पोलिओग्रस्त तरुणाने फोटोकॉपीच्या दुकानातुन सुरुवात करत आज १ हजार कोटींची कंपनी उभारलीय…

ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक,

तोच दिपवु शकेल जगाला होऊन खरा धडाकेबाज

हा महेश कोठारेंच्या धडाकेबाज सिनेमातला डायलॉग जर कुठल्या व्यक्तीला परफेक्ट बसत असेल तर तो म्हणजे विशाल मेगा मार्केट्चे संस्थापक रामचंद्र अग्रवाल यांना.

पोलिओग्रस्त असूनही आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर रामचंद्र अग्रवाल यांनी तब्बल १ हजार कोटींची कंपनी उभी करून एक आदर्श तरुणाईपुढे उभा केला आहे.

रामचंद्र अग्रवालांचा हा प्रवास जबरदस्त तर आहेच शिवाय अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. देशभरात आणि भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये रामचंद्र अग्रवाल यांच्या नावाच्या चर्चा त्यांच्या कंपनीच्या मार्फत झडत असतात. तर जाणून घेऊया या १ कोटींच्या कंपनीचा यशस्वी प्रवास आणि रामचंद्र अग्रवाल यांच्या इच्छाशक्तीचा.

रामचंद्र अग्रवाल हे लहानपणापासूनच पोलिओग्रस्त होते. पोलिओच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना आधाराशिवाय चालणं अशक्य होतं. या सगळ्या प्रकारामुळे त्यांचं शालेय शिक्षण आणि इतर शिक्षण कसबसं पूर्ण झालं. पण पुढे पोटापाण्याचा प्रश्न भेडसावू लागल्याने त्यांनी उदरनिर्वाहासाठी एक फोटोकॉपीच दुकान सुरु केलं. हे दुकान सुरु करण्यासाठी रामचंद्र अग्रवाल यांना कर्जाऊ पैसे घ्यावे लागले होते.

पुढे फोटोकॉपीच्या धंद्यात पैसे नसल्याचं रामचंद्र अग्रवाल यांच्या लक्षात आलं आणि काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोलकाताच्या लाल बाजारात अग्रवाल यांनी एक गारमेंटचं दुकान सुरु केलं. हे गारमेंटचं दुकान अग्रवाल यांनी तब्बल १५ वर्षांपर्यंत चालवलं. पण याहीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणून रामचंद्र अग्रवाल यांनी मोठ्या स्तरावर रिटेल व्यापार सुरु करायचं ठरवलं.

२००१ साली मोठ्या हेतूने रामचंद्र अग्रवाल कोलकाताहून दिल्लीला आले. दिल्लीत येऊन त्यांनी विशाल रिटेल नावाने आपला व्यवसाय सुरु केला. दिल्लीत त्यांचं नशीब चांगलंच चाललं आणि २००२ साली दिल्लीतच विशाल मेगा मार्केट या पहिल्याच हायपर मार्केट कंपनीची स्थापना झाली. शेअर मार्केटमध्ये कंपनीची लोकप्रियता वाढवण्यासाठी रामचंद्र अग्रवाल यांनी बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज काढलं होतं.

शेअर मार्केटमधून कंपनीचं नाव करण्यासाठी रामचंद्र अग्रवाल यांनी मोठ्या प्रमाणात बँकांकडून पैसे घेतले होते पण २००८ साली शेअर मार्केट ढासळलं आणि अग्रवाल यांना तब्बल ७५० कोटींचं नुकसान सहन करावं लागलं होतं. इतकं मोठं नुकसान झाल्याने रामचंद्र अग्रवाल यांना मोठा धक्का बसला. या नुकसानाची भरपाई करता करता कंपनीचं दिवाळं निघालं. बँकांचे उधारीवर घेतलेले पैसे फेडण्यासाठी रामचंद्र अग्रवाल यांना मेहनतीने बनवलेली आपली कंपनी विकावी लागली. २०११ साली वी-मार्टला श्रीराम ग्रुपने विकत घेतलं होतं.

आता इतकं मोठं नुकसान झाल्यावर एखादा माणूस पुन्हा या भानगडीत न पडलेलं बरं म्हणून दुसरा एखादा धंदा करण्याच्या फंदात पडला असता पण रामचंद्र अग्रवाल हे मोठे जिद्दी आणि रिस्क घेणारे व्यक्ती होते. इतक्या साऱ्या पडझडीनंतर रामचंद्र अग्रवाल यांनी हार न मानता V-२ रिटेल नावाने अजून एका कंपनीची सुरवात केली. या कंपनीमध्ये कमी किमतीत फॅशनेबल प्रोडक्ट विकले जातात.

V-२ रिटेलच्या वेबसाइटनुसार हि कंपनी ९६ दुकानांसहित भारताच्या १७ राज्यांमध्ये ऍक्टिव्ह आहे. ७५० कोटींचा तोटा सहन करून देखील रामचंद्र अग्रवाल यांनी १ हजार कोटींचा ब्रँड उभा केला आहे. आपल्या पोलिओग्रस्त असण्याचा अग्रवाल यांनी कुठेही गाजावाजा केला नाही. विशाल मेगा मार्टचा प्रवास हा नावाप्रमाणेच विशाल आणि रिस्की आहे. 

रामचंद्र अग्रवाल यांचं हे कार्य किती प्रेरणादायी आहे याचा प्रत्यय येतोच. देशभर आज अग्रवाल यांचं  व्यापार आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.