टॅटू आणि केसांचा बॅटिंगशी संबंध नसतो, हे सिद्ध करणारा पहिला भिडू म्हणजे विराट कोहली
सगळ्या बाजूनं उभे असलेले केस, फुगलेल्या गालांवरची दाढी, डोळ्यांवर झगझगीत गॉगल आणि अंगावर टॅटू. दिसायला टिपिकल पंजाबी पोरासारखा गबरू आणि तोंडात दिल्लीकरांची शिवराळ भाषा. विराट कोहलीचं हे रूप प्रत्येकाच्या मनात ठसलं होतं. त्यात बॅट चालली नाही, की हमखास त्याची ही बॅड बॉय इमेज सगळ्यांच्या चर्चेचा विषय व्हायची.
खरं सांगायचं तर होतंही तसंच. देशाला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून दिल्यावर कोहलीचे हात आभाळाला टेकले होते. त्यात आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पार्ट्या सुरू झाल्या, झोपेचं गणित पार बिघडून गेलं. बॅटला तर रन्सची भाषा माहितीच नव्हती. त्यामुळं, सगळ्या जगानं शिक्का मारला ‘हे पोरगं शायनिंग मारण्यातच जाणार, फिक्स.’
पण कसं असतं, बाहेर काय दिसतं यावरून कुणाचाच अंदाज लागत नाही. माणूस घडतो तो आत असलेल्या आगीमुळं.
कोहलीमध्ये ही आग कुठून आली? तो १८ वर्षांचा होता, फक्त १८ वर्षांचा. तारीख १९ डिसेंबर २००६, कोहलीची चौथीच रणजी मॅच. दिल्ली विरुद्ध कर्नाटक. त्यादिवशी मॅचमध्ये नॉटआऊट ४० रन्स करून कोहली घरी आला. त्याच रात्री त्याचे वडील वारले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंतिम संस्काराला जायचं की मॅचला, असे दोन पर्याय कोहलीसमोर होते. कोहली मॅचला गेला.
आणखी ५० रन्स करून आऊट झाला. ९० रन्सवर असताना चुकीचं आऊट दिलं म्हणून कोचला फोन करून रडला. दिल्लीचा फॉलोऑन टळला आणि मग विराट घरी आला. त्यानंतर त्यानं वडिलांचे अंत्यसंस्कार केले. यामागचं त्याचं लॉजिक सेम होतं, मॅच सोडून देणं वडिलांना आवडलं नसतं. ही आग कुठून आली याचं उत्तर, वडिलांचं पार्थिव घरात असतानाही क्रीझवर उभं राहून खेळलेल्या त्या इनिंगमध्ये आहे.
अंडर-१९ वर्ल्डकप, इंडिया डेब्यू आणि मग आयपीएल, दिवस झपाट्यानं बदलत गेले. वजन, इनकम आणि वाईट सवयी वाढत राहिल्या. आधीच गोलमटोल असणारा हा गबरू पिचवर चांगलाच अपयशी ठरू लागला.
लोकांना बॅटिंगमधल्या उणीवा दिसत नव्हत्या, त्यांना दिसत होते टॅटू, हेअरस्टाईल आणि जीवनशैली.
त्यानंतर मात्र विराट पेटून उठला. एखादा खेळाडू फिटनेस ही गोष्ट किती मनावर घेऊ शकतो याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे विराट कोहली. याच फिटनेसचे रिझल्ट्स मैदानावर दिसू लागले. विशेषतः लंकेला मारलेल्या नॉटआऊट १३३ रनांमध्ये.
२०१४ चा ऑस्ट्रेलिया दौरा. विराट पहिल्यांदा टेस्ट टीमचं नेतृत्व करत होता. मिशेल जॉन्सनचं नुसतं नाव वाचलं, तरी डोळ्यांसमोर भेदक बाऊन्सर्स येतात. विराट क्रीझवर आला आणि जॉन्सनचा पहिलाच बॉल दाणकन डोक्यावर येऊन आदळला. सगळ्या ग्राऊंडवर टेन्शन पसरलं आणि विराटच्या मनात आग. पुढच्या बॉलवर काय झालं? विराटनं बाऊंड्री मारली.
असे एक नाय अनेक किस्से आहेत. समोरच्या टीममधला बॉलर म्हणा, फिल्डर म्हणा किंवा वेळ पडली तर कॅप्टन म्हणा, कुणीही अंगावर आलं तर विराट त्याला शिंगावर घ्यायला पुढंमागं बघत नाय. आता लोकं त्याला यामुळं उद्धट म्हणत असली, तरी ऑस्टेलिया, इंग्लंडच्या पुंग्या टाईट करायला हाच ॲटीट्युड पाहिजे भिडू.
त्याच्या कॅप्टन्सीमधली टीम इंडिया प्रत्येकाला जशास तसं उत्तर द्यायला तयार असते. फिटनेस हा तर टीममध्ये स्थान मिळवण्याचा सगळ्यात मेन विषय झालाय. फिटनेसचं उदाहरण तर स्वतः विराटनंच घालून दिलंय. दिल्लीत वाढलेलं पंजाबी पोरगं, पाच वर्ष बटर चिकन खात नाय म्हणजे काय सोपा विषय आहे का?
सुरुवातीला फक्त बॉटम हँडच्या जीवावर खेळणाऱ्या कोहलीकडे आज प्रत्येक शॉट आहे. सचिन, रिचर्ड्स, लारा या सगळ्यांशी त्याची तुलना करून झालिये. रेकॉर्ड्सच्या राशींवर कोहली ठामपणे उभाय. एक सल मात्र अजूनही आहे, ती म्हणजे विजेतेपदाची.
सचिन बॅटिंग करत असला की लोडाला टेकून निवांत बघत राहायचं… आहाहा काय ती नजाकत. सेहवाग म्हणलं की खुर्चीच्या कडेला, कारण एकतर मारणार-नायतर जाणार. उगं निवांतपणा नाहीच. द्रविडसाहेब बॅटिंगला आल्यावर आंघोळीचं पाणी ठेवून, अंघोळ करून आलो तरी गडी तिथंच असणार याची गॅरन्टी असायची.
पण विराट कोहली क्रीझवर आला की आपल्यात पण एक एनर्जी येते. समोर जगातला कुठला पण बादशहा बॉलर असो, कोहली एकदा का झोनमध्ये आला की प्रत्येक शॉट बघण्यासारखा.
विजेतेपद जिंको किंवा न जिंको, सचिननंतर भारताचीच बॅटिंग बाप हे सगळ्या जगाला ओरडून कुणी सांगितलं असंल, तर तो विराट कोहली!
टॅटू, हेअरस्टाईल हे तुम्ही कसे दिसता हे ठरवतं. तुम्ही कसे घडता हे तुमच्या मनातली आग ठरवते. आता हेअरस्टाईल साधी झालीये, टॅटू वाढले नाहीत, मैदानावर बेन स्टोक्सची आठवण काढणं सुरूच असतं. फॅन्स टीका करतील आणि प्रेमही. जितकी शक्यता शिखरावर पोहोचलेला विराट खाली आपटण्याची आहे, त्याहून जास्त शक्यता तो नवं शिखर पार करण्याची आहे.
त्याला किंग कोहली उगाचच म्हणत नाहीत भिडू.
हे ही वाच भिडू:
- विराट कोहलीचे फॅन आहात का? मग जाणून घ्या त्याच्या भन्नाट गोष्टी.
- विराटचे इतर रेकॉर्ड एखादेवेळेस मोडले जातील पण हा रेकॉर्ड कोण मोडू शकणार नाही.
- कोहली आणि ज्यो रूट यांच्याकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या हौतात्म्यास सलाम !!!