्या मुद्द्यावर ठाम होते. जर त्याला आत्ताच शोर्टकटची सवय लागली तर पुढे जाऊन तो टिकणारही नाही. न कळत्या वयात विराटला खूप मोठा धडा शिकायला मिळाला.

त्याने मैदानात खूप मेहनत केली. त्याच्या कामगिरीमुळे दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीला पैसे न घेता त्याची निवड करावी लागली. पुढे तो त्या टीमचा कप्तानही झाला. पुढे विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याने प्रचंड धावा केल्या. त्याची भारताच्या अंडर19 टीममध्ये निवड झाली, दिल्लीच्या रणजी टीममध्ये निवड झाली.

विराट क्रिकेट मध्ये प्रगतीच्या एक एक पायऱ्या चढत चालला होता. त्याच्या या प्रत्येक पायरीवर त्याचे वडील एखाद्या डोंगराप्रमाणे त्याच्या पाठीशी ठामपणे उभे होते.

डिसेंबर २००६. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात कर्नाटकविरुद्ध सामना सुरु होता. त्यांनी पहिला बॅटिंग करताना ४४६ धावांचं आव्हान दिल्लीपुढे ठेवलं. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तोपर्यंत दिल्लीचे पाच गडी आउट झाले होते आणि धावा फक्त १०५ झाल्या होत्या. कर्नाटकच्या तगड्या बॉलिंग पुढे फक्त विराट टिकून राहिला होता.

पण त्याच रात्री विराटवर आभाळ कोसळलं. त्याच्या वडिलांचं रात्री दोन अडीच वाजता हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. विराटच्या घरच्यासाठी ती काळरात्र होती.  

सगळ्यांना वाटलं विराट मोडून पडेल. पण तो तिसऱ्या दिवशी आपली राहिलेली बॅटिंग पूर्ण करण्यासाठी मैदानात आला. वडील वारलेले असताना तो दिल्लीची मॅच वाचवण्यासाठी येईल अस कोणालाही वाटल नव्हत. सगळेजण थक्क झाले. त्याच्या आईची, बहीण भावाची इच्छा होती की त्याने जाव आणि खेळावं.

त्याला बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. पण अवघ्या सतरा अठरा वर्षाचा हा छोटा मुलगा आपल्या संघासाठी खेळत होता.

त्यादिवशी विराटने ९० धावा केल्या. तो आउट झाला. आउट झाला म्हणजे काय अम्पायरने आउट नसताना त्याला आउट दिला आणि मैदानातून बाहेर काढल. ड्रेसिंग रूममध्ये परत आल्यावर विराटच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. इतका वेळ तो रडला नव्हता. त्याच्या कोचला तो एवढेच म्हणाला,

“आपली टीम मॅच जिंके पर्यंत मी खेळू शकलो नाही.”

संध्याकाळी सगळे पाहुणे, मित्र विराटच्या येण्याची वाट बघत होते. तो आल्यावर वडिलांचे अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विराट आपल्या भावाला म्हणाला,

“मी तुला वचन देतो एक दिवस आपल्या देशासाठी खेळणार आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार.”

आजही विराट तो दिवस विसरू शकत नाही. वडलांच्या मृत्यूने त्याच आयुष्य बदलून टाकलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.