सेहवागने पहिल्यांदा ओपनिंग करण्यापूर्वी दादाकडून लिहून घेतलं होतं कि….

वीरेंद्र सेहवाग सारखा फलंदाज म्हणजे एकेकाळी कहर होता. भल्या भल्या बॉलर्सला तो घाम फोडायचा. बॉलरला विकेट काढण्याचं मतलब नसायचं पण आपल्या बॉलिंगच्या वेळी सिक्स मारू नये असं वाटायचं. बॉलर्सवर केलेला अत्याचार म्हणजे ठळकपणे नाव समोर येतं ते म्हणजे आदरणीय उमर गुल. २०११ च्या वर्ल्डकप वेळी वीरेंद्र सेहवागने उमर गुलची अक्षरशः पिसं काढून त्याची बत्ती गुल केली होती. प्रत्येक बॉलला तो सीमेपार धाडायचा.

इतकंच नाही तर बॅटिंग करताना निवांत गाणी म्हणत म्हणत षटकार, चौकार मारायचा. प्रत्येक बॉलरने वीरेंद्र सेहवागच्या धास्ती घेतलेली असायची. कुठल्याही बॉलरला दयामाया न दाखवता तो बॅटिंग फक्त एन्जॉय करण्यासाठी करायचा आणि दणादण सिक्स, फोर टोलवायचा.

ओपनर म्हणून बॅटिंग करताना इतर फलंदाज पहिला बॉल सोडून द्यायचे पण सेहवाग त्यावर खणखणीत चौकार खेचायचा.

वीरेंद्र सेहवागने आपली संघातली जागा जाऊ नये म्हणून कॅप्टन सौरव गांगुलीकडून लिहून घेतलं होतं त्याबद्दलचा हा किस्सा……

ज्यावेळी वीरेंद्र सेहवागचं भारतीय संघात पदार्पण झालं त्यावेळी कर्णधार सौरव गांगुली अर्थात दादा होता. सुरवातीच्या काळात वीरेंद्र सेहवागला फॉर्म गवसत नव्हता आणि पंधरा सोळा मॅचेस मध्ये अगदीच बोटावर मोजण्याइतके रन त्याने केले होते, तरीही सौरव गांगुलीने त्याला संघात ठेवलेलं होतं आणि बऱ्याच संधी त्याने सेहवागला दिल्या. सेहवाग हा आधी मधल्या फळीत बॅटिंग करायचा पण सौरव गांगुलीच्या आग्रहाखातीर तो पुढे भारताचा स्फोटक फलंदाज बनला. सेहवागची ओपनर बॅट्समन बनण्याची हि गोष्ट-

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ गेला होता त्यावेळी भारताने जवळपास होते ते सगळे फलंदाज सलामवीर म्हणून वापरून पाहिले त्यात युवराज सिंग, हेमांग बदानी , अमेय खुरसिया यामधल्या कुणीही चांगला खेळ केला नाही.

त्यावेळी भारताचा जलदगती गोलंदाज असलेला झहीर खान सौरव गांगुलीला म्हणाला आपण वीरेंद्र सेहवागला ओपनर बॅट्समन म्हणून पाठवूया. सौरव गांगुलीही चांगल्या ओपनरच्या शोधात होता त्यानेही झहीरला होकार कळवला.

तेव्हा सेहवागला झहीरने सांगितलं कि इथून पुढे तुला ओपनिंग करायची आहे.

यावर सेहवागने त्याला प्रचंड शिव्या घातल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये सेहवागने बऱ्याच वेळा सलामवीर म्हणून बॅटिंग केली. इंग्लंड दौऱ्याच्या वेळी भारतीय संघात सेहवाग मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून खेळत होता, मात्र इथे स्वतः गांगुली त्याला म्हणाला कि,

टेस्ट मॅचमध्ये मिडल ऑर्डर मध्ये तुला बॅटिंग करता येणार नाही, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि स्वतः मी आहे त्यामुळे बाहेर बसावं लागेल त्यापेक्षा तू ओपनर म्हणूनच जा.

पण सेहवाग गांगुलीला म्हणाला कि,

दादा तुम्ही मिडल ऑर्डरला खेळता त्याऐवजी ओपनर म्हणून जा मी तुमच्या जागी खेळतो.

यावर गांगुली म्हणाला , इथला कॅप्टन मी आहे , मला जिथं वाटेल तिथं मी खेळेल. सचिनला विचारून बघ जमलं तर.

सेहवागने सचिनला न विचारता थेट लक्ष्मणला विचारलं तर लक्ष्मण त्याला म्हणाला, कधीच ओपनर बॅट्समन म्हणून खेळू नको , करियर बरबाद होईल, परत चान्स मिळणार नाही.. यावर सेहवाग विचारात पडला आणि तो परत सौरव गांगुलीकडे गेला.

दादा, जर मी ओपनर बॅट्समन म्हणून फेल झालो तर परत मला मिडल ऑर्डरमध्ये खेळू द्याल का ? गांगुली म्हणाला हो.

पण सेहवागला संघातली जागा जायची भीती होती म्हणून तो म्हणाला कागदावर लिहून द्या कि तुम्ही मला दगा देणार नाही आणि मिडल ऑर्डरमध्ये परत जागा द्याल…

तशी वेळ काय आली नाही, सेहवागने नंतर वळून पाहिलंच नाही. वनडे सोडा कसोटीतही त्यांनी ओपनर बॅट्समन म्हणून त्याने तुफान रन केले आणि बराच काळ भारताला सलामवीर फलंदाज मिळवण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली. सेहवागसारखा स्फोटक ओपनर बॅट्समन दुसरा कोणीच नव्हता. त्याला बाद करण्यासाठी अनेक प्लॅन तयार केले जायचे पण खेळताना गाणी म्हणत म्हणत तो प्रतिस्पर्धी संघाचे सगळे प्लॅन उध्वस्त करीत असे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.